Thursday, 31 March 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक निर्बँध हटवले.

·      कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रांची संख्या १६ कोटी १३ लाखाच्या वर.

·      देशात दहा लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी.

आणि

·      गुढीपाडव्यानिमित्त नांदेड - विशाखापट्टनम - नांदेड विशेष रेल्वे.

****

राज्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सविस्तर निर्णय लवकच जाहीर केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विवाह आदी समारंभांमध्ये उपस्थितीवर घालण्यात आले निर्बंध आता हटवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भातली माहिती दिली. नव्या निर्णयाअंतर्गत मास्क वापरणं ऐच्छिक ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.  सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मात्र मुखपट्टीचा वापर प्रत्येकानं आपल्या तसंच इतरांच्या सुरक्षेसाठी करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. राज्यातल्या बावीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी बंधनकारक करण्यात आली असल्याचं टोपे यांनी सांगितलं. चाळीस वर्षे ते पन्नास वर्षे वयोगटातल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी वर्षात एक वेळा तसंच पन्नास ते साठ वर्षे वयोगटातल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा आरोग्य चाचणी बंधनकारक करण्यात आली असल्याचं टोपे म्हणाले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या संदर्भातही माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली. गुढीपाडवा तसंच रमजान हे सण तसंच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदींवेळी मिरवणुका काढण्याचा मार्ग या निर्णयामुळं मोकळा झाला आहे. 

****

राज्यात आज सकाळपासून दुपारपर्यंत १ लाख ८१ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण झालं आहे. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी १३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी २ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर १८ लाख १८ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६१ लाख ९६ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना १३ लाख ५० हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.

****

कठिण प्रश्न सोडवण्यासाठी अनुभव कामी येतो, म्हणून सदस्यांनी आपला अनुभव देशहिताच्या उपयोगी आणला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत कार्यकाळ संपवून एप्रिल ते जुलैदरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या निरोप समारंभात बोलत होते.या सदस्यांनी दीर्घकाळ काम करताना सभागृहाला खूप काही दिलं आहे. असे सदस्य निवृत्त झाल्यानंतर त्यांची उणीव जाणवत राहते. अनुभवी सहकाऱ्यांच्या जाण्यानं जबाबदारी वाढते, असं ते म्हणाले. या सदस्यांनी सभागृहातल्या आपल्या अनुभवाबद्दल लिहावं, ते पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल, असंही पंतप्रधानांनी सुचवलं आहे.

****

केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं `प्रधानमंत्री शहरी आवास` योजनेअंतर्गत सहा राज्यांमध्ये दोन लाख ४२ हजार घरांचं निर्माण करायला मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, गुजरात, त्रिपुरा, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही ती सहा राज्यं आहेत. नवी दिल्ली इथं झालेल्या एका बैठकीत ही मंजूरी देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत घरं बांधण्यासाठी ७ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.  आतापर्यंत एक कोटी १७ लाखाहून अधिक मंजूर झालेल्या घरांपैकी ९५ लाख घरांचं निर्माण झालं असून सुमारे ५६ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.

****

गेल्या १३ मार्च पर्यंत देशात दहा लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असल्याची माहिती रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली. सध्या एक हजार ७४२ चार्जिंग स्टेशन काम करत असल्याचं सांगून  ४८ शहरात दोन हजार ८७७ चार्जिंग स्टेशन्सला मंजूरी देण्यात आल्याचं ते म्हणाले.

****

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅसच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ अज नवी दिल्लीतल्या विजय चौक इथं कॉंग्रेस पक्षातर्फे निदर्शनं करण्यात आली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना गेल्या दहा दिवसात पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत नऊ वेळा वाढ झाल्याचं सांगितलं. वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली. काँग्रेस पक्ष वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ देशव्यापी निदर्शनं करत आहेत.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी देण्यात वारंवार कमतरता येत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. आज लोकसभेत शून्यकाळात त्यांनी यामुळं रोजगाराच्या संधी कमी झाल्याचं सांगून श्रमिकांना वेळेवर पगार मिळाला नसल्याचं सांगितलं. पुरेसा मनरेगा निधी देण्याची आणि श्रमिकांना १५ दिवसांत पगार देण्याची आणि विलंबाबद्द्ल नुकसान भरपाई देण्याची मागणीही गांधी यांनी यावेळी केली.

****

कायम खाते क्रमांक - पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदत आज संपणार आहे. जर हो दोन्ही क्रमांक एकमेकांशी जोडले नाही तर एक हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा त्याच बरोबर पॅन क्रमांकही रद्द केला जाईल, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ -सीबीडीटीच्या सूचनेत म्हटलं आहे. मात्र दंड भरून पॅनकार्ड पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. कोरोना विषाणू संकटाशी यशस्वीपणे सामना केल्यानंतर, सध्या देशात शाळा- महाविद्यालयांमध्ये वार्षिक परीक्षांचा काळ सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तणाव विरहित परिस्थितीत परीक्षेला सामोर जावं यासाठी, पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

****

गुढी पाडव्यानिमित्त दोन एप्रिलला दक्षिण भारतात साजरा करण्यात येणाऱ्या उगादी महोत्सवानिमित्त होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. नांदेड - विशाखापट्टनम - नांदेड हा या गाडीचा मार्ग आहे. उद्या दुपारी साडे चारवाजता नांदेडहून ही गाडी निघणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता ही गाडी विशाखापट्टनमला पोहचेल. परतीच्या प्रवासामध्ये येत्या रविवारी ही गाडी विशाखापट्टनम इथून निघणार आहे.

****

धुळे शहराजवळील मोराणे शिवारातल्या जवाहर सरकारी सुतगिरणीच्या आवारात आज खराब कापूस मोकळा करतांना मशिनची ठिणगी उडून मोठी आग लागली. या आगीत शेकडो टन कापूस जळून खाक झाला आहे.

****

`कोविड- 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या धुळे जिल्ह्यातल्या तीन बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवींचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकाद्वारे दिली आहे.‘कोविड- 19’ मुळे ज्यांचे दोन्ही पालक दगावले आहेत, अशा बालकांची जबाबदारी शासनानं स्वीकारली आहे. त्यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलं स्थापन करण्यात आली आहेत. अशा मुलांसाठी राज्य शासनाकडून पाच लाख रुपये, तर केंद्र सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

****

No comments: