Wednesday, 30 March 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे

·      जल शक्ती अभियान-कॅच द रेन मोहिमेचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुभारंभ

·      कोविड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश

·      कोविड काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

·      राज्यात कोविड संसर्गाचे १०३ तर मराठवाड्यात तीन नवे रुग्ण

·      पाच कोटी रुपयांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम औरंगाबाद महानगरपालिकेला परत करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे पीएफ कार्यालयाला आदेश

आणि

·      राज्यात दोन एप्रिलपर्यंत उष्णतेची लाटेचा हवामान विभागाचा इशारा, मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ

****

केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल मागे घेतला. महाराष्ट्र वीज कार्मतारी संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी ही माहिती दिली. या संपाबाबत वीज कार्मचारी संघर्ष समितीची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी काल चर्चा झाली. ही चर्चा समाधानकारक झाली असून, राज्यातल्या ऊर्जा कंपन्यांचं खाजगीकरण होणार नाही, असं आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिलं असल्याची माहिती, मोहन शर्मा यांनी दिली. तसंच वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर उर्जामंत्र्यांनी सकारात्मक मान्यता दिली असून, यावर पुढील तीन ते चार दिवसांत कारवाई होईल, असं ही ते म्हणाले आहेत. या सोबतच संप केल्यानं कोणत्याही कामगारावर कारवाई होणार नाही, असं आश्वासनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. 

दरम्यान, संपाबाबत काल वार्ताहरांशी बोलताना ऊर्जामंत्री राऊत यांनी, महाविकास आघाडी सरकार खाजगीकरणाचं समर्थन करणार नाही, असा खुलासा केला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या बँक कर्मचाऱ्यांनी काल दुसऱ्या दिवशीही संपात सहभागी होत बँकेच्या शाखांसमोर निदर्शनं केली. तसंच नवीन कामगार कायदा आणि खासगीकरणाचं धोरण यासंदर्भात माहितीपत्रकाचं कर्मचाऱ्यांनी वाटप केलं.

आयटकच्या वतीनं पैठण इथं आशा, आणि गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार तसंच उमेद अभियानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.

नांदेड इथं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नांदेड शाखेच्या वतीनं खाजगीकरणाला विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.

****

जल शक्ती अभियान-कॅच द रेन मोहिम २०२२ चा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला.

राष्ट्रीय जल पुरस्काराचंही राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते काल वितरण करण्यात आलं. राज्य, संघटना आणि व्यक्तिगत पातळीवरील विविध स्तरात ११ श्रेणींमध्ये ५७ पुरस्कार देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राने चार पुरस्कार पटकावले आहे. औरंगाबाद इथली ग्रामविकास ही बिगर सरकारी संस्था, सोलापूर जिल्ह्यातली सुर्डी ग्रामपंचायत, रत्नागिरी जिल्ह्यातली दापोली नगरपंचायत आणि दैनिक ॲग्रोवन यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.  उत्कृष्ट गैरसरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेला, आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला, संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. औरंगाबादच्या दक्ष‍िणेस १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चित्ते नदीचं पुनरूज्जीवन केल्याबद्दल संस्थेला गौरवण्यात आलं. दुष्काळ निवारणासाठी चित्ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पथदर्शी प्रकल्प ठरेल, असा विश्वास शिवपुरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...

Byte….

२०१२ साली चित्ते नदी खोऱ्यामध्ये पुनर्जीवन अभियानाचा कार्यक्रम राबविण्यात आला. माथा ते पायथा या तत्वानुसार कम्पार्टमेंट फंडीग, नाला रुंदीकरण खोलीकरण, साखळी पद्धतीचे पंचवीस बंधारे, पाझर तलावातील सत्तर हजार घनमीटर गाळ काढण्याचा कार्यक्रम यामुळे शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालेले आहे. लोक सहभागातून एक जलक्रांती या भागामध्ये घडलेली आहे. या सर्व कामाची दखल घेऊन जलशक्ती मंत्रालयाने ग्रामविकास संस्थेला पुरस्कार प्रदान केलेला आहे. चित्ते नदी पुनर्जीवन अभियानासारख्या उपक्रमाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. दुष्काळ निवारणासाठी हा अत्यंत पथदर्शी आणि महत्वाचा पकल्प आहे. - नरहरी शिवपुरे

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैसे प्रतिलिटरने वाढ करण्यात आली आहे. आठव्यांदा ही दरवाढ झाली आहे. औरंगाबाद शहरात आता पेट्रोलचा दर ११७ रुपये ५० पैसे प्रती लिटर, तर डिझेलचा १०१ रुपये ७१ पैसे प्रती लिटर झाला आहे.

****

वार्षिक अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळा एप्रिल महिन्यात विनाकारण सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही, असा खुलासा राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केला आहे. काल एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, मांढरे यांनी, ज्या शाळा कोविड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकलेल्या नाहीत, त्यांनाच एप्रिल महिन्यातही शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं स्पष्ट केलं. पुढील सत्र जून महिन्याच्या मध्यादरम्यान सुरु होणार असल्यानं, शाळांना मे महिन्यात सुट्टी असेल. त्यामुळे मे महिन्यात आखलेले सुटीचे बेत बदलण्याची गरज नाही, असंही मांढरे यांनी सांगितलं.

****

राज्यात कोविड काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १०३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७३ हजार ७२२ झाली आहे. या संसर्गानं काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकुन संख्या एक लाख ४७ हजार ७८० झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १०७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २४ हजार ९८२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९६०रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली तसंच लातूर जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

औरंगाबाद महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आलेला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जवळपास पाच कोटी रुपयांचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम परत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला दिले आहेत. खंडपीठानं औरंगाबाद महानगरपालिकेकडून, भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं महानगरपालिकेकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पीएफ योगदानापोटी साठी नऊ कोटी रुपये वसूल केले होते. महापालिकेनं यासंदर्भात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठानं रिट याचिकेला अंशतः परवानगी दिली आणि पी एफ कार्यालयाला पाच एप्रिल पर्यंत किंवा त्यापूर्वी ही रक्कम महापालिकेला परत करण्याचे आदेश दिले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात पोलिसांनी स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरला तांडा शिवारात हट्टा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात, जिलेटीनच्या तब्बल ३२१ कांड्या आणि ५०० डिटोनेटर पोलिसांनी जप्त केले. ​​​​​​

****

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन ३१ मार्चला साजरा केला जातो. त्यानिमित्त दोन एप्रिल पर्यंत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद इथं तृतीयपंथीयांसाठी मतदार नोंदणीचं विशेष शिबिर घेण्यात येत आहे. तृतीयपंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करुन असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केलं आहे. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात २२ तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा ३१ मार्च रोजी रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव इथं शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं सहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुखेड पंचायत समितीतून कालबद्ध पदोन्नतीचं फरकामधील मंजूर झालेल्या रक्कमेचं देयक मंजूर करुन देण्यासाठी लोकसेवक गजानन पेंढकर यानं शेख शादुल हबीबसाब याच्यामार्फत तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाच मागितली होती, तडजोडीअंती सहा हजार रुपये लाच घेतांना शेख शादुल हबीबसाब याला अटक करण्यात आली.

****

हवामान -

राज्यात दोन एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात पारा काल ४० अंशाच्या वर होता. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं ४२ पूर्णांक नऊ दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद, जालना, हिंगोली सह विदर्भात आजपासून ते दोन एप्रिल तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे. नागरिकांना उन्हापासून बचावासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव उत्साहानं साजरा करूया, यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीनं लवकरात लवकर प्रसिद्ध केलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत बोलत होते.

****

 

No comments: