आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत
चालणार आहे. सुधारित तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचं विधेयक, कृषी मंत्री नरेंद्रसिंह
तोमर आज संसदेसमोर मांडणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
संसदेचं हे सत्र अत्यंत महत्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्व प्रकारच्या मुद्यांवर
सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
कोरोना विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
केल्या आहेत. प्रवाशांना प्रवासाआधी एयर सुविधा पोर्टलवर आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह
अहवाल तसंच, १४ दिवसांचा प्रवासाचा तपशील अपलोड करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विषाणूचा
प्रभाव अधिक असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर कोविड चाचणी करुन, अहवाल
येईपर्यंत थांबावं लागणार आहे.
दरम्यान, ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळा सुरु करण्यासंदर्भात
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात कोविड मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन होण्यासंदर्भात,
जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून निर्देश दिले
आहेत. बाहेर देशातून जिल्ह्यात प्रवासी आले असतील त्यांची माहिती जमा करावी, त्यांची
आवश्यकतेनूसार तपासणी करावी, जिल्ह्यातल्या लसीकरण मोहिमेला गती द्यावी, १८ ते २० वयोगटातल्या
तरुणांचं लसीकरण करण्यावर भर द्यावा, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या महाविकास आघाडीला दोन वर्ष पूर्ण झाली असली, तरीही उस्मानाबाद
जिल्ह्याकडे मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष दिलं नाही, असं आमदार राणा जगजितसिंह पाटील
यांनी म्हटलं आहे. कौडगाव औद्योगिक वसाहती मध्ये प्रस्तावित टेक्स्टाईल पार्क, उस्मानाबाद-
तुळजापूर- सोलापूर रेल्वेमार्ग, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अनुदान, अशी अनेक जिल्ह्यातली
कामं प्रलंबित असल्याचं आमदार पाटील म्हणाले.
****
No comments:
Post a Comment