Thursday, 31 March 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं, उद्यापासून मास्क मुक्ती वगळता सर्व निर्बंध हटवणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे

·      केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्याची थकीत रक्कमही देण्याचा निर्णय

·      राज्यातील २८ शहरांना घन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, ४३३ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी

·      दुकानं आणि आस्थापनांचा नामफलक देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी

·       राज्यात कोविड संसर्गाचे ११९ तर मराठवाड्यात पाच नवे रुग्ण

·      मराठवाड्यातले रेल्वे मार्ग प्रकल्प तातडीनं मार्गी लावण्याची आमदार सतीश चव्हाण यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

आणि

·      धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात अनियमितता केल्याच्या आरोपावरून औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल निलंबित

****

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं, उद्या एक एप्रिलपासून मास्क वापरण्याची सक्ती वगळता सर्व निर्बंध हटवण्याबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं घेण्यात येईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उद्यापासून आपत्कालिन कायदा मागे घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असं ते म्हणाले. मात्र जगभरातल्या काही देशात कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं निघणाऱ्या शोभा यात्रांबाबत कोरोना कृती दलानं सकारात्मक शिफारस केली, तर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहण्याची त्यांनी विनंती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आाहे, पण शिस्तबद्द पद्धतीनं ही जयंती साजरी करण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

****

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. केंद्र सरकारचे ४७ लाख ६८ हजार कर्मचारी तसंच ६८ लाख ६२ हजार निवृत्ती वेतन धारकांना  याचा लाभ होणार आहे.

राज्य सरकारनंही महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय काल जारी केला. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना २८ टक्क्यांऐवजी ३१ टक्के दरानं महागाई भत्ता दिला जाणार आहे. असुधारित वेतन संरचनेतल्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता १८९ टक्क्यांवरून १९६ टक्के करण्यात आला आहे. १ जुलै २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू होईल. नऊ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मार्च महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याची सूचना करण्यात आली आहे. असुधारित वेतन संरचनेतल्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत महागाई भत्त्यातली ११ टक्के वाढीची तीन महिन्यांची थकबाकीही मंजूर करण्यात आली आहे.

****


घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राला मदत करण्याच्या दृष्टीनं, केंद्र सरकारने तीन पूर्णांक सात कोटी मेट्रिक टन शहरी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, ४३३ कोटी ७४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दीड हजार एकरापेक्षा अधिक जमिनीवरचा हा प्रकल्प पर्यावरणीय संतुलन सुनिश्चित करेल. ‘लक्ष्य झिरो डंपसाइट या मिशन अंतर्गत, देशभरातल्या विविध शहरांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे.

****

महाराष्ट्रात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमधल्या मंजुर झालेल्या घरांच्या बांधणीसाठी निधीची कमतरता नाही, असं ग्रामीण गृहनिर्माण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काल राज्यसभेत सांगितलं. त्यांनी आपल्या उत्तराबरोबरच, गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातल्या मंजुर झालेल्या लाभार्थ्यांच्या निधीचं कोष्टक मांडलं. यानुसार गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात, प्रधानमंत्री ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी देण्यात आलेल्या निधीपैकी प्रत्येक वर्षी निधी शिल्लक आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अखेरीसही या योजनेत ९१३ कोटी एक लाख इतका निधी शिल्लक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यातली दुकानं आणि आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे. यानुसार आता यापुढे राज्यातली सर्व दुकानं तसंच आस्थापनांना मराठी भाषेत नामफलक प्रदर्शित करणं अनिवार्य आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम, २०१७  मध्ये सुधारणा करण्यासंबंधीचं विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मान्य झालं असून,  या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे. जी दुकानं किंवा आस्थापनांमध्ये मद्य पुरवलं जातं किंवा मद्य विकलं जातं अशी दुकानं आणि आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावं लिहिता येणार नाहीत, असंही या आदेशात म्हटलं आहे.

****

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या, आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या, ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२ - अभय योजनेची सूचना काल जारी करण्यात आली.

****

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची अथवा इतर औषधांची विक्री करणाऱ्या औषधी दुकानांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्याची सूचना, अन्न-औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतच्या बातम्यांची गंभीर दखल घेत, यड्रावकर यांनी, यासंदर्भात प्रशासनानं पोलीस विभागाशी समन्वय साधून कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहिलं आहे. कोरोना काळामुळे किमान समान कार्यक्रम राबवणं शक्य झालं नाही, परंतु आता कोरोना संकटाची तीव्रता संपली आहे. त्यामुऴे किमान समान कार्यक्रम पुन्हा राबवण्यात यावा. दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली जावी, असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेलं पदस्पर्श दर्शन, गुढीपाडव्यापासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मंदिर समितीच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ११९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७३ हजार ८४१ झाली आहे. या संसर्गानं काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७८२ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १३८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २५ हजार १२० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. परभणी, नांदेड, जालना, हिंगोली तसंच लातूर जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

 ****

औरंगाबाद इथं रेल्वेच्या पीटलाईनसाठी खासदार आमदारांकडून दिल्लीत पाठपुरावा करण्यात आला. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद इथं प्रस्थावित रेल्वे पीटलाईन जालना इथं स्थलांतरण करु नये, अशी मागणी काल लोकसभेत केली. तसंच शहरातल्या शिवाजीनगर इथल्या रेल्वे पटरीच्या भुयारी मार्गाचं प्रलंबित काम त्वरीत सुरु करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन, कामास होणाऱ्या विलंबनाबाबत, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितलं.

****

औद्योगिक तसंच पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असणारे मराठवाड्यातले प्रलंबित रेल्वे मार्ग प्रकल्प तातडीनं मार्गी लावावेत, अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी काल दिल्लीत दानवे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन दिलं. औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जालना इथं ‘पीटलाइन जरूर करावी, मात्र औरंगाबाद इथंही ‘पीटलाइन झाल्यास, ते मराठवाड्याच्या फायद्याचं ठरणार असल्याचं, आमदार चव्हाण यांनी सांगितलं. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी लावले जातील असं आश्वासन दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

****


औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना निलंबित करण्यात आलं आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी असतांना हदगल यांनी, धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ च्या भुसंपादनामध्ये, लाबवरच्या जमिनी महामार्गाजवळ दाखवून जवळपास ४१ कोटी रुपये अधिकचा निधी दिल्याचं निदर्शनास आल्यानं, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. निलंबन कालावधीत हदगल यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचं या आदेशात नमूद करण्यात आला आहे.

****

प्रलंबित सेवा विषयक मागण्या मान्य न झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. एक एप्रिलला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन, तसंच १८ एप्रिलला रजा टाकून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास चार मे पासून बेमूदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे.

****

मोतीबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, लातूरसह राज्यात सर्व जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरांचं आयोजन करावं, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेल, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं, जिल्हा काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्म्याचं वाटप करण्यात आलं. मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी लातुरात उपचार सुविधा उपलब्ध करून, शासकीय महाविद्यालयात डायलेसिस वार्ड सुरुवात करण्याची सूचनाही देशमुख यांनी केली.

****

नांदेड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अत्यावश्यक करण्यात आलं आहे. एक एप्रिल २०२२ पासून दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा अशी सूचना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सर्व शासकीय कार्यालयात जाऊन केली आहे.

शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी चालवताना आढळून आलेल्या नागरिक, कर्मचारी आणि अधिकारी यांच्याविरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा उस्मानाबाद इथले उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिला आहे.

****

बीड विधानसभा मतदारसंघातल्या विविध गावांमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी विविध विकास कामांचं भूमिपूजन करत शुभारंभ केला. रुईलिंबा इथंलं विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, संत भगवानबाबा मंदिर, संत वामनभाऊ मंदिर परिसरात सभामंडपाच्या कामाचं भूमिपूजन आणि उमरद, दगडी शहाजानपूर, कुमशी आदी गावांमध्ये, जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसंच बीड शहरातल्या अंबिका चौकातला रस्ता आणि नाली बांधकामाची पाहणीही आमदार क्षीरसागर यांनी केली.

****

पंजाबमधल्या जालंधर इथून औरंगाबाद शहरात आलेल्या ३७ धारदार तलवारी आणि एक कुकरी क्रांती चौक पोलिसांनी काल पकडली. डीसीटीसी कंपनीच्या निराला बाजार इथल्या कार्यालयावर छापा टाकून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, कुरियर कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्यातीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. उमेखान नासिरखान पठाण, शेख मोहम्मद अनस अब्दुल हाफिज आणि अक्रमखान आयुबखान पठाण अशी मृतांची नावं आहेत. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

****

No comments: