Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 November 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक
लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही
मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी
सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली
आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६
आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत
वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी चार महिने
मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
** राज्यात चार महानगरपालिकांमधल्या रिक्तपदांसाठी २१
डिसेंबरला पोटनिवडणूक
** महिला सुरक्षेच्या मुद्यावर अपयशी ठरलेल्या महाविकास
आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही - खासदार रक्षा खडसे यांची टीका
आणि
** आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या
परभणी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
****
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी चार महिने
मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री
अनुरागसिंह ठाकूर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.
ही योजना मार्च २०२२ पर्यंत चालू राहील. याअंतर्गत अन्नधान्यावरच्या अतिरिक्त अनुदानापोटी
५३ हजार ३४४ कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सुधारित तीनही कृषी कायदे रद्द
करण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे रद्दबातल
ठरण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं, अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितलं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी १९ नोव्हेंबरला देशवासियांना उद्देशून केलेल्या
भाषणात हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती.
****
भारतीय अन्न महामंडळाद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गौरवशाली सप्ताहाचं
आज बोरिवली इथं आयोजन करण्यात आलं होतं. 'भारतीय अन्न महामंडळाच्या पश्चिम विभागातील
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यात मिळून २०१४-१५ मध्ये
७१ लाख टन धान्याची खरेदी झाली होती. २०२०-२१मध्ये हे प्रमाण ११९ लाख टनांवर पोहोचल्याचं
भारतीय अन्न महामंडळाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक आर. पी. सिंह यांनी यावेळी
सांगितलं. भारतीय अन्न महामंडळानं तामिळनाडूत तंजावर इथं उभारलेल्या अन्न सुरक्षा संग्रहालयाची
माहिती देणारी ध्वनिचित्रफित यावेळी दाखवण्यात आली
****
राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ
बैठकीत उद्या मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर परवानगी दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी दिली. सध्या राज्यात डेल्टा प्लस प्रकारचा कोरोना अस्तित्त्वात आहे,
नवीन प्रकार आलेला नाही, संपूर्ण लसीकरण हाच सध्या कोरोनावर एकमात्र उपाय आहे. राज्यात
आतापर्यंत कोविड लसीच्या १० कोटी ८४ लाख मात्रा दिल्या आहेत. आतापर्यंत ८० टक्के लाभार्थ्यांना
लसीची पहिली मात्रा, तर ४० टक्के लाभार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्या आहेत,
असंही त्यांनी सांगितलं. ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झालं आहे, त्या जिल्ह्यांमध्ये
आशा, अंगणवाडी कर्मचारी, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी
जाऊन लसीकरणाचं लक्ष्य दिलं आहे, असंही ते म्हणाले.
****
धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड
या चार महानगरपालिकांमधल्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार
आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी २९ नोव्हेंबरपासून
६ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. ७ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल तर ९ डिसेंबरपर्यंत
अर्ज मागे घेता येतील. मतमोजणी २२ डिसेंबरला होणार आहे.
****
विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळेत नियुक्त शिक्षक तसंच
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या
वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेच्या वतीनं ३१ ऑक्टोबरला राज्यव्यापी
आंदोलन केलं होतं. यावरही मागणीचा विचार न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा
इशारा संघटनेने दिला आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक
आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांना पाठवलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टुनकी गावांमधून
१४ पिस्तुल आणि १६० जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी ३ आरोपींना अटक
करण्यात आली असून सदरची कारवाई ही झारखंड दहशतवादी विरोधी पथकानं केल्याची माहिती आमच्या
वार्ताहरानं दिली आहे.
****
औरंगाबाद इथं गुंगीकारक औषधी गोळ्यांचा अवैध साठा पोलिसांनी
जप्त केला आहे. या प्रकरणी पाच गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून
५९६ गुंगीकारक औषधी गोळ्यांचा साठा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून
सांगण्यात आलं आहे.
****
महिला सुरक्षेच्या मुद्यावर अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी
सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची टीका, खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.
त्या आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह
राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा
आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही. या विषयात महाविकास आघाडी सरकारची बेफिकीरी आणि
निष्क्रीयता चीड आणणारी असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. आता महिलांनी स्वसुरक्षेसाठी
स्वत:च कायदा हाती घ्यायचा की राज्य सरकारप्रमाणे त्यांनीही घरातच बसून राहायचं, असा
सवाल खासदार खडसे यांनी यावेळी केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार
बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषद सदस्य असलेले
दुर्राणी गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील पक्षांतर्गत घडामोडीत पक्षश्रेष्ठींनी
घेतलेल्या काही निर्णयावर नाराज होते, या अस्वस्थतेतूनच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं,
बोललं जात आहे. पक्षीय वर्तुळातूनही ते अलिप्त दिसून येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील सांगवी या
गावाजवळ खाद्यतेलाचा टँकर उलटला. टँकरमधून तेलाची गळती सुरु झाल्यानं गावातील नागरिकांनी
मिळेल त्या भांड्यातून खाद्य तेल घेवून जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी
जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात कामठा फाटा इथं आज शेतकरी संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी शेतकरी मित्र, पर्यावरण तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना बदलत्या निसर्गाचं अचूक वेध घेण्याचं तंत्र अवगत कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं. विज्ञान, निसर्ग आणि संस्कृती यांचा एकमेकांशी परस्पर संबंध जाणून घेतला की निसर्गाच्या हालचालींचा अचूक वेध कळतो, असं डख यांनी नमूद केलं.
****
No comments:
Post a Comment