Monday, 28 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.03.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

इंधन दरवाढ आणि महागाईच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज बाधित झालं. कामकाज सुरु होताच महागाईच्या मुद्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला. त्यामुळे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यामुळे सदनाचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत ‘गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक, २०२२’ सादर करणार आहेत. पोलिसांना गुन्हेगार आणि इतर व्यक्तींना ओळखण्यासाठी तसंच गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तपासाच्या उद्देशानं त्यांचा रेकॉर्ड सुरक्षित करण्याची परवानगी देण्याची तरतूद या विधेयकात आहे.

****

नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी मागण्यांसाठी देशभरातले कामगार आजपासून दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगार यांच्यासह सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी, अधिकारी या संपात सहभागी आहेत.

****

भाजपचे नेते प्रमोद सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दहा भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते. प्रमोद सावंत यांच्यासोबत अन्य आठ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात चार लाख २० हजार ८४२ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८३ कोटी २६ लाख ३५ हजार ६७३ मात्रा देण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत १६ कोटी तीन लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यापैकी सहा कोटी ९८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर १७ लाख ६२ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना बुस्टर डोस मिळाला आहे.

दरम्यान, देशात काल नव्या एक हजार २७० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार ५६७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १५ हाजर ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने काल जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. ओडिशामधील चांदीपूर या समुद्रकिनारी असलेल्या गावात ही चाचणी घेण्यात आली. हवेतल्या वेगवान लक्ष्याचा वेध घेत त्यावर थेट मारा करण्याच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून या चाचण्या घेण्यात आल्या.

****

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणीच्या दिल्ली मुख्यालयातला वृत्तसेवा विभाग दोन एप्रिलपासून ‘अभ्यास’ हा नवीन साप्ताहिक कार्यक्रम सुरु करत आहे. हा कार्यक्रम दर शनिवार रात्री साडेनऊ ते दहा दरम्यान प्रसारित केला जाईल. यासाठी दर आठवड्याला एक विषय निवडला जाईल. यासाठी विद्यार्थी व्हॉट्सअप किंवा ई-मेलद्वारे प्रश्न विचारू शकतात. संबंधित विषयातील तज्ञ त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतील. या आठवड्यासाठीचा विषय ‘इतिहास’ हा असून विद्यार्थी त्यांचे प्रश्न ९२ ८९ ०९ ४० ४४ या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा abhyas.air@gmail.com या ईमेलवर ३० मार्चपर्यंत विचारु शकतात. “अभ्यास” या कार्यक्रमाचा पहिला भाग दोन एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता एफएम गोल्ड वाहिनीवर तसंच न्यूज ऑन एआयआर या अॅपवर देखील प्रसारित केला जाईल.

****

प्रसिद्ध शास्त्रीय गायक दिवंगत पंडित नाथराव नेरळकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त औरंगाबाद इथं आज आणि उद्या दोन दिवसीय सांगितिक आदरांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या तापडिया नाट्यमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात आज पहिल्या दिवशी शास्त्रीय गायक भुवनेश कोमकली तर उद्या प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर आणि शशांक मक्तेदार यांच्यासह पंडित नेरळकर यांचे शिष्यगण त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

****

उस्मानाबाद तालुक्यातल्या तेर इथल्या पर्यटन महोत्सवाला काल हेरिटेज वॉकनं सुरुवात झाली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी पूराणवस्तू संग्रहालयचे अभिरक्षक अमोल गोटे यांनी प्राचीन स्थळांचं ऐतिहासिक विशेष महत्व आणि माहिती सांगितली. आज या महोत्सवाचा समारोप होत आहे.

****

राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २९ ते ३१ मार्च दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात बाहेर पडताना नागरीकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या ग्रामीण कृषी हवामान विभागानं केलं आहे.

****

No comments: