Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 November 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन
कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी
सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली
नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला
नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
विधान
परिषदेच्या धुळे - नंदुरबार मतदार संघातून भाजपचे अमरिश पटेल तर कोल्हापूर मतदार संघातून
महाविकास आघाडीचे सतेज पाटील बिनविरोध; नागपुरात तिरंगी लढत.
·
ओबीसी
विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेला’ प्रारंभ.
आणि
·
२६/११
च्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन.
****
विधान परिषदेच्या धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था
मतदार संघाच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसी
कॉंग्रेससह चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार,
माजी मंत्री अमरिश पटेल हे बिनविरोध विजयी झाले आहेत.
कोल्हापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपाचे
उमेदवार अमल महाडिक तसंच त्यांच्या पत्नी अपक्ष उमेदवार शौमिका महाडिक यांनी माघार घेतल्यानं महाविकास
आघाडीचे उमेदवार सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या तडजोडीनुसार आज नवी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस
यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महाडिक यांनी अर्ज मागे घेतला.
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार
संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या
निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे, कांग्रेसचे
रवींद्र प्रभाकर भोयर आणि अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
****
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातंर्गत 'शैक्षणिक
कर्ज व्याज परतावा योजना' सुरू केली जाणार आहे.
दरवर्षी ४०० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार असून या योजनेसाठी दरवर्षी ६ कोटी
रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
यांनी ही माहिती दिली. या योजनेतंर्गत राज्य, देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घेतलेले ओबीसी विद्यार्थी अर्ज करू
शकतात. राज्यांतर्गत तसंच देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी कर्जाची कमाल मर्यादा १० लाख
रुपये तर आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी कर्जाची कमाल मर्यादा २० लाख रुपये इतकी असणार
आहे. या योजनेत बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त १२ टक्के रकमेचा
व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यींना करण्यात येईल. यासंदर्भात सविस्तर
मार्गदर्शक सूचना लवकरच जारी होणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
****
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी
झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली वाहिली. सुरक्षा दलातल्या
ज्या जवानांनी कर्तव्य बजावताना शौर्य दाखवून हौतात्म्य पत्करलं त्याबद्दल देश
सदैव त्यांचा ऋणी राहील असं ते म्हणाले. आज या हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात या
हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांप्रतीही संवदेना व्यक्त केल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना, सैनिकांनी दहशतवाद्यांचा शौर्यानं मुकाबला केला, त्यांना आपण सलाम करतो, अशा शब्दात आपल्या भावना केल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच इतर
मंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातल्या पोलीस
हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आणि बळी
पडलेल्या नागरिकांना विनम्र अभिवादन केलं. राज्यात इतरत्रही अनेक ठिकाणी हुतात्म्यांना
आदरांजली वाहण्यात आली.
****
पोलीस आणि त्यांच्या
कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन राज्याचे
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलं आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या हुतात्म्यांना
पाटील यांनी आज मुंबईत श्रद्धांजली अर्पण केली, त्यावेळी ते बोलत होते.
****
अहमदनगर जिल्ह्यात विविध शाळांमध्ये
२३ नोव्हेंबर पासून
आजपर्यंत माझं संविधान, माझा अभिमान" हा उपक्रम
राबवण्यात आला. या निमित्त आज शाळांमध्ये संविधानाचं सामूहिक वाचन करण्यात आलं.
सामाजिक न्यायविभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टी पुणे यांच्या संयुक्त
विद्यमानं पुण्यात मार्केटयार्ड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून,
संविधान वाचन करण्यात आलं.
बीड इथंही आज संविधान दिनाच्या
निमीत्तानं डॉ
बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले. आंबेडकर भवनात रक्तदान शिबीर, तसंच जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले. या शिवाय जिल्हा न्यायालयात
जयभीम या आधारित चित्रपटाचं प्रदर्शनही करण्यात आलं.
****
राज्यातील दहा टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अनुसूचित
जाती-जमातीच्या समाजास रोजगार, नोकऱ्यांमधील पदोन्नती आणि आरक्षण, शिक्षण, आरोग्य,
जमिनीची मालकी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसंच शिष्यवृत्ती आदी मुलभूत सुविधांपासून
वंचित ठेवण्याचा राज्य सरकारचा कट असल्याचा आरोप भाजपचे युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष
आमदार राम सातपुते यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष याअंतर्गत
त्यांनी आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी संवाद साधला. अनुसूचित जातीजमातींच्या समस्या
सोडवण्यासाठी राज्यघटनेनुसार आयोगाची नियुक्ती करण्यात राज्य सरकारनं तब्बल दीड वर्षे
दिरंगाई केल्यानं या समाजाच्या समस्या टांगणीवर लागल्या आहेत. जनहिताच्या अनेक योजनांना
टाळे लावणाऱ्या स्थगिती सरकारनं या आयोगासही टाळे लावल्यानं हजारो सुनावण्या झाल्याच
नाहीत, याकडे सातपुते यांनी लक्ष वेधलं. मागासवर्गीय, अनुसूचित जातीजमातींच्या कर्मचाऱ्यांच्या
सेवाविषयक समस्याही दुर्लक्षित राहिल्यानं कागदावर या आयोगाचे अस्तित्व आणून राज्य
सरकारनं अनुसूचित जाती जमातींची फसवणूक केली असल्याचा आरोपही आमदार राम सातपुते यांनी
पत्रकार परिषदेत केला.
****
मराठवाड्यासाठी मध्य गोदावरी उपखोऱ्यात १९ पूर्णांक २९
अब्ज घनफूट आणि पैनगंगा उपखोऱ्यात ४४ पूर्णांक ५४ अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध
करुन दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे सचिव अभियंता
अजय कोहिरकर यांचा औरंगाबाद इथं सत्कार करण्यात येणार आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी
आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठवाडा अभियंता मित्र मंडळाच्या
वतीनं परवा रविवारी दुपारी दोन वाजता एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात हा सत्कार
सोहळा होणार आहे.
****
No comments:
Post a Comment