Sunday, 27 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.03.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 March 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****  

कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      देशात कोरोना विषाणू संसर्ग मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के.

·      राज्यात कोवीड प्रतिबंधासाठी लाभार्थ्यांना लसीच्या १६ कोटी ३ लाखांहून अधिक मात्रा.

·      माहितीच्या या युगामध्ये आयआयटी मुंबईला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार - केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचं प्रतिपादन.

आणि

·      जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीविरुद्ध शिवसेनेची औरंगाबादमध्ये निदर्शनं.

****

देशात कोरोना विषाणू संसर्ग मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे. आतापर्यंत देशातले चार कोटी २४ लाख रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्या देशात सोळा हजार पेक्षा जास्त रुग्ण या संसर्गावर उपचार घेत आहेत.

देशात या संसर्गाच्या प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८३ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. १२ ते १४ वयोगटातल्या एक कोटी २० लाखांहून अधिक किशोरवयीन मुला मुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर दोन कोटी २५ लाखांहून अधिक पात्र नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्गावरच्या प्रतिबंधासाठी राज्यात आज सकाळपासून ८ हजार नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ३ लाखांच्या वर गेली आहे. ६ कोटी ९८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर १७ लाख ६२ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६१ लाख १४ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना साडेनऊ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.

****

एकविसावं शतक हे माहितीचं युग ठरणार असून, त्यात ‘आयआयटी’ मुंबई अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे, असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ‘आयआयटी’ मुंबईच्या नव्यानं बांधलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी प्रधान बोलत होते. माहितीवर आधारीत अर्थव्यवस्था, तसंच सेवा क्षेत्रावर आधारीत अर्थव्यवस्था हे आजचं वास्तव असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी कर्मचारी होण्यापेक्षा उद्योजक होऊन, इतरांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावे, असं प्रधान म्हणाले.

****

‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम या वर्षी येत्या एक एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाचं हे पाचवं वर्ष असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, परीक्षेतला ताणतणाव बाजूला ठेवून परीक्षेला सामोरे कसं जावं, याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाते.

****

अमरावती जिल्ह्यात रहाटगाव वळण रस्त्यावर आज झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. एक प्रवासी वाहन आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. दूर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यातल्या पहिल्या ‘फ्युच्युरीस्टीक क्लासरूम’ अर्थात भविष्यकालीन वर्ग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालूक्यातील गोरंबे इथल्या विद्यामंदिर शाळेला मंजूरी मिळाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या योगदानातून शाळेला ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण दहा तुकड्यांमध्ये २९६ विद्यार्थी संख्या आहे. अत्याधुनिक आणि अद्ययावत असे ४० टच स्क्रीन संगणक या शाळेत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. रस्ते, आरोग्य केंद्रं, पाणी योजना, गटारी, सांस्कृतिक सभागृह असा भौतिक विकासही होणारच पण त्यासोबतच दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं शाळांची उभारणी या बाबींना प्राधान्य दिलं जाणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले.

****

राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘ऑनलाइन’ प्रवेश अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा ११ ते १३ जून या कालावधीत राज्यातील १७ केंद्रांवर घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा मंडळ नियंत्रकांनी दिली आहे.

****

विविध व्यवसाय आणि पीक पद्धत यांची योग्य सांगड घालून एकात्मिक शेतीला बीड जिल्ह्यात प्रोत्साहन आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी म्हटलं आहे. कृषीविषयक मालाच्या वेष्ठनाची गुणवत्ता अधिक सुधारण्यासाठी संबंधित विभागांनं प्रयत्न करावेत, असंही त्यांनी या संदर्भात आयोजित कार्यशाळेत नमूद केलं. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या कामामध्ये कृषि आणि महसूल विभागानं उत्तम भूमिका निभावल्याबद्दल त्यांनी यावेळी दोन्ही विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. बीड जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवलेल्या प्रेरणादायी शेतकऱ्यांचा आणि कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार तसंच गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रमाणपत्राचं वाटप यावेळी करण्यात आलं.

****

शिवसेना कार्यकर्त्यांनी इंधन आणि जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या दरांवरुन केंद्र सरकारच्या विरोधात आज औरंगाबादमध्ये निदर्शनं केली. क्रांती चौक इथं खांद्यावर गॅस सिलेंडर घेऊन, निषेधाचे फलक झळकवत, थाळीनाद करुन कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंदोलनाचं नेतृत्त्व केलं. एकीकडे उज्वला गॅस योजना सुरू करायची आणि दुसरीकडे गॅसची दरवाढ करायची, असं हे थापाडं केंद्र सरकार असल्याची टीका दानवे यांनी यावेळी केली. पक्षातर्फे उद्यापासून शहरात विविध चौक, वार्ड तसंच ग्रामीण भागात गाव निहाय या दरवाढीचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी मागण्यांसाठी देशभरातले कामगार उद्यापासून दोन दिवसांचा संप करणार आहेत. वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत असल्याचं राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कामगार संघर्ष समितीनं कळवलं आहे. राज्यातल्या सहा जलविद्युत केंद्रांचं खासगीकरण, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याच्या निर्णयाविरुद्ध या संपात सहभागी होत असल्याचंही समितीनं म्हटलं आहे.

****

स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. वी. सिंधूनं महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकवलं तर एच. एस. प्रणॉयला पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

****

No comments: