Thursday, 25 November 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.11.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात गेल्या चोवीस तासात ९ हजार ११९ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले.गेल्या २४ तासात १० हजार २६४ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या देशभरात ९ हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात आतापर्यंत ११९ कोटी ३८ लाखांहून अधिक तर गेल्या २४ तासात ९० लाख २७ हजार नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं कळवलं आहे.

****

संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत माझं संविधान, माझा अभिमान हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलतत्त्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या ६ डिसेंबरला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी असलेल्या स्मारकाला ते भेट देणार आहेत.

****

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कानपूर इथं खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १८ षटकांत १ बाद ५६ धावा झाल्या होत्या.  

****

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून पेट्रोलपंप सायंकाळी सातनंतर सकाळी आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. पेट्रोल पंपचालकांसाठी ‘नो लस, नो पेट्रोल’ या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी आणि कोविड जनजागृती साठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केल्यानं पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्यांचा तुटवडा होत आहे. यामुळे पेट्रोल डिलर्स संघटनेनं हा निर्णय घेतला आहे.

****

No comments: