Thursday, 25 November 2021

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.11.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 November 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य परिवहन महामंडळ -एसटी कर्मचाऱ्यांचं मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आज मागे घेत असल्याची घोषणा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं खोत यांनी जाहीर केलं आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि महिन्याला १० तारखेच्या आत पगार देण्याची घोषणा केली असून ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र विलिनीकरणाचा लढा सुरूच राहणार असून न्यायालयाच्या निर्णयानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला, तर त्यात कामगारांसोबत आम्ही उभे राहू असंही खोत यांनी यावेळी सांगितलं. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही खोत यांच्या घोषणेला सहमती दिली आहे. 

दरम्यान, विलीनीकरण सहित वेतनवाढीच्या मुद्द्यांवर बेमुदत संपावर गेलेले एसटी कर्मचारी पंधरा दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारनं- एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. त्यानंतर काल अंतरिम वेतन वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं दिला. त्यानुसार ४१ टक्के वेतनवाढ तसंच १० तारखेच्या आत दरमहा वेतन देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मान्य नाही. त्यांनी महामंडळाचं शासनामध्ये विलीनीकरण व्हावं अशी आग्रही मागणी लावून धरली आहे, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

****

मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी या तिन्ही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं ४ डिसेंबर २०१४ ला फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं ती रद्द करत या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत केलं आहे. २०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी अशी या आरोपींची नाव आहेत. २२ ऑगस्ट २०१३ ला एक छायाचित्रकार महिलेवर महालक्ष्मी भागातील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये पाच जणांनी बलात्कार केला होता. यातील सिराज खान नावाच्या आरोपीला सत्र न्यायालयानं या अगोदर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर पाचवा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

****

गेल्या सहा महिन्यांपासून फरार घोषित असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आज मुंबई गुन्हे शाखेसमोर हजर झाले. सिंग यांच्याविरूद्धही खंडणी उकळण्याचे पाच गुन्हे दाखल झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना अटकेपासून सरंक्षण देण्यात आलं आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर अटक होण्याच्या भीतीनं परमवीर सिंग मुंबईच्या बाहेर फरार झाले होते. सिंग यांनी गेल्या एप्रिल महिन्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सक्तवसुली संचालनालय- ईडीनं देशमुख आणि त्यांच्या कुटूंबियांची चौकशी सुरु केली असून देशमुख हे सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत आहे.

****

देशात गेल्या चोवीस तासांत ९ हजार ११९ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत १० हजार २६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी ३९ लाखांहून अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात एक लाख ९ हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान देशात आतापर्यंत ११९ कोटी ३८ लाखांहून अधिक तर गेल्या २४ तासांत ९० लाख २७ हजार नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं कळवलं आहे.

****

केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १३२ कोटी ३३ लाख कोविड लसींचा पुरवठा केला आहे. त्यापैकी २२ कोटी ७२ लाख लसींचा साठा शिल्लक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या ७ डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे यांनी ही माहिती दिली आहे. संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं.

****

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जालना पोलीस दलाच्या वतीनं शहरात मुली आणि महिलांकरीता स्वसंरक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून येत्या शनिवारपर्यंत पोलीस मुख्यालयातील बॅडमिंटन सभागृहात सकाळी आठ ते दहा या वेळेत हे शिबीर घेतलं जाणार आहे.

****

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कानपूर इथं खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३८ षटकांत तीन बाद १०६ धावा झाल्या होत्या. 

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...