Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो. आता तर देशभरातील
सामान्य जनता असो वा सरकारं असो, सध्या ग्राम पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत
महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे. या महोत्सवांतर्गत होत असलेले कार्यक्रम पाहून आंनंद
झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. ते आज ‘मन की बात’ या कार्यक्रम
मालिकेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.
येत्या १६
डिसेंबर रोजी देश १९७१ च्या युद्धाचं स्वर्ण जयंती वर्ष साजरं करत आहे. या दिनानिमित्त
पंतप्रधानांनी संरक्षण दल तसंच वीर आणि वीर मातांचं स्मरण केलं.
आदिवासी
समाजाचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेत देशानं आदिवासी गौरव सप्ताहसुद्धा
साजरा केला आहे. देशाच्या विविध भागांत झालेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, आदिवासी
समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवल्याचं मोदी म्हणाले.
जेव्हा आपण
निसर्गाचं संतुलन बिघडवतो किंवा त्याचं पावित्र्य नष्ट करतो, तेव्हाच आपल्याला निसर्गापासून
धोका उद्भवतो. मातेप्रमाणे निसर्गही आपलं पालन पोषण करतो आणि आपल्या जगात नवनवे रंग
भरतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत, ते आपण जपले पाहिजेत, त्यांना
पुन्हा मूळ स्वरूपात आणलं पाहिजे. यातच आपल्या सर्वांचं आणि जगाचं हित असल्याचं मोदी
म्हणाले. यावेळी त्यांनी तामिळनाडूतल्या तुतूकुडी बेटावर तिथल्या नागरिकांनी लावलेल्या
पाल्मिराच्या झाडांचं उदाहरण दिलं.
पंतप्रधान
मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थांशी संवाद साधून ही योजना कशी महत्वाची
आहे हे पटवून दिलं.
कल्पना आणि
नाविन्यपूर्ण संशोधन, जोखीम घेण्याची भावना आणि कुठलंही काम पूर्ण करण्याची जिद्द या
तीन गोष्टी युवकांची ओळख बनवतात हे सांगतांनाच युवकांना स्टार्टअपचं महत्व सांगितलं.
हे स्टार्टअपचं युग असून, स्टार्टअपच्या जगात आज भारत एक प्रकारे नेतृत्व करत आहे.
स्टार्टअपला विक्रमी गुंतवणूक मिळत असून, हे क्षेत्र अतिशय वेगानं पुढे जात असल्याचं
पंतप्रधान म्हणाले. देशातल्या छोट्या-छोट्या शहरातदेखील स्टार्टअपची व्याप्ती वाढली
असून दर दहा दिवसात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचं मोदी म्हणाले.
****
दक्षिण आफ्रिकेत
सापडलेल्या कोरोना विषाणुच्या नव्या ओमिक्रॉन प्रतिरूपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी साडे पाच वाजता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची
बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री राज्यातील एकंदरीत परिस्थिती आणि सोयी सुविधांचा
आढावा घेतील. राज्यानं पूर्वकाळजी म्हणून काही निर्बंध लावले आहेत. मुंबई पालिकेनंही
आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान
मोदी यांनीही काल केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
****
देशात आतापर्यंत
१२१ कोटी ९४ लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीकरण झालं आहे. काल दिवसभरात ८२ लाख ८६
हजारांहून अधिक लसीकरण करण्यात आलं असून देशातला कोविड संक्रमणातून रूग्ण बरे होण्याचा
दर ९८ पूर्णांक ३४ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत ८ हजार सातशे ७४ नव्या रुग्णांची
भर पडली असून, ९ हजर चारशे ८१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. देशात
आतापर्यंत ६३ कोटी ९४ लाखांहून अधिक कोविड नमुन्यांचं परीक्षण झालं असून, सध्या देशात
एक लाख पाच हजार रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
महात्मा
ज्योतिबा फुले आणि सेनापती बापट यांच्या पुण्यतिथी निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांनी महात्मा फुले आणि सेनापती बापट यांना अभिवादन केलं.
मागासवर्गीयांचं
कल्याण आणि महिला सशक्तिकरणासाठी सदैव समर्पित महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले
आणि सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक आणि समाजसेवक सेनापती बापट यांना पुण्यतिथीनिमित्त
विनम्र अभिवादन असं नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
सोलापूर
जिल्ह्यात माढा तालुक्यात भीमानगर पुलाजवळ काल रात्री ११ वाजता मळीचा टँकर आणि तांदळाच्या
ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले.
इंदापूरहून सोलापूरकडे निघालेल्या टँकरवर समोरुन येणारा तांदळाचा ट्रक दुभाजकाला धडकून
आदळला. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असून इंदापूर जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात
आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि
न्यूझीलंड दरम्यान कानपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या
चौथ्या दिवशी भारतानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ६ गडी बाद १०७ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment