Saturday, 27 November 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.11.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 November 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज नवी दिल्लीत कोविड १९ आणि लसीकरणासंदर्भात उच्च सरकारी अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम  आढळलेल्या कोविडच्या ओमीक्रॉन या नव्या प्रतिरूप संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी के मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल बैठकीला उपस्थित  होते. इस्राइल, हाँगकाँग, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्‍लादेश, बोत्‍सवाना, चीन, मॉरीशस, न्‍यूझीलंड, जिम्‍बाब्‍वे, सिंगापूर आणि ब्रिटन या देशातून येणाऱ्या नागरिकांची भारतात आल्यावर विविध प्रकारची तपासणी आणि चौकशी करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करावी, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना इथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेऊन सुरक्षित राहण्याचं आवाहनही सरकारनं केलं आहे

**

देशात आतापर्यंत १२१ कोटी सहा लाखाहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीकरण झालं आहे.  काल दिवसभरात ७३ लाख ५८ हजाराहून अधिक लसीकरण करण्यात आलं असून देशातला कोविड संक्रमणातून रूग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ३४ शतांश टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत ६३ कोटी ८२ लाखाहून अधिक कोविड नमुन्यांचं परीक्षण झालं असून काल नऊ लाख ६९ हजाराहून अधिक कोविड नमुन्यांचं परीक्षण करण्यात आलं. दरम्यान सध्या देशात एक लाख सात हजार १९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

**

मराठवाड्यासाठी मध्य गोदावरी उपखोऱ्यात १९ पूर्णांक २९ अब्ज घनफूट आणि पैनगंगा उपखोऱ्यात ४४ पूर्णांक ५४ अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे सचिव अभियंता अजय कोहिरकर यांचा औरंगाबाद इथं सत्कार करण्यात येणार आहे. मराठवाडा अभियंता मित्र मंडळाच्या वतीनं उद्या रविवारी दुपारी दोन वाजता एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात हा सत्कार सोहळा होणार आहे.

**

केंद्र सरकारनं तीनही कृषी कायदे मागं घेतल्यामुळं शेतकऱ्यांनीही आपलं आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले. दरम्यान, राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही असं सांगून एसटी कामगारांचा प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आल्याची टिकाही आठवले यांनी केली.

**

कानपूर इथं खेळल्या जात असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा न्यूझीलंडच्या पहिल्या डावात २ बाद १९७ धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडच्या विल यंगनं ८९ धावा केल्या. त्याला फिरकीपटू रवीचंद्रन अश्विननं यष्टीपाठी झेलबाद केलं. त्यानंतर कप्तान केन विल्यमसन वैयक्तिक १८ धावांवर पायचीत झाला. भारतानं पहिल्या डावात ३४५ धावा केल्या आहेत.

**

धुळे इथल्या मुख्य बसस्थानकात संपात सहभागी कामगारांनी उभारलेला मंडप आज राज्य परीवहन महामंडळाच्या प्रशासनानं हटवला. आंदोलन मागं घेऊन तात्काळ कामावर येण्याचे आदेश दिले अन्यथा बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा यावेळी कामगारांना देण्यात आला. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर कामगार ठाम असून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.

**

पुणे जिल्ह्यात कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूरहून आळंदीच्या दिशेनं जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप घुसल्यानं झालेल्या अपघात २ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर जवळपास ३० वारकरी जखमी झाले. ही घटना आज कान्हेफाटा इथं घडली. यानंतर पिकअप चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खालापूर उंबरी गावचे हे वारकरी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

**

कोविड-19 मुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांस ५०हजार रूपये सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ४ ऑक्टो २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ही मदत केली जाईल. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. कोविड१९चे निदान झाल्यामुळे संबंधित रुग्णाने आत्महत्या केलेली असली तरीही हे सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी मृत व्यक्तीच्या निकटच्या नातेईवाईकाने संबंधित वेब पोर्टलवर किंवा सेतू केंद्रात अथवा ग्रामपंचायतीत CSC-SPV सामान्य सेवा केंद्रातून अर्ज करणं आवश्यक आहे. मदत देण्यापूर्वी कोविड मृत्यू प्रकरणाची पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत.

**

No comments: