Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, या पार्श्वभूमीवर चाचण्या वाढवण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह नागालॅंड,
सिक्किम, केरळ, गोवा,
मणिपूर, मेघालय, मिझोराम,
जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि लद्दाख या राज्यांना
दिले आहेत. या संदर्भात आरोग्य सचिव राजेश भूषण
यांनी या सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. सध्या
देशात या संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आहे.
मात्र, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण जरी होत असलं तरी
जगातील काही देशांमध्ये चौथी आणि पाचवी लाट बघायला मिळत आहे. त्यामुळे चाचण्यांचा
दर वाढवण्यावर भर देण्याची सूचना केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं केली आहे.
दरम्यान, कोविड संसर्गातून
रूग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ३३ शतांश टक्क्के झाला आहे. गेल्या वर्षीच्या
मार्च महिन्यापासूनचा हा सर्वात जास्त दर आहे. देशात
काल कोविडचे नऊ हजार २८३ नवे रूग्ण आढळले
तर एकूण दहा हजार ९३९ रूग्ण या संसर्गातून बरे झाले. सध्या देशात एक लाख ११ हजार ४८१
उपचाराधीन आहेत.
देशांतर्गत लसीकरणात आतापर्यंत ११८ कोटी ४८ लाख कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
झालं आहे.
****
माजी क्रिकेटपटू, पूर्व दिल्ली मतदारसंघाचे खासदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना आयएसआयएसनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार
नोंदवली आहे. गंभीर यांच्या तक्रारीनंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली
आहे. ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत आता ट्रू व्होटर अॅपच्या माध्यमातून नोंदवता
येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी काल दिली.
या अॅपद्वारे आधी स्थानिक निवडणुका, उमेदवार आणि
त्यांचे राजकीय पक्ष यांची माहिती दिली जात असे. तसेच, मतदार
संघ शोधण्यासाठीही या अॅपचा वापर होत होता. आता त्यात मतदार नोंदणीच्या सुविधेची भर
पडली आहे. पुढील वर्षी एक जानेवारीपर्यंत वयाची १८
वर्षे पूर्ण करणाऱ्यांना नावनोंदणी करता येणार आहे. या अॅपवर मतदारांना त्यांच्या नावात
आणि पत्त्यामध्ये सुधारणाही करता येणार असल्याचं मदान यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचं असून लसीकरणाचं महत्व, गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जालना इथल्या बंजारा महिलांकडून बोली भाषेतून
लसीकरणाचा प्रचार-प्रसार केला जात आहे. स्थानिक भाषेत लसीकरणाबाबत जनजागृती केली
जात असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे.
****
अमरावती शहरामधील सर्व व्यवहार आता सुरळीत
झाले असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी दिली. गेल्या आठवड्यात दोन दिवस शहरात हिंसक घटना घडल्या होत्या.
त्यानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात
आली. सध्या सकाळी ७ वाजेपासून
रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू आहे. रात्री ९ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी
आहे, असं डॉक्टर सिंह यांनी
प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितलं. या हिंसाचारप्रकरणी
आतापर्यंत एकूण ५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ३१५ आरोपी असल्याचं त्या म्हणाल्या.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘चला आपल्या गावाकडे जाऊ या!’ ही एक दिवसीय मोहिम आज
राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या मूळ गावी जावून वाड्या
वस्त्यांवर तसच गावामध्ये लस न घेतलेल्या
पात्र नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. ही मोहिम यशस्वी
करण्याच आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं येत्या एक
जानेवारी २०२२ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य
संस्थांकडून दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
नाट्यस्पर्धा सादरीकरण दिनांक १५ जानेवारी पासून सुरुवात होईल, अशी घोषणाही देशमुख यांनी काल केली. जास्तीत जास्त संस्थांनी या स्पर्धेत
सहभाग नोंदवावा, असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे.
****
मुंबईतील नालासोपारा इथल्या कथित स्फोटकं प्रकरणात बेजबाबदार वक्तव्य
केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई उच्च
न्यायालयानं नोटीस पाठवली आहे. आव्हाड यांना येत्या १९ जानेवारीला प्रत्यक्ष
उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
****
सरकारनं प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत तीन लाख ६१ हजार घरं निर्माण
करण्यास मंजूरी दिली आहे. काल नवी दिल्ली
इथं घरं आणि शहरी मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली
केंद्रीय मंजूरी आणि निगराणी समितीच्या ५६ व्या बैठकीत या प्रस्तावांना मंजूरी
देण्यात आली. या
सोबतच या योजनेअंतर्गत एक कोटी १४ लाख घरं निर्माण करण्यासही मंजूरी देण्यात आलेली
आहे
****
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत काल धुळे जिल्ह्यातल्या सर्व शाळा
आणि अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतेचा उपक्रम राबवण्यात आला.
****
No comments:
Post a Comment