Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 March 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
** पद्म पुरस्कार प्रदान
समारंभाच्या दुसरा टप्प्यात शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण तर
प्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान
** स्पर्धा परीक्षार्थींसाठी आकाशवाणीचा 'अभ्यास' हा नवीन साप्ताहिक कार्यक्रम
**
राज्य वीज मंडळाच्या कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
यांची ग्वाही; बँक तसंच वीज कर्मचाऱ्यांसह विविध संघटनांचा दोन दिवसीय संप सुरू
आणि
**
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांची
निवड
****
यंदाच्या पद्म पुरस्कार प्रदान समारंभाचा दुसरा टप्पा आज नवी
दिल्लीत राष्ट्रपती भवनात सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शास्त्रीय
गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण, दिवंगत नेते कल्याणसिंह यांना मरणोत्तर पद्मविभुषण,
प्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण तसंच भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना पद्मश्री सन्मान
प्रदान करण्यात आले. पद्म भूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये अभिनेता विक्टर बॅनर्जी, लेखक
डॉ. प्रतिभा रे आणि आचार्य वशिष्ठ त्रिपाठी यांचा समावेश आहे.
****
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग दोन एप्रिलपासून 'अभ्यास' हा
नवीन साप्ताहिक कार्यक्रम सुरु करत आहे. दर शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा दरम्यान हा कार्यक्रम प्रसारित
केला जाईल. यासाठी दर आठवड्याला एक विषय निवडला जाईल. यासाठी विद्यार्थी व्हॉट्सअप
किंवा ईमेलद्वारे प्रश्न विचारू शकतात. संबंधित विषयातील तज्ञ त्यांच्या
प्रश्नांना उत्तरं देतील. या आठवड्यासाठीचा विषय ‘इतिहास’ हा
असून विद्यार्थी त्यांचे प्रश्न ९२
८९ ०९ ४० ४४ या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा abhyas.air@gmail.com या ईमेलवर ३०
मार्चपर्यंत विचारु शकतात. “अभ्यास” या कार्यक्रमाचा पहिला भाग २ एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता एफएम गोल्ड वाहिनीवर
तसंच न्यूज ऑन एआयआर या अॅपवर देखील प्रसारित केला जाईल.
****
राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही,
अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी
बोलत होते. संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री राऊत यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
संवाद साधला. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंत्रालयातल्या दालनात प्रत्यक्ष
बैठक घेऊन सकारात्मक चर्चेचं तसंच संप मागे घेण्याचं आवाहन ऊर्जामंत्र्यांनी कर्मचारी
संघटनांना केलं आहे. या चर्चेतून निश्चितपणे तोडगा निघून वीज कर्मचारी आपला संप मागे
घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या विनंती
आणि आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्याच्या बैठकीला हजर
राहून चर्चा करण्याला मान्यता दिली आहे.
****
नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी
मागण्यांसाठी देशभरातले कामगार आजपासून दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी
आणि कंत्राटी कामगार यांच्यासह सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक
कर्मचारी, अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत.
सोलापूर इथं ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम आणि सिटूचे
राज्य महासचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं
धरणं आंदोलन करण्यात आलं.
पालघर इथं महावितरणच्या कार्यालयाबाहेर सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शनं
केली. वाशिम इथं महावितरणच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त
केला.
औरंगाबाद
इथल्या भारतीय ट्रेड युनियन केंद्र - सीटू आणि आयटक अंतर्गत आशा, आणि गट प्रवर्तक,
शालेय पोषण आहार तसंच उमेद अभियानचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले. शहरातल्या क्रांती
चौकात त्यांनी निदर्शनं केली. वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगारही
या संपात सहभागी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तसंच पैठण तालुक्यातही आंदोलन
करण्यात आलं. उद्या ग्रामीण भागात १५ ते २० ठिकाणी देशव्यापी संपानिमित्त आयटकचं आंदोलन
होणार असल्याची माहिती कृती समितीचे कॉम्रेड राम बाहेती यांनी दिली.
जालना इथं आज गांधीचमन चौकात पेट्रोल आणि गॅस दरवाढीविरोधात
शिवसेनेच्यावतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते माजीमंत्री अर्जुन खोतकर,
जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकार
विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
****
अखिल
भारतीय साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांची
निवड करण्यात आली आहे. मुंबई इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अखिल भारतीय साहित्य परिषद १९६६ पासून साहित्य क्षेत्रात, राष्ट्रीय विचार घेऊन सर्व
भारतीय भाषांमध्ये कार्यरत आहे. याच बैठकीत प्राध्यापक डॉ. नरेंद्र पाठक यांची कार्याध्यक्ष
पदी, तर नितीन केळकर यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. प्राध्यापक डॉ.
बळीराम गायकवाड हे राज्य प्रदेश महामंत्री तर सुनील वारे प्रदेश संघटना मंत्री असतील.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्त्या या पुढील एक वर्षा साठी असतील.
****
कर्मचारी भविष्य निधी ईपीएफ योजने अंतर्गत मागील वर्षी ३१ मार्चपर्यंत
११ लाख ७२ हजार ९२३ निष्क्रिय खात्यांमध्ये
३ हजार ९०० कोटी रुपयांहून अधिक निधी जमा असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. श्रम आणि रोजगार राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत आज एका लेखी
प्रश्नाच्या उत्तरात ही माहीती दिली. ईपीएफ संघटने जवळ या संदर्भातील प्रकरणांवरील
प्रक्रिया आणि निदानासाठी मजबूत ऑनलाइन आणि पारदर्शक प्रणाली असून याचा उपयोग नियमितरित्या
उच्च स्तरावर देखरेखीसाठी केला जात असतो तसंच चालू आर्थिक वर्षात या महिन्याच्या २२
तारखेपर्यंत ५१ लाख ५४ हजारांहून अधिक भविष्य निधी प्रकरणांना निकाली काढण्यात आल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात फळबाग लागवडीला प्राध्यान्य द्यावं
तसंच यासाठी कार्यशाळा घ्याव्या अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी
दिल्या आहेत. जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्र्यांनी विविध विभागाचा आढावा बैठकीचे
आयोजन केले होते. त्यात ते बोलत होते. जिल्ह्यात रमाई आवास योजनेची स्थितीचा त्यांनी
यावेळी आढावा घेतला तसंच वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेची प्रभावी अमंलबजावनी करावी
अशा सूचना संबंधितांना त्यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकाधिक गावातील
शेत रस्ते, शिव रस्ते, मातीकाम, गिट्टी काम करून घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठवाड्यातील लेखन या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय
चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या २९ आणि परवा ३० मार्च रोजी विद्यापीठातील
सिनेट सभागृहात हे चर्चासत्र होईल.
****
नांदेड संत्रागाछी नांदेड एक्सप्रेसच्या ४ एप्रिल
ते ४ मे दरम्यानच्या पाच फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेडहून ४, ११, १८, २५
एप्रिल आणि २ मे या दिवशी सुटणारी तसंच ६, १३, २०, २७ एप्रिल आणि ४ मे या दिवशी संत्रागाछीहून
सुटणारी ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे लाईनवर ब्लॉक घेण्यात आल्यानं
या गाडीच्या पाच फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं
कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment