Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ नोव्हेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू
प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या
दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी
सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली
आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि
१०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
· संसदेच्या
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक.
· केवळ
कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी आर्थिक, सामाजिक, मनोरंजन आणि सांस्कृतिक
क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः शिथिल.
· ओमिक्रॉन
विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याची राज्याची केंद्र
सरकारकडे मागणी.
· राज्यात
८८९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोन रूग्णांचा मृत्यू तर ५२ बाधित.
· राज्यातल्या
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांकडून जनतेचे
आभार व्यक्त.
· राज्य
मार्ग परिवहन महामंडळाचे राज्यभरात १८ हजाराहून अधिक कर्मचारी कामावर रुजू.
आणि
· न्यूझीलंडविरुद्धच्या
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला ६३ धावांची आघाडी.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं
आज सकाळी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळित
चालावं यासाठी सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य मिळवण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद
जोशी यांनी ही बैठक बोलावली आहे.
राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनीही आज विविध राजकीय
पक्षांच्या सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेतलं कामकाज सुरळित पार पाडण्यासंदर्भात
या बैठकीत चर्चा होणार आहे.
उद्यापासून सुरु होणारं हे अधिवेशन २३ डिसेंबर पर्यंत चालणार
आहे.
****
केवळ कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी आर्थिक, सामाजिक,
मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात आले आहेत. अन्य
लोकांच्या संचारावर निर्बंध कायम असणार आहे. जागतिक स्तरावर ‘ओमिक्रोन’ नावाच्या नव्या
विषाणूचं प्रतिरूप आढळल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधासंदर्भातल्या नव्या मार्गदर्शक
सूचना राज्य शासनानं काल जारी केल्या, त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे.
बंदिस्त सभागृहं, सिनेमागृहं किंवा मंगल कार्यालयातल्या कार्यक्रमांना
सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना क्षमतेच्या
२५ टक्के उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थितांची संख्या
एक हजारापेक्षा अधिक झाली, तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला संबंधित कार्यक्रमाची
पाहणी करून, कार्यक्रम अंशत: किंवा पूर्णत: बंद करण्याचा अधिकार आहे.
इतर राज्यातून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं
कोविड लसीकरण पूर्ण झालेलं असणं यापुढे अनिवार्य असेल. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना केंद्र
शासनाच्या नियमांचं पालन बंधनकारक असेल.
नाकातोंडाला पूर्ण झाकणारा मास्क कायमस्वरूपी वापरण्याची सूचना
करण्यात आली असून, मास्कऐवजी हातरुमाल बांधलेला चालणार नाही, असं स्पष्ट नमूद करण्यात
आलं आहे. कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ५०० रूपयांचा
तर संस्था किंवा आस्थापनांना १० हजार ते ५० हजार रूपयांचा दंड आकारला जाईल, असं या
नियमांत स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’ हा कोविडचा नवा अवतार सापडल्याच्या
पार्श्वभूमीवर या देशाची विमानसेवा बंद करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं,
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते काल जालना इथं बोलत होते.
या नव्या अवताराचा प्रवेश होऊ नये, यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचं, टोपे
यांनी सांगितलं. विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची पूर्ण चाचणी केली जात असल्याची
माहिती टोपे यांनी दिली.
****
राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकारचा संसर्ग आढळला तर काही बंधन
घालावी लागतील असा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते काल पुण्यात
कोविड आढावा बैठकीत बोलत होते. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी
राज्यात तयारी सुरु झाली असून, यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री बैठक
घेतील, असंही त्यांनी सांगितलं. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत केंद्र सरकारनं
तयार केलेल्या नियमावलीचं पालन केलं जाईल अशी माहिती पवार यांनी दिली.
****
राज्यात काल ८८९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३३ हजार, ६१२ झाली आहे. काल १७ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
एक लाख ४० हजार ९०८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे.
काल ७३८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ८० हजार ७९९ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे.
राज्यात सध्या आठ हजार २५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर
औरंगाबाद इथं २ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर आणि बीड इथं प्रत्येकी
१२ रुग्ण आढळले, औरंगाबाद जिल्ह्यात ९, उस्मानाबाद ८, जालना सात, नांदेड आणि परभणी
जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण
आढळला नाही.
****
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने आज दोन वर्ष पूर्ण केली
आहेत. या दोन वर्षात राज्यातील जनतेनं सरकारला आपलं मानून केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटं आली,
पण सरकार विचलीत झालं नाही, यापुढेही होणार नाही. कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या
भल्यासाठी आमचं काम सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी
सरकारच्या दोन वर्षांच्या कारर्किदीत अनेक संकटं येऊनही विकासाची प्रक्रिया निरंतर
सुरुच राहिल्याचं मत व्यक्त केलं आहे. राज्य सरकारनं दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याबद्दल
राज्यातल्या जनतेला शुभेच्छा देतानाच, या काळात सरकारला सहकार्य दिल्याबद्दल जनतेचे
त्यांनी आभार मानले आहेत.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीचे राज्यभरात १८ हजाराहून
अधिक कर्मचारी काल कामावर रुजू झाले. यामध्ये दोन हजार १३० चालक तर २ हजार ११२ वाहकांचा
समावेश आहे. काही ठिकाणी पोलिस सुरक्षेत एसटी बसेस सोडण्यात आल्या. दरम्यान, महामंडळाने
शुक्रवारपर्यंत तीन हजार २१५ कायम कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून, एक हजार २२६ रोजंदारी
कामगारांच्या सेवा समाप्त केल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सूचनेनुसार
कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात आल्याने, आजपर्यंत बहुतांशी
कामगारांनी कामावर हजर होणं अपेक्षित असल्याचं, एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद विभागातील साडे तीनशे कर्मचारी काल कामावर हजर झाले.
हजर झालेल्या चालक, वाहकांच्या मदतीनं तुळजापूर आणि उमरगा आगारातून प्रत्येकी दोन बस
सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उस्मानाबाद आगारातील एका बसला डेपो बाहेर काढतांना
चालक चक्कर येऊन कोसळला. त्याला उचलण्यासाठी गेलेल्या आगार संचालकाच्या अंगावर आंदोलनकर्ते
धावून गेल्यानं काही काळ उस्मानाबाद बस स्थानकात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला वैद्यकीय उपचारांसाठी तात्काळ दवाखान्यात दाखल केलं.
महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर
यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात दोनशे कर्मचारी काल कामावर रूजू झाल्याचं, विभागीय
नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितलं. काल बसच्या चार फेऱ्याही झाल्या. दरम्यान, अंबाजोगाई
- बीड बसवर मांजरसुंभा इथं अज्ञात लोकांनी दगडफेक केली, या संदर्भात नेकनूर पोलिस ठाण्यात
अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामावर रुजू होत असलेल्या कामगारांना
संरक्षण देण्यात येत असल्याची माहिती मोरे यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून
सकाळी ११ वाजता जनतेशी संवाद साधतील. मन की बात या कार्यक्रम मालिकेतला हा ८३ वा भाग
असेल. हा कर्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून थेट प्रसारित केला
जाणार आहे.
****
भ्रष्टाचाराच्या, गैरवर्तनाच्या आरोप असलेल्या मंत्र्यांना पाठीशी
घालणाऱ्या आणि शेतकरी, एसटी कर्मचारी, राज्यसेवा आयोगाचे विद्यार्थी अशा अनेक समाजघटकांच्या
न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला आहे.
अशा कुचकामी सरकारचा जनता जनार्दनच योग्य वेळी निकाल लावेल, अशी टीका राज्याचे माजी
मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद
इथं महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष या अंतर्गत पत्रकार परिषदेत बोलत
होते. परिवहन मंत्र्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे.
****
राज्यातील लघु उद्योग कोविडमुळे अडचणीत आले आहेत. त्यांना उभं
राहण्याची ताकद देण्यासाठी आणि नवीन आव्हानं पेलण्यासाठी सर्व जिल्ह्यात उद्योजकांचे
मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती लघु भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र
वैद्य यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्योग वाढ, आर्थिक
शिस्त आणि साक्षरता, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि त्याच बरोबर मानव संसाधन विकास
आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार
असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान कानपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या
कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी भारतानं ६३ धावांची आघाडी घेतली आहे. त्यापूर्वी
न्यूझीलंडचा पहिला डाव २९५ धावांवर संपुष्टात आला. अक्षर पटेलनं पाच, रविचंद्रन अश्विननं
तीन तर रवींद्र जडेजा आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. कालच्या दिवसाचा खेळ
थांबला तेव्हा भारताच्या एक बाद १४ धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा ९ तर मयंक अग्रवालच्या
चार धावा झाल्या आहेत.
****
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातल्या पिकांचं नुकसान झालेल्या
सुमारे ८२ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल विमा कंपनीकडून
५७ कोटी ५३ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. जिल्हा कृषी अधिकारी भास्कर रणदिवे
यांनी काल ही महिती दिली. सदर विमा रक्कम अद्याप शेतकऱ्यांना वाटप झालेली नसून, आणखी
८० हजार २१५ पीकविमा धारक शेतकऱ्यांच्या पिकांची विमा भरपाई निश्चित करण्याचं काम सुरू
असल्याचं रणदिवे यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं तीन दिवसीय ‘यशवंतराव चव्हाण स्मृती
समारोहा’चा काल पद्मश्री वामनराव केंद्रे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या प्रसंगी
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ समितीतर्फे पंजाबराव डख, पंडित गिरीश गोसावी,
सिध्दार्थ सोनवणे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. झपाटून काम केल्यामुळे
देशात महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यासारखी क्षमता असणारी व्यक्तीमत्व उत्तुंग झाल्याचं
मत केंद्रे यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
No comments:
Post a Comment