Sunday, 28 November 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 November 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 November 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ नोव्हेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र साजरा होत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त

** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरवात; भाजप तसंच काँग्रेसकडून खासदारांना व्हीप जारी

** ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा समारोप; जीतेंद्र जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर गोदावरी चित्रपटाला ज्युरींचा विशेष पुरस्कार 

आणि

** कानपूर क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं न्यूझीलंडसमोर २८४ धावांचं लक्ष्य

****

स्वातंत्र्याचा मृत महोत्सव, ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. आदिवासी समाजाचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेत देशानं आदिवासी गौरव सप्ताहसुद्धा साजरा केला. देशाच्या विविध भागांत झालेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, आदिवासी समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडल्याचं मोदी म्हणाले.

येत्या १६ डिसेंबरला देश १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धातल्या विजयाचं सुवर्ण जयंती वर्ष साजरं करत आहे. यानिमित्त पंतप्रधानांनी संरक्षण दल तसंच वीसैनिक आणि वीर मातांचं स्मरण केलं.

आपल्या आजूबाजूला असलेले नैसर्गिक स्रोत आपण जपले पाहिजेत, त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणलं पाहिजे, यातच आपल्या सर्वांचं आणि जगाचं हित असल्याचं मोदी म्हणाले.

 

पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थांशी संवाद साधून ही योजना कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिलं. कल्पक तसंच नाविन्यपूर्ण संशोधन, जोखिम पत्करण्याची भावना आणि काम पूर्ण करण्याची जिद्द या तीन गोष्टी युवकांना ओळख मिळवून देतात, हे सांगतांनाच पंतप्रधानांनी युवकांना स्टार्टअपचं महत्त्व सांगितलं. पुण्यातले तरुण उद्योजक स्मॉल स्पार्क कन्सेप्टचे संस्थापक मयूर पाटील यांच्याशी संवाद साधत पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं. आपलं स्टार्टअप आणि पंतप्रधानांशी झालेला संवाद, याबाबतचा अनुभव मयूर पाटील यांनी या शब्दांत व्यक्त केला...

पंतप्रधानांनी आपल्या कामाची दखल घेतली हा अनुभव शब्दात सांगण्या सारखा नाही. जेव्हा Small Spark Concept सुरु केले होते, तेव्हा एकच ध्येय होते की, वाढत्या वायू प्रदूषणामुळे आणि इंधन दरवाढीमुळे आपल्या सगळ्यांना जी अडचण होते त्याला टाळा बसवण्यासाठी सोल फिल्टर हे भारतात सगळ्या गाड्यांवरती बसवले जावे. २०११ साली कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी संशोधन सुरु केले, ते २०१८ मध्ये पूर्ण झाले. आणि २०२१ मध्ये या तंत्रज्ञानाला पेटंट ही ग्रँड झाले. यानंतर नीती आयोगाद्वारे आयोजित केलेल्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल न्यू इंडिया चँलेज या स्टार्टअप कॉम्पिटिशन मध्ये Small Spark चे टॉप २४ स्टार्टअप मध्ये सिलेक्शन झाले आणि केंद्र सरकारकडून कंपनीला प्रथमच ग्रँड सॅंक्शन झाले.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सुधारित तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचं विधेयक कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर उद्या संसदेसमोर मांडणार आहेत.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संसद भवनात सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे,  समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, तसंच द्रमुक, वायएसआर काँग्रेस, लोकजन शक्ती पक्ष, अपना दल या पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षासह काँग्रेसनं आपापल्या लोकसभा सदस्यांना उद्या सभागृहात हजर राहण्यासाठी व्हीप अर्थात पक्षादेश जारी केला आहे.

****

भारत हा चित्रपटनिर्मितीचंच नव्हे तर निर्मितीपश्चात प्रक्रिया केंद्र बनवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. प्रसिद्ध कवी, लेखक प्रसून जोशी यांना यंदाच्या इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याहस्ते प्रसून जोशी यांना शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. मराठी अभिनेते जीतेंद्र जोशी, दाक्षिणात्य अभिनेते धनुष यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. निखील महाजन दिग्दर्शित गोदावरी चित्रपटाला ज्यूरीचा विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

सोहळ्याला उपस्थित असलेले ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासह अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

देशात विविध राज्यांमधून होणाऱ्या अवयव दान आणि प्रत्यारोपणात यंदा महाराष्ट्रानं अव्वल क्रमांक पटकवला आहे. राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण विभागानं जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला राज्यस्तरीय; तसंच विभागीय स्तरावर पुरस्कार मिळाला आहे. काल २७ नोव्हेंबर या राष्ट्रीय अवयव दान दिनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते दिल्ली हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात या वर्षी ८८ जणांनी अवयव दान केलं, २४४ गरजूंना ते अवयव उपयोगी ठरले, अशी माहिती, पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या संचालक आरती गोखले यांनी यावेळी दिली.

****

न्यूझीलंडविरुद्ध कानपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आपला दुसरा डाव आज २३४ धावांवर घोषीत करत, न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केलं.  जिंकण्यासाठी २८४ धावांचं लक्ष्य असलेल्या न्यूझीलंड संघानं आजचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात एक बाद चार धावा केल्या. उद्या खेळाच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला न्यूझीलंडचे ९ फलंदाज बाद करावे लागतील, तर न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावा कराव्या लागणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव बस आगारातून तब्बल २१ दिवसा नंतर पोलीस बंदोबस्तात बस फेऱ्या सुरू झाल्या. औरंगाबाद जालना बससेवाही पोलीस बंदोबस्तात सुरू झाल्याचं वृत्त आहे.

****

जालना जिल्ह्यात आज तीन नवीन कोविड-१९ संसर्गानं बाधित रुग्ण आढळून आले. तर कोविडमुक्त झालेल्या सात रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या बाधित असलेल्या केवळ ३७ रुग्णांवर पचार सुरू आहेत. दरम्यान, आज एका कोरोना बाधितचा मृत्यू झाला.

****

No comments: