Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 March 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मार्च २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशातली
आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा दोन वर्षांच्या कालावधीनंतर आज मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू
होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं मार्च २०२० मध्ये कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर
आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित केली होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये आरोग्य आणि
कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन केलं जाईल. जगभरात झालेल्या
कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीमुळे आणि योग्य त्या सल्लामसलतीनंतर अनुसूचित व्यावसायिक
आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतला आहे.
****
जागतिक
आरोग्य संघटनेचं पारंपरिक औषधांचं जागतिक केंद्र गुजरातमधल्या जामनगर इथं स्थापन करण्यात
येणार आहे. यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर आयुष सचिव राजेश कोटेजा आणि जागतिक आरोग्य
संघटनेचे महानिदेशक अधानम गैब्रेयसिस यांनी स्वाक्षऱ्या केल्या. औषधांचं हे जागतिक
केंद्र भारतात स्थापन करण्याबाबतच्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत
केलं आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८२ कोटी ८७ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे.
काल दिवसभरात २५ लाख ८१ हजारांपेक्षा जास्त नागरीकांचं लसीकरण झालं. १२ ते १४ वयोगटातल्या
एक कोटी पाच लाखांहून अधिक किशोरवयीन मुला मुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे.
तर दोन कोटी २४ लाख पाच हजार २२७ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
अतिसामान्य
माणसाला समजेल अशा शैलीत लिखाण करणारे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे मराठीतले
एकमेव विचारवंत असल्याचं मत, प्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. अमेरीका
स्थित महाराष्ट्र फाऊंडेशनचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार चपळगावकर यांना सुधीर रसाळ यांच्या
हस्ते आज औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये आणि
सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप आहे. शासन किंवा समाजातल्या अनेक वाईट प्रवृत्तींचा
दबाव समाजावर पडत असतो. त्याची वाईट फळं समाजाला भोगावी लागतात. या सगळ्यातून सावरायचं
असेल तर समाजाला मार्गदर्शन करणारे विचारवंत सतत निर्माण होत राहीले पाहिजे, असं मत
रसाळ यांनी यावेळी व्यक्त केलं. लोकशाही टिकवायची असेल तर समाजामध्ये ही प्रगल्भता
येणं आवश्यक असल्याचं चपळगावकर यावेळी म्हणाले.
****
परभणी
इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती-जमाती
आयोगाची बैठक काल पार पडली. विद्यापीठात मागासवर्गीयांकरता असलेल्या तक्रार निवारण
समितीनं तक्रार नोंदवण्यासाठी महिन्यातला निश्चित एक दिवस ठरवावा, असा सल्ला महाराष्ट्र
राज्य अनुसूचीत जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी यावेळी दिला. कृषि विद्यापीठ
करत असलेले संशोधन कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, आदिवासी शेतकरी बांधवासाठी असलेले
उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
****
नवीन
कामगार कायदा, खासगीकरण आदी मागण्यांसाठी देशातील कामगार २८ आणि २९ मार्चला संपावर
जाणार आहेत. या संपात सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार
असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉईज फेडरेशनचे सचिव देविदास तुळजापूरकर
यांनी दिली आहे. त्यामुळे २६ आणि २७ मार्चला सुटी असल्यानं बँका चार दिवस बंद राहणार
आहेत. राज्यातील सात हजार बँक शाखातून काम करणारे जवळपास तीस हजार बँक अधिकारी, कर्मचारी
या संपात सहभागी होणार आहेत. बँक खाजगीकरण, बॅंकामध्ये विविध पदांची भरतीसाठी कंत्राटी
पद्धतीचा अवलंब करुन कामगारांचं शोषण, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे आदि मागण्यासाठी
हा संप असल्याचं देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेचा प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार, युक्रांदचे संस्थापक
आणि पुरोगामी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना आज औरंगाबाद इथं प्रदान करण्यात येणार
आहे. अकरा हजार रुपये, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. व्यक्तिरंग
या त्यांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथावर नांदेड इथले पत्रकार संजीव कुलकर्णी हे भाष्य
करणार आहेत. मसापच्या औरंगाबाद इथल्या डॉ. ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा
वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
इंडियन
प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ आजपासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी होत
आहेत. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर आज पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता
नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment