Tuesday, 30 November 2021

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 November 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

 ****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      तिन्ही कृषी कायदे रद्द करणारं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर

·      गत पावसाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी राज्यसभेत गदारोळ करणारे विरोधी पक्षाचे १२ खासदार निलंबित

·      राज्य विधीमंडळाचं येत्या २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत हिवाळी अधिवेशन 

·      राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता

·      कोविडच्या ओमायक्रॉन विषाणू प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

·      प्राथमिक शाळा ठरल्याप्रमाणे उद्यापासून सुरू होणार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं शंभर टक्के लसीकरण आणि ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक

·      राज्यात ५३६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात एक जणाचा मृत्यू तर २५ बाधित

आणि

·      कानपूरचा पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राखण्यात न्यूझीलंडला यश

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल तिन्ही कृषी कायदे रद्द करणारं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं. त्यानंतर या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे त्या गदारोळातच आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. दुपारी मध्यान्हानंतर तोमर यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडलं. या विधेयकाचं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वागत केलं. आगामी पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे सरकारनं हे तीन्ही कायदे मागे घेतले असल्याचा आरोप त्यांना यावेळी केला. यावर उत्तर देताना तोमर यांनी, सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कायदे केले, मात्र विरोधकांनी या कायद्यांबद्दल अपप्रचार केल्यामुळेच सरकारनं हे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या विधेयकावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी राज्यसभेतही गदारोळ केला. त्यानंतर राज्यसभेतही आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं.

दरम्यान, गत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गदारोळ घातलेल्या विरोधी पक्षांच्या राज्यसभेतील १२ खासदारांचं चालू अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानानं मजूर करण्यात आला. यात काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन आणि कम्युनिस्ट पक्षांच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई, यांचा समावेश निलंबित खासदारांमध्ये आहे.

दोन्ही सदनांचं कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. त्या आधी संसदेच्या दोन्ही सभागृहात दिवंगत खासदारांना आदरांजली अर्पित केल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांना गोपनियतेची शपथ देण्यात आली.

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. या हिवाळी अधिवेशनात एकूण १२ विधेयकं मांडली जाणार आहेत. तारांकीत प्रश्नांसंदर्भात येत्या गुरुवारी सभापतींकडे बैठक होणार आहे, असं परब यांनी सांगितलं.

२४ डिसेंबरला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवण्याबाबत निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं. अधिवेशन कालावधीत ‌कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, यासोबतच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.

यावर प्रतिक्रिया देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनाला सामोरं जाण्याची सरकारची मानसिकताच नाही, अशी टीका केली. ते या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या अधिवेशनाचा  कालावधी वाढवण्याची मागणी या बैठकीत केल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला, राज्य मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली. सध्या राज्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० तर कमाल ७५ इतकी आहे. आता त्यात वाढ होऊन ही संख्या किमान ५५ तर कमाल ८५ अशी करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या दोन हजार वरुन दोन हजार २४८ इतकी, तर याबरोबरच पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील, चार हजार वरुन चार हजार ४९६ इतकी होईल. या संदर्भातलं विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

****

कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणू प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी सदस्यांनी या नव्या विषाणुच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली. संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल, आणि संसर्गाला आळा घालता येईल असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून, भारतात उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसंच सात दिवसांसाठी विलगीकरणही अनिवार्य केलं आहे. मात्र परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा राज्यातल्या इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेनं किंवा रस्ते अथवा रेल्वे मार्गानं आल्यास त्यांची तपासणी कशी करणार, हा सध्याचा प्रश्न आहे. याबाबत पंतप्रधानांना अवगत करण्यात यावं, यावर या बैठकीत चर्चा झाली.

****

राज्यातल्या प्राथमिक शाळा ठरल्याप्रमाणे उद्या एक डिसेंबरला सुरू होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉनची राज्यात कुठेही लागण झाल्याचं अजून आढळलेलं नाही, त्यामुळे चिंतेचं कुठलंही कारण नसल्याचं ते म्हणाले. शाळा सुरू कारण्यासंदर्भातला निर्णय मुलांसाठीच्या कृती दलाशी चर्चा करूनच घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, प्राथमिक शाळा सुरू करताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं शंभर टक्के लसीकरण आणि ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. काल यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आलं. शाळेतला दररोजचा परिपाठ, स्नेह संमेलन आणि इतर कार्यक्रमांवर कडक निर्बंध राहतील, एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था, आणि विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरवल्या जातील. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची दररोज तापमान तपासणी चाचणी घेण्यात येईल.

****

राज्यात काल ५३६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३४ हजार, ९८० झाली आहे. काल २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ९६२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ८५३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ८२ हजार ४९३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार ८५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण आढळले. लातूर सहा, उस्मानाबाद तीन, परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर नांदेड जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

औरंगाबाद इथं सातव्या राज्यस्तरीय महाॲग्रो २०२२ या कृषी प्रदर्शानाचं, सात ते १० जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. सी एम आय ए चे अध्यक्ष आणि या प्रदर्शनाचे संयोजन समिती सदस्य शिवप्रसाद जाजू यांनी काल ही माहिती दिली. पैठण मार्गावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. शेती, शेतीपूरक उद्योगांशी संबंधित विषयांवर या प्रदर्शानात तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रदर्शनामधलं एक प्रमुख आकर्षण म्हणजे, विविध बचत गट, प्रगतिशील शेतकरी यांनी उत्पादित केलेली विविध कृषी उत्पादने, आणि पीक प्रात्याक्षिकं ज्यामध्ये रब्बी हंगातल्या भाजीपाला पिकांचा समावेश असणार असल्याचं, जाजू यांनी सांगितलं.

****


कानपूर इथं खेळला गेलेला पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राखण्यात न्युझीलंडला यश आलं. टॉन लॅथम, विल्यियम सोमरविल, रचिन रविंद्र आणि एजाज पटेल यांनी चिवट फलंदाजीचं प्रदर्शन करत, सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. अंधूक प्रकाशामुळे कालच्या पाचव्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, तेव्हा न्यूझीलंडनं नऊ बाद १६५ धावा केल्या होत्या. पदार्पणात शतक ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार मिळाला.

****

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण वाढवण्यासाठी काढलेले आदेश रद्द करण्याची मागणी, लोकविकास परिषदेनं केली आहे. संघटनेनं यासंदर्भात काल विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं. औरंगाबाद जिल्ह्यात विना लसीकरण पेट्रोल, गॅस आणि राशन बंद करण्यात आलं आहे. लस ही ऐच्छिक बाब असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे काढलेले आदेश रद्द करावे, अशी मागणी परिषदेनं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.

****

ओमायक्रॉन विषाणुच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी न घाबरता लसीकरणाचे दोन्हीही डोस घेऊन स्वतःची तसंच कुटूंबाची काळजी घेण्याचं आवाहन, परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. त्या काल वार्ताहरांशी बोलत होत्या. परभणी जिल्ह्यात किराणा, मद्य विक्री, बाजार समिती आदी ठिकाणी देखील लसीकरणाशिवाय सेवा देऊ नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

****

राज्यात येत्या तीन तारखेपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

****

No comments: