Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 25 November 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन
कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी
सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली
नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला
नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
इयत्ता
पहिली ते सातवीचे वर्ग एक डिसेंबरला सुरू होणार- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
·
अवैध
गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाईचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
यांचे निर्देश.
·
राज्य
परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच.
आणि
·
न्यूझीलंडविरुद्ध
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या दिवशी चार बाद २५८ धावा.
****
येत्या एक डिसेंबरपासून राज्यात इयत्ता पहिली ते सातवीचे
शालेय वर्ग सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. या निर्णयामुळं ग्रामीण आणि शहरी भागातही आता इयत्ता पहिली ते बारावीचे संपूर्ण
वर्ग सुरू होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या कामी पालकांनी पुढाकार घेण्याचं
आवाहन केलं. कोरोना विषाणुचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी
वातावरण देण्यात येईल अशी ग्वाहीही गायकवाड यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या
बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आणि राज्य परिवहन महामंडळाचा संप
यावरही चर्चा करण्यात आली.
****
अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाईचे
आणि इतर राज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्याचे निर्देश
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि
सुपारी, यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करण्यासंदर्भात गृहमंत्री
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी
ते बोलत होते. राज्यात २०१२ पासून या पदार्थांवर बंदी आहे त्याची अंमलबजावणी देखील
होत आहे मात्र परराज्यातून गुटखा अवैध मार्गानं आणला जातो आणि त्याची विक्री तसंच वितरण
केलं जातं. या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन आणि पोलिस यांनी संयुक्तपणे मोहीम राबवावी
तसंच पोलिस यंत्रणांनी या सर्व अन्न पदार्थांची उत्पादनं, विक्री, साठवणूक, वितरण आणि
वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देशही पाटील
यांनी दिले. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी परराज़्यातला गुटखा
रोखण्यासाठी सीमाक्षेत्रात खबऱ्यांचं जाळं अधिक मजबूत करण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे
निर्देश या बैठकीत दिले.
****
राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप
सुरुच आहे. संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत
चर्चा केल्यानंतर काल ४१ टक्के वेतनवाढ जाहीर केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं संपातून
पाठिंबा काढून घेतला आहे. आपण मुंबईत आझाद मैदानावरचं आंदोलन मागं घेत आहोत, असं पक्षाचे
नेते गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं आहे. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मान्य
नसून शासनामध्ये विलीनीकरण व्हावं अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. जोपर्यंत निर्णय
होत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
****
नाशिक इथं येत्या तीन ते पाच डिसेंबर दरम्यान आयोजित ९४
व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिक महापालिकेनं २५ लाख रुपयांची मदत
देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेनं यासंदर्भात महासभेत ठराव करून तो शासनाच्या
मंजुरीसाठी पाठवला होता. शासनानं त्याला मान्यता दिल्यानं आता संमेलनाला निधी देण्याचा
मार्ग मोकळा झाला असल्याचं महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं.
****
भारतानं न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेत पहिल्या सामन्यात कानपूर इथं पहिल्या दिवशी चार बाद २५८ धावा केल्या. आजचा
खेळ थांबला तेंव्हा
पहिली कसोटी खेळत असलेला श्रेयस अय्यर ७५ आणि अष्टपैलू
रविंद्र जडेजा ५० धावा काढून खेळत होते. या
दोघांनी सुरेख फलंदाजी करत पाचव्या गड्यासाठी १०९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली
होती. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शुभमन
गिलनं ५२ तर मयांक अग्रवालनं १३, चेतेश्र्वर पुजारानं २६ आणि कर्णधार अजिंक्य रहाणेनं
३५ धावा केल्या. काईल जेमीसननं तीन गडी बाद केले.
****
मराठवाडा रेल्वे प्रवासी महासघांतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी
आज परभणी रेल्वे स्थानकावर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. टाळेबंदीनंतर अद्याप बंद असलेल्या
रेल्वे सुरू करण्यात याव्यात तसंच या विभागातल्या अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास मोठं
आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्व राजकीय पक्षाचे नेते आंदोलनात
सहभागी झाले होते. मराठवाड्यातील रेल्वे प्रवासाच्या समस्या वर्षानुवर्ष कायम असून
रेल्वे विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन रुग्णालयाची अमासिकॉन
2021 या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. उद्यापासून दोनदिवसीय होणाऱ्या या
परिषदेत पोटाची दुर्बिणीद्वारे होणारी शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीकचा जगभरात प्रचार
आणि प्रसार करण्यात येणार असल्याचं रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सुर्यवंशी यांनी
आज पत्रकार परिषदेत सांगितलं. जगभरातील सुमारे १० हजार डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही काळ बंद
असलेलं शिर्डी इथलं साईप्रसादालय उद्यापासून प्रसाद आणि भोजनाकरता सुरु करण्यात येणार
असल्याची माहिती शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी
दिली आहे. साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्याकडून साईप्रसादालय सुरु करण्याबाबत वारंवार
मागणी होत होती. त्यानुसार संस्थानच्या वतीनं अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव
दिला होता. त्यावर काही अटी आणि शर्तीवर साईप्रसादालय आणि लाडू प्रसाद वाटपाला परवानगी
देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या आमदाबाद शिवारात
पुंडलिक बनकर यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज अथक
परिश्रमानंतर बाहेर काढलं. वनविभागानं या बिबट्याला ताब्यात घेतलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग विरोधी लढ्यातलं सर्वात अपयशी राज्य
म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली असल्याची टीका, भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद जिल्हाशहराध्यक्ष
संजय केणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारनं वेळोवेळी केलेल्या मदतीमुळंच
महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा ठाकरे सरकारच्या
सल्ल्यानुसार या संसर्गाविरोधातली केविलवाणी झुंज सुरुच राहिली असती, असं केणेकर म्हणाले.
****
No comments:
Post a Comment