Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
November 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेत
गत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गदारोळ घातलेल्या १२ खासदारांचं निलंबन रद्द
करण्याची विरोधी पक्षांची मागणी, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. त्यामुळे
विरोधी पक्ष सदस्यांनी आज सदनात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ही घटना मागच्या अधिवेशनातली
असून, आत्ता त्यावर कारवाई कसकाय होऊ शकते, असा प्रश्न विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी विचारला. या सदस्यांनी आपल्या वागणुकीवर पश्चात्ताप देखील व्यक्त केला नसल्याचं,
नायडू म्हणाले. त्यानंतर या निर्णयाचा विरोध करत काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि राष्ट्रीय
जनता दलाच्या खासदारांनी सभात्याग केला.
लोकसभेत
कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या
प्रश्नांवर फलक झळकावत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. राज्यसभेत १२ खासदारांना निलंबित
केल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे
लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
माजी मुंबई
पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या
कथित गुप्त बैठकीची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले असल्याचं, गृहमंत्री
दीलिप वळसे पाटील यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. जेव्हा एखादा
आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या
लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली, याची चौकशी करण्यात येईल,
असं ते म्हणाले. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची कारवाई सुरु असल्याचं गृहमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
ॲडमिरल आर
हरी कुमार यांनी आज २५वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते नौदल प्रमुख ॲडमिरल
करमबीर सिंग आज सेवानिवृत्त झाले. राष्ट्रीय सागरी हित आणि सागरी सुरक्षा आव्हानांवर
नौदलाचं लक्ष केंद्रीत असल्याचं, आर हरी कुमार म्हणाले.
****
देशात कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १२३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात
देशात ७८ लाख ८० हजार ५४५ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १२३
कोटी २५ लाख दोन हजार ७६७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या सहा हजार ९९० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १९० रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १० हजार ११६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ५४३
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील हंगरगा इथल्या अवैध डान्सबारवर पोलिसांनी काल
छापा टाकला. या कारवाईत २५ नृत्यांगना, ६४ ग्राहकांसह बारमालक तसंच व्यवस्थापकाविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेळेच्या निर्बंधाचं उल्लंघन करुन हा डान्सबार सुरु होता,
सोबतच अवैधरित्या दारु वितरीत केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही
कारवाई केली.
****
सध्या सुरू
असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-अकोला-पूर्णा या दोन्ही रेल्वे गाड्यांना
मुदतवाढ देण्यात आली आहे. तसंच येत्या पाच डिसेंबरपासून अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-तिरुपती-पूर्णा
या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.
****
राज्यातल्या
सर्व कृषि विद्यापीठ समन्वयातून शालेय विद्यार्थ्यांचं दरवर्षी कृषि-विज्ञान प्रदर्शन
आयोजित करावं, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या शिष्टमंडळानं, राज्यपाल भगतसिंग
कोश्यारी यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे केली. अश्या प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांची
कल्पनाशक्ती आणि कृषि क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होऊन, राज्य आणि देशपातळीवर
कृषि क्षेत्राचं नाव उंचावण्यास मदत होईल, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
परभणी शहर
महानगरपालिकेच्यावतीनं काल प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्लास्टिक बंदीची कारवाई करण्यात
आली. या कारवाईमध्ये पाच हजार रुपयांप्रमाणे तीन दुकानांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
शहरातील व्यापारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनी प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करू
नये, असं आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या
किशोरवयीन मुलींसाठी एक डिसेंबर रोजी संवाद कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा
परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी काल ही माहिती दिली. कोविड-19 मुळे मागील वर्षभरापासून
शाळा बंद असल्यामुळे, मुलींमधल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताण-तणावांचा विचार करून,
त्यांच्या शालेय गळतीचं प्रमाण, बालमजुरी तसंच बालविवाह यांच वाढत चाललेल्या प्रमाणाबद्दल
या कार्यशाळेत समुपदेशन केलं जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment