Sunday, 30 August 2020

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

प्रत्येक सण तसंच कार्यक्रमांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संयम आणि साधेपणाचं यंदा दर्शन होत असून नागरिकांना आपली जबाबदारी, दायित्वाचं  भान असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आकाशवाणीवरील `मन की बात` कार्यक्रमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमातल्या दुसऱ्या टप्प्याचा हा पंधरावा भाग होता. लहान मुलांनी संसर्गाच्या या काळात दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांनी प्रशंसा केली. भारतातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील, खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकेल, यावर विचारमंथन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक क्षेत्रात देश आत्मनिर्भर व्हायला हवा, असं त्यांनी यावेळी नमुद केलं तसंच यासाठी सर्वांनी आत्मविश्वासानं पुढं यायला हवं, असं आवाहनही केलं. पंतप्रधानांनी देशातल्या शेतकरी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनाच्या संकटातही शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असं सांगून त्यांनी यावर्षी शेती उत्पादनात झालेल्या वाढीबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं. आपल्या देशाच्या ऋतुमानानुसार आणि प्रदेशांनुसार पिकांची माहिती देणारा ‘भारतीय कृषी कोषतयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका महत्वाची असते असं सांगून मराठवाड्यातल्या बीड पोलिसांनी आपला साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला होता या भावूक प्रसंगाचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उल्लेख केला. या रॉकीनं ३०० पेक्षा जास्त गुन्हे प्रकरणांची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत केली होती, असं  त्यांनी आवर्जुन सांगितलं. देशातल्या शिक्षकांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. शिक्षकांच्या समोर परिवर्तनाचं एक मोठं आव्हान आहे. आपल्या सर्व शिक्षकांनी या आव्हानाला समस्या न मानता, त्याचा संधी म्हणून स्वीकार केला, याचा मला आनंद वाटतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

****

देशात कोरोना विषाणुचे आतापर्यंत सर्वाधिक ७८ हजार ७६१ नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या ३५ लाख ४२ हजार ७३३ झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. यातले २७ लाख १३ हजार ९३३ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून सध्या सात लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण संख्येचं हे प्रमाण २१ पूर्णांक ६० शतांश टक्के आहे. या संसर्गामुळे सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे ९४८ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६३ हजार ४९८ झाली आहे.

****

सुरक्षा दलांनी श्रीनगर शहरालगत एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना आज ठार केलं तर जम्मू आणि काश्मीर पोलिस दलाच्या एका सहायक फौजदाराला यात वीर मरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पांठा चौकात पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका नाक्यावर दहशतवाद्यांनी काल रात्री उशिरा गोळीबार केला होता, त्यानंतर या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. आज सकाळी या ठिकाणी चकमक सुरू झाल्यानंतर तीन दहशतवादी मारले गेले तर एक सहायक फौजदार बाबू राम यांना वीर मरण आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय आज सलग तिसऱ्या दिवशी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. या २८ वर्षीय अभिनेत्रीवर तिचा मित्र सुशांतसिंहला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सीबीआय आज तिचा भाऊ शोविक याचीही सलग चौथ्या दिवशी चौकशी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आज सकाळी विना मास्क फिरायला आलेल्या शहरवासियांना ताकीद देण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी ही कारवाई केली. 

****

जळगाव जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधित ६१० रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात सध्या सहा हजार ९४३ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान काल एकाच दिवशी या विषाणू संसर्गाचे नवे ५६६ रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या २६ हजार ४३९ झाली आहे.

****

सांगली जिल्ह्यात काल कोरोना विषाणुचे ५७५ रुग्ण आढळले असून जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १० हजार ९५७ झाली आहे. आतापर्यंत ५४२ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

//**********//

 

 

 

No comments: