Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
मास्कमुक्तीचा कोणताही विचार केलेला नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट
केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावाच लागेल,
असं ते म्हणाले. गुढीपाडवा आणि शोभायात्रेबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं ते म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरीही सण साजरे करताना काळजी घ्यावी, असं आवाहन
टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.
****
बंगालच्या उपसागराला जोडणी, समृद्धी आणि सुरक्षिततेचा पूल बनवण्याचं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पाचव्या बिमस्टेक शिखर परिषदेत ते आज
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. सध्याच्या परिस्थितीत
प्रादेशिक सहकार्याला अधिक प्राधान्य देण्यात आलं असून, बिमस्टेकच्या
भारतातल्या हवामान आणि वातावरण केंद्राला पुन्हा कार्यरत करण्यासाठी ३० लाख
डॉलर्सचं आर्थिक सहकार्य करण्याची भारताची तयारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
बिमस्टेक देशांचे उद्योजक आणि स्टार्टअप यांच्यातली देवाणघेवाण वाढली पाहिजे, व्यापार सुलभीकरणाच्या
क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मानदंड स्वीकारले पाहिजेत, असं ते म्हणाले. कोविड महामारीमुळे
निर्माण झालेली आव्हानं तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर या परिषदेत चर्चा झाली.
****
यंदाच्या
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमासाठी लाखो लोकांनी आपले विचार मांडले
असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान येत्या एक
एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद
साधणार आहेत. त्यांच्याशी ते तणावमुक्त परिक्षेबाबत चर्चा करतील. कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर यंदा या कार्यक्रमात केवळ राजधानी दिल्ली क्षेत्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणातल्या एक हजार विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात
आलं आहे.
****
जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या रैनावारी भागात आज पहाटे सुरक्षा दल
आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. नागरिकांच्या हत्यांसह
नुकत्याच घडलेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्या दोघांचा
सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून शस्त्रं आणि
दारूगोळ्यासह इतर आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली. त्या दोघांपैकी एकाकडे
माध्यम प्रतिनिधीचं ओळखपत्र सापडलं आहे. माध्यमांचा गैरवापर यातून स्पष्ट दिसतो
असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २६ लाख
३४ हजार ८०
नागरीकांचं लसीकरण झालं. देशात
आतापर्यंत या लसीच्या १८३ कोटी ८२
लाख ४१ हजार
७४३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या एक हजार २३३ कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर
एक हजार ८७६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १४ हजार ७०४ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
तुरुंगातल्या कैद्यांना ५० हजार
रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने
घेतला आहे. कारागृहात केलेल्या कामाच्या मोबदल्यात कैद्यांना हे कर्ज दिलं जाणार
आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जासाठी सात टक्के
व्याज आकारणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पुण्यातल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात यासंदर्भात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासंदर्भातला
शासन निर्णय काल जारी करण्यात आला. कैद्यांच्या
जीवनमानात सुधारणा आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असून, देशामध्ये अशा प्रकारची
ही पहिलीच योजना आहे.
****
परभणी
जिल्ह्यातल्या बोगस मजूर दाखवणाऱ्या मजूर सहकारी संस्थेची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. काही
मजूर सहकारी संस्थेत मजूर नसलेल्या
लोकांची नोंद करण्यात आली असल्यानं, मुळात जे मजूर आहेत ते
कामापासून वंचित राहत आहेत, असं पक्षाच्या वतीनं जिल्हा
उपनिबंधकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्याच्या
अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आलेली आहे. गेल्या दोन
दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून पारा ४१
अंशापर्यंत गेला आहे. जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्याच्या मांडळ इथं एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यात
तापमान ४० अंशापर्यंत आलं आहे. दोन एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट असून, औरंगाबाद, जालना, हिंगोली या
जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment