Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.
****
· देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं
देशवासियांना आवाहन; बीडच्या रॉकी श्वानाच्या कार्याचा पंतप्रधानाकडूने गौरव.
· सरकारी नोकरीची तीस वर्ष आणि वयाची ५०
ते ५५ वर्ष पूर्ण केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आढावा घेण्याचे कार्मिक
मंत्रालयाचे आदेश.
· इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे व्यवहार केलेल्या नागरिकांकडून वसूल केलेले शुल्क
त्वरीत परत करण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या बँकांना सूचना.
· राज्यातल्या टाळेबंदीमध्ये सवलती देण्यासंदर्भातली नियमावली आज जाहीर होण्याची
शक्यता.
· राज्यात काल १६ हजार ४०८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद २९६ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
· मराठवाड्यात २८ बाधितांचा मृत्यू, तर नव्या १ हजार ३२३ रुग्णांची नोंद.
आणि
· जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्ण पदक.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी देशवासियांना देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचं आवाहन केलं
आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते काल नागरिकांशी संवाद साधत होते.
या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला पंधरावा भाग काल प्रसारित झाला. स्वावलंबी भारतासाठी
प्रत्येक क्षेत्रात वृद्धी दर वाढवणं आणि देशाचा विकास आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तरुण पिढीची क्षमता आणि कल्पकता यांचा उपयोग करून
घ्यायला हवा असंही पंतप्रधान म्हणाले. देशातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील,
खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठं केंद्र कसं बनू शकेल, यावर विचार सुरु असल्याचं
ते म्हणाले.
कोरोना विषाणूच्या
संकटातही शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असं सांगून त्यांनी यावर्षी शेती
उत्पादनात झालेल्या वाढीबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं. आपल्या देशाच्या ऋतुमानानुसार
आणि प्रदेशांनुसार पिकांची माहिती देणारा ‘भारतीय कृषी कोष’ तयार करण्याचं काम सुरू
असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाच्या सुरक्षा
व्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका महत्वाची असते असं सांगून पंतप्रधानांनी, बीड पोलिसांनी
आपला साथीदार श्वान ‘रॉकी’ याला संपूर्ण सन्मानानं अखेरचा निरोप दिला होता, या भावूक
प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले –
कुछ दिन पहले
ही आपने शायद टीव्ही पर एक बडा भाऊक करनेवाला दृश्य देखा होगा। जिसमें बीड पुलिस अपने
साथी डॉग रॉकी को पुरे सम्मान के साथ आखरी बिदाई दे रहे थे। रॉकी ने तिनसौ से जादा
केसों को सुलझाने मे पुलिस की मदत की थी। डॉग की डिझास्टर मॅनेजमेंट और रेस्क्यू
मिशन्स में भी बहोत बडी भूमिका होती है।
****
सरकारी नोकरीची
तीस वर्ष आणि वयाची ५० ते ५५ वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंतच्या सेवेचा
आढावा घेण्याचे आदेश कार्मिक मंत्रालयानं सर्व सरकारी विभागांना दिले आहेत. यातील अकार्यक्षम
आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीने मूदतपूर्व निवृत्त करण्यात येईल, असं
कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटलं आहे. सेवेतील ३० वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी
५० ते ५५ वर्ष वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीने सरकार कधीही निवृत्त
करु शकतं, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची नोटीस देणं
बंधनकारक असून, त्यांना निवृत्तीवेतन मिळतच राहणार आहे. या सर्व आढाव्यांच्या नोंदीविषयी
एक रजिस्टर तयार करण्याची सूचना या आदेशात करण्यात आली आहे.
****
१ जानेवारी
२०२० नंतर इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे व्यवहार केलेल्या नागरिकांकडून वसुल केलेले शुल्क
त्वरीत परत करण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं बँकांना दिले आहेत. यापुढे इलेक्ट्रानिक
माध्यमातून केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यवहारांवर शुल्क आकारू नये, असे निर्देशही
मंत्रालयानं दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या वर्षी ३०
डिसेंबरला अधिसूचना जारी केली होती.
रुपे कार्ड,
भीम-यूपीआई, यूपीआई क्यू आर कोड आणि भीम-यूपीआई क्यू आर कोडच्या माध्यमातून व्यवहार
करणाऱ्या ग्राहकांना बँकांनी कोणतेही शुल्क आकारू नये असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं
चौथ्या टप्प्यात टाळेबंदी शिथिलीकरणाची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्या
सवलती देता येतील याबाबत निर्णय घेण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत
एक उच्च स्तरीय बैठक झाली. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल
परब, मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ प्रशासकीय तसंच पोलीस अधिकारी उपस्थित
होते. याबाबतची नियमावली आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
केंद्र सरकारनं
३० सप्टेंबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंदच राहणार असल्याचं सांगितल्यामुळे या काळात
पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घेता येतील, असा प्रश्न
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठ
अनुदान आयोगानं ३० सप्टेंबरपर्यंत या परिक्षा घेण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर
सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. राज्यात पदवी आणि पदव्युत्तर
विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली
असून, ही समिती आज अहवाल सादर करणार आहे.
****
कोरोना विषाणूचे
रुग्ण शोधणं, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमध्ये राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे
गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडल्याचं आरोग्य मंत्री राजेश
टोपे यांनी म्हटलं आहे. या संसर्गाबद्दल जागृती करणं, सज्जता बाळगणं यावर सरकारनं लक्ष
केंद्रित केलं असल्याचं त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. या विषाणू चाचणीसाठी
४०० प्रयोगशाळा कार्यरत असून, दररोज ५० हजार चाचण्या होत आहेत, असं त्यांनी नमूद केलं.
गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवण्यात येत असल्यामुळे या विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात काल
१६ हजार ४०८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्ण संख्या सात लाख ८० हजार ६८९ झाली आहे. काल २९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २४ हजार ३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर
काल सात हजार ६९० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
पाच लाख ६२ हजार ४०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ९३ हजार ५२८
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल २८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १ हजार ३२३ रुग्णांची
नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात
पाच जणांचा मृत्यू झाला, तर २३९ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात सहा रुग्णांचा
मृत्यू झाला, तर आणखी २६५ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला,
तर नव्या ३०१ रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यातली पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी
९४ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या
२०७ रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ११६
रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर ६४ जण बाधित आढळले. तर
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी ३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे जिल्ह्यात
काल ३ हजार ८५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ७३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. मुंबईत काल १ हजार २३७ रुग्णांची नोंद झाली, तर ३० जणांचा मृत्यू झाला. नाशिक
जिल्ह्यात १ हजार १७० नवे रुग्ण, तर सहा मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात १ हजार
३१३, सातारा ४८९, सांगली २९७, पालघर २७४ चंद्रपूर २७०, सिंधुदुर्ग १५६, अमरावती १०६,
वाशिम ३५, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी १२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
वैद्यकीय प्रवेशाचं
७०-३० हे प्रमाण त्वरीत रद्द करावं अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश
चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. यामुळे मराठवाडा
आणि विदर्भातल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचं
त्यांनी म्हटलं आहे. महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थी प्रवेश क्षमता यांचा विचार
केला तर मराठवाड्याच्या वाट्याला कमी जागा येत असल्याचं ते म्हणाले.
****
जालना नगरपालिकेच्या
माध्यमातून करण्यात येत असलेल्या १६ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन
काल पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची प्रमुख
उपस्थिती होती. जालना शहराच्या विकासाठी आपण कटीबद्ध असून, शहरातली सर्व विकास कामं
दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
लातूर शहरातल्या
नागरीकांनी घरगुती गणेशाचं घरीच विसर्जन करावं, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे
आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केलं आहे. गणेश विसर्जनासंबंधी महानगरपालिकेनं
जारी केलेल्या नियमांबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
ज्या
नागरिकांना घरी गणेश विसर्जन करणे अशक्य आहे, त्यांनी आपल्या मूर्ती महापालिकेच्या
मूर्ती संकलन केंद्रात आणून द्याव्यात. मूर्ती देत असतांना श्रीगणेशाला अर्पण केलेले
फुले, दुर्वा आणि निर्माल्य स्वतंत्रपणे एकत्रित करून द्यावं, निर्माल्य देण्यासाठी
कॅरीबॅगचा वापर करू नये शक्यतो टाकाऊ कागदामध्ये ते एकत्र करून संकलन केंद्रावर
दिले तर पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार लावता येऊ शकेल.
अरूण
समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर.
****
हजरत इमाम हुसैन
यांचा बलिदान दिवस मुहर्रम काल सर्वत्र शांततेत आणि श्रद्धेनं साजरा झाला. कोरोना विषाणू
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभर मोजक्याच ठिकाणी ताजिया मिरवणूक काढायला न्यायालयानं
परवानगी दिली होती.
औरंगाबाद शहरात
मुहर्रम निमित्त १३० सवाऱ्या बसवण्यात आल्या होत्या. काल अत्यंत साध्या पद्धतीनं या
सर्व सवाऱ्या उठवण्यात आल्या.
नांदेड जिल्ह्याच्या
देगलूर तालुक्यातल्या कोकलगाव इथं मुहर्रम सणानिमित्त सवारी काढणाऱ्या २० जणांविरुध्द
गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन
न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
आंतरराष्ट्रीय
बुद्धिबळ महासंघाच्या जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं प्रथमच सुवर्ण
पदक जिंकलं आहे. स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं या ऑनलाइन
स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं आहे. कोविड-19 साथीमुळे
ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली.
प्रारंभी रशियाला
विजेता घोषित करण्यात आलं होतं. मात्र अंतिम सामन्यात भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन
आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत जोडणी मिळत नसल्याने वेळ गमावला. भारताने याबाबत
आक्षेप नोंदवल्यानंतर फेरतपासणी करण्यात आली. त्यानंतर भारत आणि रशिया या दोन्ही देशांना
संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या
औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काल लातूर इथल्या मराठवाडा मेट्रो कोच निर्मिती
कारखान्यास भेट दिली. यावेळी त्यांनी कामाचा आढावा घेतला. कारखाना उभारणीचं ८० टक्के
काम पूर्ण झालं असून, यावेळी निदर्शनास आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा लवकरच रेल्वेमंत्री
पियुष गोयल यांच्यासमोर ठेवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या
जिंतूर तालुक्यातल्या कवठा या गावातल्या महिलांनी गावात दारु बंद करण्याची मागणी केली
आहे. या मागणीचं निवेदन ग्रामस्थ आणि महिलांनी काल पोलीस उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक
पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांना दिलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक कापणी अहवालावर अचूक नोंद घेतल्याची खात्री करूनच स्वाक्षऱ्या
कराव्यात, असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. जिल्ह्यात पीक विम्याच्या
अनुषंगाने मुगाचे पीक कापणी प्रयोग सुरू झाले असून, या प्रयोगाच्यावेळी शेतकऱ्यांनी
स्वतः उपस्थित राहावं असं ते म्हणाले. यातून निष्पन्न झालेल्या उत्पन्नाच्या आधारे
पीक विमा मिळणार असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना ही सूचना केली.
****
औरंगाबाद शहरातल्या
उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी
काल जाहीर झाली. या यादीत आठ हजार ७३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती
शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत ऑनलाईन माहिती उपलब्ध करुन द्यावी, तसंच
प्रवेश प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करावं, असं त्यांनी सांगितलं
आहे.
****
नांदेड जिल्ह्यात
किनवटनजिक मौजे पाटोदा फाटा इथं दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात
चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर आदीलाबाद इथं उपचार
सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment