Sunday, 27 March 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २७ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिने मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

·      वाहनांमधून होणारं ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा करणार - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

·      सीएनजी वरील व्हॅट कपातीची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी

·      उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात औरंगाबादची स्वतंत्र ओळख - उद्योगमंत्री सुभाष देसाई

·      नांदेड जिल्ह्यात १५ गावांतून ७५ किलोमीटर जलवाहिनीच्या कामाचं उद्र्घाटन

·      औरंगाबाद इथं शार्ङ्गदेव महोत्सव तर लातूर इथं लावणी महोत्सवाला कालपासून प्रारंभ

आणि

·      पी. व्ही. सिंधू तसंच एच. एस. प्रणॉय यांची स्वीस खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

****

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही योजना येत्या ३१ मार्चला संपणार होती. मात्र काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोविडमुळे टाळेबंदी लागल्यानंतर केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली होती. त्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या अन्न योजनेंतर्गत गरिबांना दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिलं जातं.

****

वाहनांमधून होणारं ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात दोन महामार्गांचं लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता बनावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. या पुढे, बग्यास पासून तयार होणारं, बिटूमिन हे रस्त्यासाठी वापरलं जाणार आहे, ऊसापासून फक्त साखरे ऐवजी, इथनॉल बनवलं जावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दुष्काळी भागात खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा खर्च शासन करेल, तसंच मोफत शेततळी बांधून दिली जातील आणि जो कच्चा माल निघेल तो रस्त्यासाठी वापरला जाईल असं गडकरी यावेळी म्हणाले.

पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या १९० व्या वर्धापन दिनाच्या निमित्त गडकरी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. वाहनांना पारंपारिक वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसवले जातील असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य सरकारनं नैसर्गिक वायू सीएनजी वरील मूल्य वर्धित कर-व्हॅट, साडे तेरा टक्यांवरुन कमी करत तीन टक्के केला आहे. नवीन दर येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली.

****

उद्योजकता आणि नाविन्यतेच्या वृद्धीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टोपे यांनी या प्रकल्पाच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास नुकतीच मान्यता दिली. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यात कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारात वाढ होईल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

****

उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात औरंगाबादनं स्वत:ची ओळख निर्माण केली असल्याचं, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या ऑरीक औद्योगिक नगरीमध्ये विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी आठ देशातील राजदुतांसमवेत काल ऑरिक सिटीत झालेल्या बैठकीत देसाई बोलत होते. गुंतवणूकदारांना दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी ऑरिक सिटी हा उत्तम पर्याय असल्याचं देसाई यांनी नमूद केलं.

औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाइप निर्मिती कारखान्याची पालकमंत्री देसाई यांनी काल पाहणी केली. पाणी पुरवठा योजनेची कामं अधिक गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या.

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेनं अधिकारी वर्गासाठी पाच नवीन इलेक्ट्रॉनिक कार तसंच  शहरातील नाले सफाई, मलबा उचलणे या कामासाठी खरेदी केलेले तीन हायवा ट्रक ,या वाहनांचं काल पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

पोलीस दलात नवीन १५ चारचाकी वाहनांचा समावेश तसंच पोलीस अधीक्षक कार्यालय आवारातल्या सभागृहाचं उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काल झालं.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीनं एका दिवसात १५ गावांमधून ७५ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याच्या मोहिमेचा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला. पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधला. जिल्ह्यातील एक हजार ३१० ग्रामपंचायतीं अंतर्गत एक हजार २०५ ठिकाणी एक हजार कोटीं रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. ग्रामीण  जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू असून ही कामं निर्धारित वेळेत आणि दर्जात्मक करावीत अशी सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी केली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १३८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७३ हजार ३६९ झाली आहे. या संसर्गानं काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७७९ एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १३७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २४ हजार ६९७ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३ कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नांदेड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली तसंच लातूर जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम या वर्षी येत्या एक एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाचं हे पाचवं वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.

****

देशभरात १०० नवीन सैनिकी शाळा स्थापन करण्यात येणार आहेत. सामाजिक संस्था, खाजगी शाळा, राज्य सरकारांच्या भागीदारीतून अशा २१ नवीन सैनिक शाळांच्या स्थापनेला सरकारने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं आणि त्यांना सशस्त्र दलात सामील होण्यासह करिअरच्या संधी उपलब्ध करून देणं, हा या मागचा उद्देश आहे.

****

महात्मा गांधी मिशन ट्र्स्ट च्या महागामी गुरुकुलच्या वतीनं आयोजित शार्ङ्गदेव महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. महागामी गुरुकुलच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी , व्याख्यानांद्वारे प्रदर्शनीय कलांची सद्यस्थिती, त्यांचा कलात्मक दृष्टीकोन काय असावा, त्यातली आव्हानं कोणती याविषयी मार्गदर्शन केलं. या महोत्सवाअंतर्गत काल विद्यागम या प्रदर्शनीय कला शिक्षणावर आधारित परिसंवाद, ३ सत्रात घेण्यात आले. विज्ञान आणि संगीत समीक्षक मंजिरी सिन्हा, नृत्य समीक्षक लीला व्यंकटरमण आणि खैरागढ कला संगीत विद्यापीठाच्या कुलगुरु डॉक्टर मांडवी सिंग यांनी या परिसंवादात मार्गदर्शन केलं. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा समारोप ३० तारखेला होणार आहे.

****

लातूर इथं तीन दिवसीय लावणी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्र्घाटन झालं. लावणी, दशावतार, खडी गंमत, झाडी पट्टी या राज्याच्या सांस्कृतिक लोकधारा आहेत. त्या राज्यात विविध भागात गेल्या पाहिजेत, असं देशमुख यावेळी म्हणाले. उद्या या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

****

स्वातंत्र्य सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व प्रांतीय संघटनांनी एकत्र येणं आवश्यक आहे असं अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस धर्मवीर पालीवाल यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या वारस पत्नी तसंच पाल्यांसाठी संसदेनं १९७२ साली तरतूद केलेल्या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, यासह अनेक मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या.

****

भारताची पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी स्वीस खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या महिला तसंच पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूने थायलंडच्या सुपानिडा कॅटेथाँगचा तर प्रणॉयने इंडानेशियाच्या अँथनी सिनीसुकाचा पराभव केला. स्पर्धेच्या अंतिम फेरीतले सामने आज होणार आहेत.

****

इंडियन प्रीमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामाला कालपासून सुरवात झाली. मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जवर सहा गडी आणि नऊ चेंडू राखून पराभव केला.

****

अतिसामान्य माणसाला समजेल अशा शैलीत लिखाण करणारे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे मराठीतले एकमेव विचारवंत असल्याचं मत, प्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार न्यायमूर्ती चपळगावकर यांना सुधीर रसाळ यांच्या हस्ते काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार, युक्रांदचे संस्थापक आणि पुरोगामी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते सप्तर्षी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अकरा हजार रुपये, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. व्यक्तिरंग या पुस्तकासाठी सप्तर्षी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

देशातील कामगार संघटना २८ आणि २९ मार्चला उद्या आणि परवा संपावर जाणार आहेत. या संपात सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉईज फेडरेशनचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली आहे.

बँक खाजगीकरण, बॅंकामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी कंत्राटी पद्धतीचा अवलंब करुन कामगारांचं शोषण, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणं, दी मागण्यासाठी हा संप पुकारला असल्याचं देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं.  

****

वाढत्या महागाई विरोधात औरंगाबाद जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं काल शहरातल्या क्रांती चौक इथं आंदोलन करण्यात आलं. मागच्या आठवड्यापासून तीन वेळा इंधनाची दरवाढ झाल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. अच्छे दिनचं स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केली जात असल्याची टीका काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, नांदेड इथं शिवसेनेच्या वतीनं काल गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं.

****

ग्रामीण मुशीतून घडलेल्या यशवंतरावांनी जनमानस ओळखले, नव्या लोकांवर विश्वास टाकला, शेवटच्या घटकाचा विचार करून सर्वांची मनं सांधत महाराष्ट्र घडवला, असं प्रतिपादन कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले प्राध्यापक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांनी केलं आहे. 'यशवंतराव चव्हाण आणि पंचायतराज व्यवस्था' या विषयावर काल औरंगाबाद इथं लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यशवंतरावांच्या प्रेरणांची बीजं सयाजीरावांच्या प्रशासनात आहेत, असं बाबा भांड यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात सांगितलं. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला.

****

 

 

 

No comments: