Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू
प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या
दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी
सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली
आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६
आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत
वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राज्यातल्या
सर्व प्राथमिक शाळा एक डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुरू करायला राज्य सरकारची परवानगी
· राज्य
परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच, वेतनवाढीनंतरही कामावर हजर न होणाऱ्या
कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा राज्य सरकारचा इशारा
· फरार
असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग मुंबईत गुन्हे शाखेसमोर हजर
· सुरत,
चेन्नई तसंच हैदराबादला जाणारे महामार्ग मराठवाड्याला जोडण्याचा प्रयत्न- केंद्रीय
रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी
· राज्यात
८४८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर ४१ बाधित
आणि
· न्यूझीलंडविरुद्धच्या
कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात, भारताच्या पहिल्या डावात चार बाद २५८ धावा
****
राज्यातल्या सर्व प्राथमिक शाळा एक डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुरू
करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
यांनी दिली. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर काल त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या
शहरी भागात ८ वी ते १२ वी आणि ग्रामीण भागात ५ वी ते १२ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग
सुरू झाले आहेत. आता उर्वरीत पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरु केले जाणार असल्याचं गायकवाड
यांनी सांगितलं. मुख्यमंत्री, मंत्रीमंडळातले सहकारी आणि लहान मुलांच्या कृती दलाशी
चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात यासंदर्भात पालक, शाळा
आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेच्या खबरदारी संदर्भात जागरुकता निर्माण केली जाईल.
शाळा सुरू करायची तयारी केली जाईल. याशिवाय कृती दलाशी चर्चा करुन मार्गदर्शक सूचनांमध्ये
सुधारणा करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं गायकवाड यांनी सांगितलं.
****
राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच
आहे.
संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत
चर्चा केल्यानंतर ४१ टक्के वेतनवाढ जाहीर केली होती. या निर्णयानंतरही कामावर हजर न
होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहनमंत्री अनिल परब
यांनी काल सांगितलं.
आंदोलक कर्मचाऱ्यांना मात्र वेतनवाढ मान्य नसून महामंडळाचं शासनामध्ये
विलीनीकरण व्हावं अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत
संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षानं संपातून पाठिंबा काढून घेतला आहे.
राज्य सरकारची वेतनवाढ आणि इतर मागण्यांवर
घेतलेली भूमिका स्वागतार्ह असून आपण मुंबईत आझाद मैदानावरचं आंदोलन मागे घेत आहोत,
असं पक्षाचे नेते गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
****
आगामी राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. २२ ते २८ डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन घेण्यावर
काल मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. यात २५ आणि २६ डिसेंबरला सुटी असल्यानं केवळ पाच
दिवस कामकाज होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातला अंतिम निर्णय सोमवारी होणाऱ्या विधीमंडळ
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
****
गेल्या काही काळापासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
परमबीरसिंग काल मुंबई गुन्हे शाखेसमोर हजर झाले. खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांनी,
ही हजेरी लावली. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण
दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत परमबीर सिंग चौकशीत पूर्ण सहकार्य
देत आहेत, असं त्यांचे वकील राजेंद्र मोकाशी यांनी या संदर्भात सांगितलं. त्यांनी सर्व
प्रश्नांची उत्तरं दिली, यापुढंही जिथं जिथं आवश्यक असेल, तिथं आपण संपूर्ण सहकार्य
करु, इतर प्रकरणांमधेही संपूर्ण सहकार्य दिलं जाईल, असं मोकाशी म्हणाले.
****
सुरत, चेन्नई तसंच हैदराबादला जाणारे महामार्ग मराठवाड्याला
जोडण्याचा प्रयत्न असून त्या दृष्टीनं नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी मराठवाड्यात
२० हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामं सध्या सुरु असल्याची माहिती केंद्रीय रस्ते
वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. लातूर इथल्या १९ महामार्ग प्रकल्पाचं
लोकार्पण आणि भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. लातूर
मध्ये ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे, लातूर च्या
रिंगरोड संदर्भातील त्रुटी आणि लातूर पासून ते टेंभुर्णी पर्यंत रस्ता चार पदरी करण्याचं
आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. ते म्हणाले....
लातूर पासून तर टेंभूर्णीपर्यंतचा रस्ता, हा रस्ता
फोर लेन आम्ही नक्की करु, याच्यातून आपल्याला सुविधा होईल असा विश्वास आपल्याला देतो.
दुसरं, लातूरच्या रिंगरोड मध्ये काहीतरी चार-पाच किलोमीटर मिसिंग लिक़ आहे, तर ती पण
लिंक करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. ते पण मी करुन देईल. ब्रॉडगेज मेट्रो, हे
फार सुंदर आहे आणि तुम्ही जे लातूरला करावीत आणि त्याचं वैशिष्ट्य असंय की तीची स्पीड
आहे १४० किलोमीटर प्रति घंटा म्हणजे लातूर
ते सोलापूर दीडशे किलोमीटर तुम्ही जास्तीत जास्त १ तास १५ मिनिटात पोहोचाल. ही ब्रॉडगेज
मेट्रो जर सुरु केली तर मी याच्यात पूर्ण मदत करीन.
****
देशभरात आज संविधान दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त माहिती आणि
प्रसारण मंत्रालयातर्गंत कार्यरत चित्रपट विभागाच्या वतीनं राज्यघटनेत समाविष्ट केलेली
मूल्य आणि तत्त्व ठळकपणे मांडणारे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. हे विशेष चित्रपट
उद्या चित्रपट विभागाचे संकेतस्थळ filmsdivision.org आणि YouTube चॅनेलवर प्रदर्शित
केले जातील.
****
राज्यात काल ८४८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३३ हजार, १०५ झाली आहे. काल ५० रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
एक लाख ४० हजार ८५७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे.
काल ९७४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत
६४ लाख ७९ हजार ३९६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा
दर ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९ हजार १८७ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर
बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात १६ तर बीड जिल्ह्यात ९ नवे रुग्ण आढळले.
जालना ४,
लातूर ५, उस्मानाबाद ४, नांदेड ३ ,
तर हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
मराठवाडा रेल्वे प्रवासी महासघांनं आपल्या विविध मागण्यांसाठी
काल परभणी रेल्वे स्थानकावर घंटानाद आंदोलन केलं. टाळेबंदीनंतर अद्याप बंद असलेल्या
रेल्वे सुरू करण्यात याव्यात, या विभागातल्या
अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास मोठं आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात
आला. सर्व राजकीय पक्षाचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातला ढोकीचा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना
२५ वर्षासाठी भैरवनाथ शुगर इंडस्ट्रीजला भाडे तत्वावर देण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बॅंकेनं घेतला आहे. हा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी निविदा
काढण्यात आली होती.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्यावतीनं आयोजित आझादी का अमृत महोत्सव
व्याख्यानमालेत, आज आपण, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अग्निदिव्य आणि भारतीय स्वातंत्र्य
लढा’, या विषयावर, नाशिक इथल्या के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे
प्राध्यापक संतोष शेलार यांनी दिलेलं व्याख्यान ऐकणार आहात.
स्वातंत्र्य लढ्यात मवाळ अथवा जहाल यातल्या कोणत्याही प्रवाहाने
कधीही प्रकटपणे त्याकाळात थेट स्वातंत्र्याची मागणी केलेली नव्हती. सावरकर मात्र या
बाबतीत अतिशय स्पष्ट विचारांचे होते. आपल्याला परिपूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. केवळ
वसाहतीचे स्वराज्य नाही ही त्यांची भूमिका पहिल्या पासून स्पष्ट होती. सावरकरांच्या
क्रांती जीवनाविषयी माहिती देतांना प्राध्यापक संतोष शेलार म्हणाले...
परिपूर्ण
स्वातंत्र्य हवं आहे. केवळ वसाहतीचं स्वराज्य नाही ही त्यांची भूमिका पहिल्यापासून
स्पष्ट होती. सावरकारांनी मॅजिनिजच्या आत्मचरित्राचा अनुवाद केला. त्याला सावरकरांनी
लिहीलेली दीर्घ प्रस्तावना कित्येक क्रांतीकारकांनी
तोंडपाठ करुन टाकलेली होती. इतकी ती महत्वाची होती. या ग्रंथात दास्यमुक्तता, राष्ट्रीय
ऐक्य, समता, आणि लोकसत्ता या चार घोषणा सातत्यानी येतात. यातून सावरकरांची या काळातली
विचारांची दिशा स्पष्ट होते.
आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून
या व्याख्यानाचं प्रसारण होईल. औरंगाबाद ए आय आर न्यूज - आकाशवाणी समाचार औरंगाबाद
या युट्यूब चॅनलवरही हे व्याख्यान श्रोत्यांना ऐकता येईल.
****
कानपूर इथं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात,
काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात चार बाद २५८ धावा केल्या. आज दुसऱ्या दिवसाचा
खेळ सुरू होईल तेंव्हा पहिली कसोटी खेळत असलेला श्रेयस अय्यर ७५ आणि अष्टपैलू रविंद्र
जडेजा ५० धावांवरुन पुढं खेळण्यास सुरुवात करतील. श्रेयस आणि रविंद्रनं सुरेख फलंदाजी
करत पाचव्या गड्यासाठी १०९ धावांची नाबाद भागिदारी केली आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन रुग्णालयाची `अमासिकॉन २०२१`
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. आज सुरू होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेत
पोटाची दुर्बिणीद्वारे होणारी शस्त्रक्रिया `लॅप्रोस्कोपीक`चा जगभरात प्रचार आणि प्रसार
करण्यात येणार असल्याचं रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सुर्यवंशी यांनी काल पत्रकार
परिषदेत सांगितलं. जगभरातील सुमारे दहा हजार डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार असल्याचं
ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment