Monday, 29 November 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 November 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

कृषी कायदे निरसन विधेयक २०२१ आज लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हे विधेयक सादर केलं. या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी सदनात गदारोळ करण्यास सुरुवात केली, त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. 

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं असून, कृषी मूल्य, पेगॅसस हेरगिरी प्रकरणावारुन विरोधी पक्ष सदस्यांनी पहिल्याच दिवशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज काही काळासाठी बाधित झालं होतं.

दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरु होताच नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली, तसंच दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  

हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन, संसदेचं हे सत्र अत्यंत महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. सर्व प्रकारच्या मुद्यांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं, त्यांनी नमूद केलं. या अधिवेशनात देशहितावर चर्चा व्हावी, सकारात्मक निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

****

कोविडच्या ओमिक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल आणि संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल, असं सांगितलं. परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातल्या इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून, नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार, हा सध्याचा प्रश्न असून, पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावं, यावर या बैठकीत चर्चा झाली. देशभरातल्या आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसंच त्यांच्या संपर्कातले प्रवासी शोधणं सोपं जाईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

दरम्यान, ओमिक्रॉन या नव्या प्रकाराची राज्याला भीती नाही, कारण कुठल्याही भागात या प्रकारचे रुग्ण आढळले नसल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. तरीही विषाणूचा धोका अद्याप कायम असल्यानं काळजी घेणं बंधनकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या प्राथमिक शाळा एक डिसेंबरपासून ठरल्याप्रमाणे सुरु होतील, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

****

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना प्रवासाआधी ७२ तास कोविड चाचणी करुन घ्यावी लागेल, तसंच ती निगेटीव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागेल. भारतात येण्याआधीच्या दोन आठवड्यांच्या प्रवासाचा तपशीलही सादर करणं अनिवार्य असेल. कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या देशांमधून आलेल्या नागरिकांना भारतात आल्यावर पुन्हा कोरोना चाचणी करावी लागेल आणि तिचा अहवाल येईपर्यंत विमानतळावरच थांबावं लागेल. धोका नसलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर थांबावं लागणार नाही. मात्र १४ दिवस आरोग्य देखरेखीखाली राहावं लागेल. समुद्रमार्गे भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी हीच नियमावली लागू असेल.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १२२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात देशात ४२ लाख चार हजार १७१ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १२२ कोटी ४१ लाख ६८ हजार ९२९ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या आठ हजार ३०९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल नऊ हजार ९०५ रुग्ण बरे झाले, देशात सध्या एक लाख तीन हजार ८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त एक हजार शेतकऱ्यांना श्री क्षेत्र जेजुरी मल्हारी मार्तंड देवस्थानच्या वतीनं काल गहू बियाणे मोफत वाटप करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातली हळद देवस्थाननं विकत घ्यावी अशी कृषी उद्योजक नरेंद्र चव्हाण यांनी केलेली मागणी, यावेळी मान्य करण्यात आली. 

****

कानपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज अखेरच्या दिवशी, २८४ धावांचा पाठलाग करताना, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्युझीलंड संघानं, दोन बाद ९९ धावा केल्या होत्या. न्युझीलंडला अजून १८५ धावांची गरज आहे. टॉम लॅथम ४८ तर कर्णधार केन विल्यमसन सात धावांवर खेळत आहेत. विजयासाठी भारताला न्यूझीलंडचे अजून आठ फलंदाज बाद करावे लागतील.

****

No comments: