Friday, 26 November 2021

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.11.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 November 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशभरात आज संविधान दिन साजरा होत आहे. संविधान दिनानिमित्त आज नवी दिल्लीत संसद भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं. ‘हम भारत के लोग’ या वाक्यानं सुरु होणारं संविधान भारतीयांच्या आकांक्षांची आधुनिक अभिव्यक्ती असल्याचं राष्ट्रपती कोविंद म्हणाले. संविधान डिजिटल स्वरुपात सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलं असून देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला, विशेषत: तरुण वर्गाला भारतीय कला, संस्कृती आणि वैशिष्ट्यांची माहिती यामुळे मिळेल, या डिजिटल उपलब्धीमुळे सामान्य जनांना देशाच्या संवैधानिक प्रगतीची माहिती मिळेल असंही राष्ट्रपती म्हणाले.

भारतीय संविधान ही हजारो वर्षांची भारतीय परंपरा तसंच विचारधारेची आधुनिक अभिव्यक्ती असून अनेक भाषा, अनेक संस्कृती आणि अनेक प्रादेशिक विविधता असलेल्या भारताला संविधानानं एकत्र बांधलं असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी संविधानाचं महत्व जाणून कार्य करावं असं ते म्हणाले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या रुपात अमूल्य भेट दिली असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण होत आहेत. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या वीरांच्या त्यागाबद्दल प्रत्येक भारतवासी त्यांचा कृतज्ञ राहील, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना ट्वीटद्वारे आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही या दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.

****

कोविड लसीकरण अभियानाअंतर्गत देशात आतापर्यंत १ अब्ज २० कोटी १७ लाखांहून अधिक लसीकरण झालं आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ८३ लाख ८८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. काल दिवसभरात देशात १० हजार ५५९ नवे कोरोना विषाणुबाधित रुग्ण आढळले तर ९ हजार ८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोना विषाणू संसर्गमुक्तीचा दर आता ९८ पूर्णांक ३ टक्के असून सध्या देशात १ लाख १० हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, कोविड लसीकरण अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात ११ कोटी लसीकरण झालं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ३ कोटी ७६ लाख नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असून ७ कोटी २३ लाख नागरिकांनी एक लस घेतली आहे असं ते म्हणाले. नागरिकांनी अधिकाधिक संख्येनं लसीकरणासाठी प्रेरित व्हावं यासाठी राज्य सरकार जनजागृतीपर अनेक कार्यक्रम राबवत असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

****

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. मिशन वात्सल्यबाबत विभागीय स्तरावर महिन्यातून एकदा, जिल्हास्तरावर महिन्यातून दोनदा आणि तालुकास्तरावर आठवड्यातून एक बैठक घेण्यात यावी. तसंच या सर्व बैठकीचा आढावा महिला आणि बालविकास आयुक्तांना पाठवण्याबाबतही त्यांनी सूचित केलं. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली असून सर्व तालुक्यातील विधवा महिलांचं सर्वेक्षण करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरूख, संगमेश्वर परिसरात काल रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सकाळी धुकं, दुपारी ऊन आणि सायंकाळी पावसाळी वातावरण अशा विचित्र हवामानाचा अनुभव घेत असतानाच रात्री हा धक्का जाणवला. देवरूख परिसराला गेल्या पंधरा दिवसांत बसलेला भूकंपाचा हा दुसरा धक्का आहे.

****

भारत आणि न्युझीलंड यांच्यात कानपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त आलं तेव्हा न्युझीलंडच्या पहिल्या डावात चार षटकांत बिनबाद आठ धावा झाल्या होत्या. त्याआधी भारताचा पहिला डाव ३४५ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून श्रेयस अय्यरनं १०५, शुभमन गिलनं ५२, रविंद्र जडेजानं ५० तर रविचंद्रन अश्विननं ३८ धावा केल्या. न्युझीलंडकडून टीम साऊदीनं सर्वाधिक पाच तर केल जेमिसननं तीन आणि अजाझ पटेलनं दोन गडी बाद केले.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...