Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू
प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या
दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी
सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली
आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६
आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत
वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· कोविडमुळे
निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांस ५०हजार रूपये सानुग्रह सहाय्य देण्याचा
राज्यशासनाचा निर्णय
· विधान
परिषदेच्या धुळे - नंदुरबार मतदार संघातून भाजपचे अमरिश पटेल तर कोल्हापूर मतदार संघातून
महाविकास आघाडीचे सतेज पाटील बिनविरोध; नागपुरात तिरंगी लढत
· राज्यातील
कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसंच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा
तिसरा टप्पा जाहीर; निवडणूक प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
· शिवसेनेचे
नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील कार्यालय आणि घरावर ईडीची छापेमारी
· राज्यात
नवे ८५२ कोविडग्रस्त; मराठवाड्यात पाच जणांचा मृत्यू तर नव्या २८ रुग्णांची नोंद
· मराठवाड्यात
अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू
आणि
· इंडोनेशिया
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पी व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक
; पुरूष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग
शेट्टी जोडीही उपांत्य फेरीत दाखल
****
कोविड-19 मुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांस
५०हजार रूपये सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने
४ ऑक्टो २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ही मदत केली जाईल. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या
थेट बँक खात्यात जमा होणार आहे. कोविड 19 चे निदान झाल्यामुळे संबंधित रुग्णाने आत्महत्या
केलेली असली तरीही हे सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी मृत व्यक्तीच्या निकटच्या
नातेईवाईकाने संबंधित वेब पोर्टलवर किंवा सेतू केंद्रात अथवा ग्रामपंचायतीत
CSC-SPV सामान्य सेवा केंद्रातून अर्ज करणं आवश्यक आहे. मदत देण्यापूर्वी कोविड मृत्यू
प्रकरणाची पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे
देण्यात आलेले आहेत.
****
विधान परिषदेच्या निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या
शेवटच्या दिवशी धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून कॉंग्रेससह
चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, माजी मंत्री
अमरिश पटेल हे बिनविरोध विजयी झाले.
कोल्हापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अमल
महाडिक तसंच त्यांच्या पत्नी अपक्ष उमेदवार शौमिका महाडिक यांनी माघार घेतल्यानं महाविकास
आघाडीचे उमेदवार सतेज पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. भाजप-काँग्रेस-शिवसेना
यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या तडजोडीनुसार तसंच काल नवी दिल्लीत भाजपचे
ज्येष्ठ नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महाडिक यांनी
अर्ज मागे घेतला.
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघात दोन उमेदवारांनी अर्ज
मागे घेतले. त्यामुळे या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे, कांग्रेसचे
रवींद्र प्रभाकर भोयर आणि अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार
आहे.
****
राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसंच इतर
सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काल
जाहीर केला. या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून, यामध्ये
१८ हजार ३१० कृषी पतसंस्था तसंच बहुउद्देशीय सहकारी संस्था तर उर्वरित ८ हजार ८२८ सहकारी
संस्थांमध्ये साखर कारखाने, इतर पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी
दुग्ध संस्था आदींचा समावेश आहे. प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी ही माहिती
दिली. या निवडणुका मुदतीत पार पाडण्याच्या दृष्टीने पात्र संस्थांनी प्रारुप मतदार
यादी तसंच आवश्यक निवडणूक निधी संबंधीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करणं आवश्यक
आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.
****
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातंर्गत 'शैक्षणिक कर्ज
व्याज परतावा योजना' सुरू केली जाणार आहे.
दरवर्षी ४०० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार असून या योजनेसाठी दरवर्षी ६ कोटी
रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
यांनी ही माहिती दिली. या योजनेतंर्गत राज्य, देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घेतलेले ओबीसी विद्यार्थी अर्ज करू
शकतात. राज्यांतर्गत तसंच देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी कर्जाची कमाल मर्यादा १० लाख
रुपये तर आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी कर्जाची कमाल मर्यादा २० लाख रुपये इतकी असणार
आहे. या योजनेत बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त १२ टक्के रकमेचा
व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यींना करण्यात येईल. यासंदर्भात सविस्तर
मार्गदर्शक सूचना लवकरच जारी होणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
****
राज्यातील दहा टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अनुसूचित
जाती-जमातीच्या समाजास रोजगार, नोकऱ्यांमधील पदोन्नती आणि आरक्षण, शिक्षण, आरोग्य,
जमिनीची मालकी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसंच शिष्यवृत्ती आदी मुलभूत सुविधांपासून
वंचित ठेवण्याचा राज्य सरकारचा कट असल्याचा आरोप भाजपचे युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष
आमदार राम सातपुते यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष याअंतर्गत
त्यांनी काल औरंगाबाद इथं बातमीदारांशी संवाद साधला. अनुसूचित जातीजमातींच्या समस्या
सोडवण्यासाठी राज्यघटनेनुसार आयोगाची नियुक्ती करण्यात राज्य सरकारनं तब्बल दीड वर्षे
दिरंगाई केल्यानं या समाजाच्या समस्या टांगणीवर लागल्या आहेत, असा आरोपही आमदार राम
सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केला.
****
माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील
कार्यालय आणि घरावर काल सक्तवसुली संचालनालय- ईडीने छापे घालून चौकशी केली. खोतकर सभापती
असलेल्या जालना बाजार समितीच्या कार्यालयात इडीने प्रथम जाऊन चौकशी केल्याची माहिती
समोर आली आहे. त्यानंतर या पथकाने बाजार समितीच्या सचिवांना सोबत घेऊन शहरातील जुना
मोंढा भागात खोतकर यांच्या कार्यालयावर छापा टाकला. खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या
कार्यालयात छापेमारी करून चौकशीही केली. खोतकर यांच्या भाग्यनगरमधील निवासस्थानी इडीच्या
अधिकाऱ्यांनी अर्जुन खोतकर यांची चौकशी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी नुकतेच खोतकर यांच्यावर रामनगर
साखर कारखान्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीच्या मन की बात
या कार्यक्रमातून सकाळी ११ वाजता जनतेशी संवाद साधतील. मन की बात या कार्यक्रम मालिकेतला
हा ८३ वा भाग असेल. हा कर्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून थेट
प्रसारित केला जाणार आहे.
****
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या
हुतात्म्यांना काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या
हुतात्म्यांना आदरांजली वाहताना, सुरक्षा दलातल्या ज्या जवानांनी कर्तव्य बजावताना
शौर्य दाखवून हौतात्म्य पत्करलं त्याबद्दल देश सदैव त्यांचा ऋणी राहील असं नमूद केलं.
राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात या हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांप्रतीही संवदेना
व्यक्त केल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच
इतर मंत्र्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
संविधान दिन काल सर्वत्र साजरा झाला. या निमित्तानं शासकीय कार्यालयं
तसंच शैक्षणिक संस्थांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. बीड इथंही आंबेडकर
भवनात रक्तदान शिबीर, तसंच जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले. जिल्हा न्यायालयात जयभीम
या चित्रपटाचा विशेष खेळ दाखवण्यात आला.
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात कवडा इथं मातोश्री सावित्रीबाई
फुले आदिवासी विद्यालयात विद्यार्थ्यांची रांगोळी, गीत गायन आणि भाषण स्पर्धा घेण्यात
आली.
औरंगाबाद इथं भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत संविधान उद्देशिकेचं
सामुहिक वाचन करण्यात आलं.
****
राज्यात काल ८५२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३२ हजार, ७२३ झाली आहे. काल ३४ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
एक लाख ४० हजार ८९१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे.
काल ६६५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ८० हजार ६१ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे.
राज्यात सध्या आठ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर
पाच रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यात बीडमधल्या चार तर औरंगाबाद इथल्या एका
रूग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ०८ तर बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी
चार नवे रुग्ण आढळले. लातूर सहा, नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी तीन रूग्ण
आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात
प्रशासनाकडून हर घर दस्तक सह अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे जिल्ह्यात कोविड
लसीकरणाचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे
वार्ताहर....
मिशन कवच कुंडल, मिशन स्वस्थ युवा, हर-घर दस्तक अशा विविध
अभियानामुळे परभणी जिल्ह्यातील 876 गावांपैकी 185 गावांनी लसीचा पहिला डोस घेऊन शतप्रतिशत
लसीकरण पूर्ण केलं आहे. तसेच बहुसंख्य गावे 81 ते 99 टक्के लसीकरण करून शतप्रतिशत लसीकरण
मार्गावर आहेत.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, यांच्या सहकाऱ्यांनी
लसीकरणचा उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहूल गिते यांनी
यांनी व्यक्त केला.
****
मराठवाड्यात काल दोन ठिकाणी झालेल्या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा
मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड इथले तीन विद्यार्थी टंकलेखन परीक्षेसाठी घनसावंगी
इथं चारचाकीनं जात असतांना चालकाचा ताबा सुटल्यानं ही गाडी विद्युत खांबाला धडकली.
या अपघातात चारचाकीतील दोन तरुणी आणि एका तरुणाचा मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत, नांदेड जिल्ह्यातल्या देगलुर तालुक्यातल्या कावळगड्डा
या गावालगत असलेल्या एका बंधाऱ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. अनुक्रमे
११ अणि १० वर्ष वयाची ही मुलं पोहण्यासाठी
या बंधाऱ्यात उतरली होती, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला.
****
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाद्वारे
घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये औरंगाबादनं सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये
देशात चौदावा तर राज्यात दहावा क्रमांक मिळवला आहे. शहरी विकास मंत्रालय भारत सरकारमार्फत
१९ नोव्हेंबर २०२० पासून देशातील २४३ शहरांमध्ये सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान
सुरू करण्यात आलं आहे. सफाई कामगारांना सफाईसाठी अधिकृत आणि शाश्वत यंत्रणेमध्ये समावेश
करून घेणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
****
पिनाक संगीत अकादमी आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या
सहयोगाने औरंगाबाद इथं सुरू असलेल्या युवा सरगम महोत्सवात काल तरुण शास्त्रीय गायक
भुवनेश कोमकली यांचं सादरीकरण झालं. रागदारीवर आधारित बंदिशींपाठोपाठ भुवनेश कोमकली
यांनी सादर केलेल्या पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनांनी रसिकांना वेगळ्याच
स्वरानुभुतीचा आनंद दिला.
****
कानपूर इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या
कसोटी क्रिकेट सामन्यात, काल दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं बिनबाद १२९ धावा केल्या. त्यापूर्वी
भारतानं चार बाद २५८ या धावसंख्येवरून पुढे खेळताना, श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या
बळावर पहिल्या डावात धावा ३४५ केल्या. श्रेयस अय्यर १०५ धावांवर बाद झाला.
****
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं
उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिनं उपांत्यपूर्व सामन्यात दक्षिण कोरियाच्या सिम युजिनला
१४-२१, २१-१९ आणि २१- १४ अशा तीन अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिसऱ्या
मानांकित सिंधुची लढत थायलंडच्या दुसऱ्या मानांकित रॅचनॉक इंताननशी होणार आहेत.
पुरूष दुहेरीत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी
या भारतीय जोडीनंही उपांत्य फेरीत प्रवेश केला
आहे. त्यांनी मलेशियाच्या गोह झे फेइ आणि नूर इझुदि्दन या जोडीचा २१-१९, २१-१९ अशा
सरळ गेममधे पराभव केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग आणि इतर
विकास कामांबाबत बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन
गडकरी यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष
नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली गडकरी यांची काल लातूर इथं भेट घेतली, त्यावेळी गडकरी
बोलत होते. जिल्ह्यातली विविध रस्त्यांची तसंच पुलाची कामं पूर्ण करण्याची मागणी यावेळी
करण्यात आली.
****
शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने
आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात काल परभणी इथं वीज वितरण कार्यालयासमोर आक्रोश
आंदोलन करण्यात आलं. अधिक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे यांच्या लेखी आश्वासनानंतर हे
आंदोलन मागे घेण्यात आलं.
बीड जिल्ह्यात कृषीपंपाच्या वीजबील वसुलीच्या विरूद्ध भाजपा
आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई इथं महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.
शेतकऱ्यांना आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागत असून, महाविकास आघाडीसरकार
शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला.
****
मराठवाड्यासाठी मध्य गोदावरी उपखोऱ्यात १९ पूर्णांक २९ अब्ज
घनफूट आणि पैनगंगा उपखोऱ्यात ४४ पूर्णांक ५४ अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन
दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे सचिव अभियंता
अजय कोहिरकर यांचा औरंगाबाद इथं सत्कार करण्यात येणार आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी
काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment