Tuesday, 30 November 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभेत आज सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे. याबरोबरच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतन आणि सेवेसंबंधीचं दुरुस्ती विधेयकही आज लोकसभेत सादर होण्याची शक्यता आहे. राज्यसभेत आज धरण सुरक्षा विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे.  

****

केंद्र सरकारनं सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधून निर्गुंतवणुकीला धोरणात्मक मंजुरी दिली आहे. अर्थ व्यवहारविषयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत इच्छुकांमधल्या सर्वोच्च २१० कोटी ६० हजारांच्या बोलीला मंजुरी देण्यात आली.

****

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जारी केलेलं जामीनपात्र वॉरंट चांदीवाल आयोगानं, काल ते आयोगासमोर हजर झाल्यानंतर रद्द केलं. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. आयोगानं परमबीर सिंग यांना मुख्यमंत्री मदत निधीमध्ये १५ हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या राज्यभरातल्या ५० आगारातून वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे. काल १९ हजार १६३ कर्मचारी कामावर रुजू झाल्यानं एक हजार ८६ गाड्या विविध मार्गांवर सोडण्यात आल्या.

दरम्यान, एसटी महामंडळानं काल एक हजार ८८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. आतापर्यंत एकूण सात हजार ५८५ जणांना निलंबित केलं असून, एक हजार ७७९ जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

****

नाशिकमध्ये येत्या तीन तारखेपासून होणाऱ्या साहित्य संमेलनात प्रवेश करण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे. १८ वर्षाखालच्या नागरिकांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले.

****

हिंगोली तालुक्यातल्या जामठी खूर्द इथं शेतीच्या वादावरून झालेल्या दुहेरी खून खटल्यात, जिल्हा सत्र न्यायालयानं नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन भावांमध्ये वडिलोपार्जित असलेल्या शेतीवरून झालेल्या वादातूनच २२ जानेवारी २०१६ रोजी त्यांच्यात तलवार, काठी, कुऱ्हाडीनं हाणामारी झाली. यात अंबादास भवर आणि उद्धव भवर यांचा मृत्यू झाला होता.

****

No comments: