आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोविड -१९ आणि लसीकरण संदर्भात सरकारी अधिकार्यांसमवेत एक बैठक घेत आहेत. दरम्यान, देशात काल कोविड -१९ चे आठ हजार ३१८ रूग्ण
आढळले तर दहा हजार ९६७ लोक या संक्रमणातून बरे झाले. देशात सध्या एक लाख सात हजार १९
रूग्ण उपचाराधीन असून काल ७३ लाख ५८ हजाराहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीकरण झालं.
****
कोरोना विषाणूचा
नवा अवतार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कता बाळगण्याचा
इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून, सर्व
आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करावी, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना
इथून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व नागरिकांनी
कोविड प्रतिबंधक लस घेऊन सुरक्षित राहण्याचं आवाहनही सरकारने केलं आहे.
****
देशाच्या निर्यातीत
वाढ करण्यासाठी सध्या योग्य काळ असल्याचं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाने काल मुंबईत घेतलेल्या
निर्यातीसाठीच्या बँकिंग समुदायाच्या बैठकीत डॉ कराड बोलत होते. देशातील बँका निर्यातदारांना
मदत करण्यासाठी सदैव तयार असल्याचंही डॉ कराड यांनी नमूद केलं.
****
महसूल गुप्तचर
संचालनालय- डीआरआयने देशाबाहेर परकीय चलनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या
दोन प्रवाशांना काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं.
शारजाहला जाण्याच्या तयारीत असलेल्या या दोघांच्या सामानात तीन कोटी ७० लाख डॉलर मूल्याचे
अमेरिकी डॉलर्स आणि सौदी दिऱ्हाम्स सापडले. या चलनासंदर्भात कोणतीही कायदेशीर कागदपत्रं
या दोघांकडे नव्हती. संबंधित चलन जप्त करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी उद्या रविवारी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून सकाळी ११ वाजता जनतेशी
संवाद साधतील. मन की बात या कार्यक्रम मालिकेतला हा ८३ वा भाग असेल. हा कर्यक्रम आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून थेट प्रसारित केला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment