Monday, 29 November 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 November 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

 ****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, सुधारित तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याबाबतचं विधेयक आज संसदेत मांडणार

·      ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी, प्रवासाआधी ७२ तास आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक   

·      केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता, आवश्यक उपाय योजना करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश,

·      राज्यात प्राथमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार

·      राज्यात ८३२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ३९ बाधित

·      भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, प्रसिद्ध लेखक प्रसून जोशी यांना, यंदाच्या इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार, निखील महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपटाला, ज्यूरींचं रौप्य मयूर

आणि

·      कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडसमोर जिंकण्यासाठी २८४ धावांचं लक्ष्य

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सुधारित तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचं विधेयक, कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आज संसदेसमोर मांडणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसद भवनात सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, तसंच द्रमुक, वायएसआर काँग्रेस, लोकजन शक्ती पक्ष, अपना दल या पक्षांचे नेते, या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षासह काँग्रेसनं आपापल्या लोकसभा सदस्यांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हीप अर्थात पक्षादेश जारी केला आहे.

****

कोरोना विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं इतर देशातून येणार्या प्रवाशांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांना प्रवासाआधी एयर सुविधा पोर्टलवर  आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल तसंच, १४ दिवसांचा प्रवासाचा तपशील अपलोड करणं बंधनाकारक करण्यात आलं आहे. प्रवासाच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. विषाणूचा प्रभाव अधिक असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर कोविड चाचणी करावी लागणार आहे. १ डिसेंबरपासून या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना, ओमिक्रॉनसंदर्भात सतर्क राहून प्रतिबंधात्मक कारवाईसह लसीकरणाची व्यापकता वाढवण्याचं, पत्राद्वारे सूचित केलं आहे. अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याची सूचना, राजेश भूषण यांनी केली आहे. कोविड चाचण्यांबाबतची यंत्रणाही बळकट करण्याचं या पत्रातून सूचित करण्यात आलं आहे. प्रभावित क्षेत्र, विलगीकरण, पाठपुरावा आणि उपचार याची खबरदारी घेण्याचंही सर्व राज्य सरकारांना सांगण्यात आलं आहे.  

****

कोविडच्या ओमिक्रॉन या नव्या अवताराच्या प्रतिबंधासाठी, केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता, आवश्यक ते निर्णय युद्धपातळीवर घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची काल मुख्यमंत्र्यांनी, दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कृती दलाचे डॉ संजय ओक, यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

आपल्या सर्वांमधला बेसावधपणा वाढला आहे, याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी, मास्क न वापरणारे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर काटेकोर कारवाई करण्याची सूचना केली आहे.

राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू द्यायची नसेल, तर कोविड प्रतिबंधाचे नियम पाळावे लागतील, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी, आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेन .

दरम्यान, कोरोना विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभुमीवर राज्यातल्या शाळा सुरु करण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

राज्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात आरोग्य विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचं अंतर, मास्क वापरणं बंधनकारक, सॅनिटायझरचा वापर, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं संपूर्ण लसीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे. शाळेत सामूहिक प्रार्थना, गर्दीचे उपक्रम टाळावे, जलतरण तलाव वापरु नये, लक्षणं नसलेल्यांनाच शाळेत प्रवेश द्यावा, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य विभागानं शिक्षण विभागाला केल्या आहेत.

****

राज्यात काल ८३२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३४ हजार, ४४४ झाली आहे. काल ३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ९४१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ८४१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ८१ हजार ६४० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या आठ हजार १९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात १३ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद ११, नांदेड सात, जालना तीन, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. परभणी जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत असल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते काल, आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रम मालिकेतून जनतेशी संवाद साधत होते. आदिवासी समाजाचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान लक्षात घेत, देशानं आदिवासी गौरव सप्ताहसुद्धा साजरा केला. देशाच्या विविध भागांत झालेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, आदिवासी समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवल्याचं पंतप्रधान म्हणाले.

आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थांशी संवाद साधून पंतप्रधानांनी, ही योजना कशी महत्त्वाची आहे, हे पटवून दिलं. कल्पक तसंच नाविन्यपूर्ण संशोधन, जोखिम पत्करण्याची भावना आणि काम पूर्ण करण्याची जिद्द, या तीन गोष्टी युवकांना ओळख मिळवून देतात, हे सांगतांनाच त्यांनी, युवकांना स्टार्टअपचं महत्त्व सांगितलं. पुण्यातले तरुण उद्योजक स्मॉल स्पार्क कन्सेप्टचे संस्थापक मयूर पाटील यांच्याशी संवाद साधत पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं. आपलं स्टार्टअप आणि पंतप्रधानांशी झालेला संवाद, याबाबतचा अनुभव मयूर पाटील यांनी या शब्दांत व्यक्त केला...

पंतप्रधानांनी आपल्या कामाची दखल घेतली, हा अनुभव शब्दात सांगण्यासारखा नाही. जेव्हा स्मॉल स्पार्क कन्सेप्ट सुरु केली होती, तेव्हा एकंच ध्येय होते, की वाढत्या वायू प्रदूषणामुळे आणि इंधन दरवाढीमुळे आपल्या सर्वांना जी अडचण होते, त्याला टाळा बसवण्यासाठी शोल फिल्टर्स हे भारतात सर्व गाड्यांवरती बसवले जावे. २०११ साली मी कॉलेजमध्ये असताना हे संशोधन सुरु केले, ते २०१८ मध्ये पूर्ण केलं. आणि २०२१ मध्ये या तंत्रज्ञानाला पेटंटही मिळाले. यानंतर नीति आयोगाद्वारे आयोजित केलेल्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत, अटल न्यू इंडिया चॅलेंज या स्टार्ट अप कॉम्पिटिशनमध्ये स्मॉल स्पार्कचे टॉप २० स्टार्ट अप मध्ये सिलेक्शन झाले. आणि केंद्र सरकारकडून प्रथमच कंपनीला ग्रांट्स मिळाले.

****

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली त्याच वास्तूमध्ये महापालिकेची मुलींची शाळा सुरु करण्यात येईल, अशी घोषणा, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यात महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना यंदाचा समता पुरस्कार प्रदान करण्यात आला, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्राध्यापक हरी नरके यावेळी उपस्थित होते.

कराड इथल्या परिवर्तन प्रतिष्ठानचा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे राज्यकार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ विजय निलावार यांना काल प्रदान करण्यात आला.

****

भारत हा चित्रपट निर्मितीचंच नव्हे तर निर्मितीपश्चात प्रक्रिया केंद्र बनवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा काल गोव्यात शानदार सोहळ्यात समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशाची संस्कृती आणि कला जगात पोहोचवणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला अधिक मजबूत करणार असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं. प्रसिद्ध कवी, लेखक प्रसून जोशी यांना, यंदाच्या इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अनुराग ठाकूर यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याहस्ते, प्रसून जोशी यांना शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

निखील महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपटाला, ज्यूरींचा विशेष पुरस्काराचा रौप्य मयूर देऊन गौरवण्यात आलं. याच चित्रपटातल्या भूमिकेसाठी मराठी अभिनेते जीतेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जपानी चित्रपट ‘रिंग वॉन्डरींग, सुवर्ण मयूर पुरस्काराचा, तर झेकोस्लावियाचा "सेव्हिंग वन हू इज डेड" हा चित्रपट, रौप्य मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला.

यंदा प्रथमच इफ्फीसोबत आयोजित ब्रिक्स चित्रपट सोहळ्याचाही काल समारोप झाला. दाक्षिणात्य अभिनेते धनुष यांना ब्रिक्स सोहळ्याचे सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून गौरवण्यात आलं. इफ्फी च्या समारोप सोहळ्याला उपस्थित असलेले ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासह अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

मराठवाड्यातल्या नागरीकांना भविष्यात पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही, असं नियोजन महविकास आघाडी सरकारनं केलं असल्याचं, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं मराठवाड्याला ६३ पूर्णांक ८३ दशलक्ष घनफूट- टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मराठवाडा अभियंता मित्र मंडळाच्या वतीनं काल औरंगाबाद इथं पाटील यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पाण्याची समस्या कमी करण्यासाठी वाहून जाणारं पाणी अडवणं, आणि ते साठवण्यासाठी नवे प्रकल्प राबवण्याचं नियोजन केलं असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीचं वैद्यनाथ मंदिर हे आरडीएक्स ने उडवून देण्याच्या धमकीनंतर, आता अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला देखील आरडीएक्सने उडवण्याच्या धमकीचं पत्रं मिळालं आहे. अंबाजोगाईच्या देवल कमिटीमध्ये शनिवारी रात्री मिळालेल्या या पत्रात ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. देवल कमिटीचे सचिव शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली, आणि सुरक्षिततेसंबंधी सुचना केल्या.

दरम्यान, परळीचं मंदीर उडवण्याची धमकी आल्यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता, नांदेडमधून दोघांना ताब्यात घेतलं आहे. यात एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली.

****


न्यूझीलंडविरुद्ध कानपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आपला दुसरा डाव, काल २३४ धावांवर घोषीत करत, न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केलं. जिंकण्यासाठी २८४ धावांचं लक्ष्य असलेल्या न्यूझीलंड संघानं काल चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा दुसऱ्या डावात एक बाद चार धावा केल्या होत्या. आज खेळाच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला न्यूझीलंडचे ९ फलंदाज बाद करावे लागतील, तर न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावा कराव्या लागणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव बस आगारातून तब्बल २१ दिवसानंतर काल पोलीस बंदोबस्तात बस फेऱ्या सुरू झाल्या. औरंगाबाद जालना बससेवाही पोलीस बंदोबस्तात सुरू झाल्याचं वृत्त आहे.

****

No comments: