Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 March
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२६ मार्च २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं
आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर
अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप; पावसाळी अधिवेशन
१८ ते २८ जुलै दरम्यान मुंबईतच
·
केंद्र सरकारची देशात अघोषित आणिबाणी-मुख्यमंत्र्यांची टीका;
तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधकांचा सभात्याग
·
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री
अजित पवार यांची ग्वाही
·
राज्यात सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याची
शालेय शिक्षण मंत्र्यांची सूचना
·
भेसळयुक्त दूध उत्पादन आणि विक्री प्रकरणी बीड इथं एकास अटक
·
पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची काल काल्याची दहीहंडी फोडून
सांगता
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ; स्वीस बॅटमिंटन
स्पर्धेत पी व्ही सिंधू, किदांबी श्रीकांत, आणि एच एच प्रणॉय यांचा उपान्त्य फेरीत
प्रवेश
****
विधीमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनात वित्त विधेयकासह स्थानिक स्वराज्य
संस्था सुधारणा विधेयक, महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक, मराठी राजभाषा
विधेयक, महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक, यासह एकूण १७ विधेयकं दोन्ही सदनांमध्ये
संमत झाली. विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १८ ते २८ जुलै दरम्यान मुंबईत होणार आहे.
****
केंद्र
सरकारनं देशात अघोषित आणिबाणी लागू केल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली
आहे. काल विधान सभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, प्रसिद्धी
माध्यमांनाही वार्तांकन करताना तारतम्य बाळगण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले..
Byte…
कुठे कायदा,
व्यवस्था आणि लोकशाहीचा खून याच्या पलिकडे काय आणखीन असू शकतं? अघोषित आणीबाणी. निदान
इंदिरा गांधीनी तरी आणीबाणी घोषित केली होती. ही अघोषित आणीबाणी. एवढा डरपोकपणा त्यांच्यात
नव्हता. चांगली वाईट तो वेगळा भाग आहे. त्यांनी एक धारीष्ट्य दाखवलं ते धारीष्ट्य त्यांच्यामध्ये
होतं. आणि मला प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा सांगायचं आहे. बातम्या दाखवा, जरूर दाखवा.
पण कोणाचं तरी आयुष्य उध्वस्त होईल अशा प्रकारे जी बदनामी केली जाते, तिला तरी आपण
निदान साथसोबत देऊ नका. आयुष्य उध्वस्त होतात. आणि कालांतराने कळतं याच्यामध्ये काही
नव्हतच. तर ही एक माणुसकी आपण सत्ताधारी असो, विरोधी असो पण या देशाचे नागरिक आहोत,
तसं वागा एवढीच माझी विनंती आहे.
राज्य
सरकारच्या न आवडलेल्या कामावर टीका करताना, चांगल्या कामाचं कौतुक करण्याचं आवाहनही
मुख्यमंत्र्यांनी केलं. विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी राज्यपालांकडे जातात मात्र
राज्यपाल काय बोलतात ते ऐकूनही घेतलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. कोविड काळात राज्याच्या
यंत्रणेनं दिवसरात्र काम केलं याचा राज्याला अभिमान आहे. तसंच स्कॉटलंड मध्ये झालेल्या
हवामान बदल परिषदेत राज्याला पुरस्कार मिळाला याचं कौतुक राज्यपालांनी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी नमूद केलं.
दरम्यान,
मुख्यमंत्र्यांचं भाषण हे अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या मुद्याला धरून नव्हतं, विरोधकांच्या
एकाही मुद्याला मुख्यमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत, असं सांगत विरोधकांनी सभात्याग केला.
सदनाबाहेर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, या अधिवेशनातून
महाविकास आघाडी सरकार उघडं पडल्याची टीका केली. ते म्हणाले...
Byte…
या अधिवेशनात कुठलेही मेजर
निर्णय नाही. सरकारकडून कोणालाही दिलासा नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव ८५ पैशांनी वाढल्यानंतर
आंदोलन करणारी काँग्रेस हे किती थोतांड आहे, की इतर राज्यांनी सहा सहा आठ आठ रुपयांनी
आपला टॅक्स कमी केल्यानंतर महाराष्ट्र चवन्नीने देखील टॅक्स कमी करत नाही. हे किती
दुटप्पी आहे. हे या अधिवेशनात आमच्यासमोर स्पष्ट झालेलं आहे. काय अवस्था शिवसेनेवर
आली, मतांची किती लाचारी झाली की, नवाब मलिकांच समर्थन स्वत: उद्धव ठाकरेंना करावं
लागतंय आणि म्हणून या अधिवेशनामुळे महाविकास आघाडी पूर्ण उघडी पडली असं मी या ठिकाणी
म्हणेन.
****
मराठवाडा
वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार असल्याचं आश्वासन, उपमुख्यमंत्री
तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा
प्रस्तावावर ते काल विधानसभेत बोलत होते. मराठवाडा तसंच विदर्भावर अन्याय होऊ देणार
नाही, या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले...
Byte…
काही सन्माननीय सदस्य बोलतांना मराठवाडा ग्रीडच्या संदर्भात बोलले. वास्तविक त्याला आमचा विरोध असायचा काहीच कारण नाही. आम्हाला वाटत नाही का की मराठवाड्यातल्या लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जायचं ठरवलेलं आहे. पहिल्यांदा नाथसागरच्या जवळचा पैठण, वैजापूर हे तालुके कव्हर करायचं ठरवेलेलं आहे. आणि पुढे टप्प्याटप्प्याने जाणार. माझ्या मराठवाडा, विदर्भातल्या जनतेच्या पण लक्षात आणून देऊ इच्छितो, की जोपर्यंत आम्हाला इथं कामाची संधी आहे, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मराठवाडा, विदर्भावर महाविकास आघाडीचं सरकार अन्याय होऊ देणार नाही.
****
मराठा
समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीनं, या समाजाचं मागासलेपण जलदगतीनं सिद्ध करण्यासाठी
वेगळा मागसवर्ग आयोग नेमला जाईल, अशी घोषणा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष
अशोक चव्हाण यांनी केली, ते काल विधान परिषदेत बोलत होते.
****
राज्यात
सर्व शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याच्या
सूचना, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. त्या काल विधान परिषदेत
बोलत होत्या. राज्यात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सुमारे ६५ हजार शाळा
आहेत, त्यापैकी १ हजार ६२४ शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सर्व
शाळांमध्ये मुला-मुलींकरीता निकोप आणि समतामुल्य वातावरण निर्मितीसाठी, आणि सर्व विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेसाठी, सखी-सावित्री समित्या गठीत करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून,
पुढील १५ दिवसात या समित्या गठित करण्यात येतील, असं गायकवाड यांनी सांगितलं.
चांगला
स्पर्श-वाईट स्पर्श याबाबत प्रबोधन, तसंच अज्ञात व्यक्तींच्या सूचनांचं पालन न करण्याबाबत
विद्यार्थ्यांचं प्रबोधन सुरू करण्यात आलं असून, प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसवण्याच्या
सूचना देण्यात येणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.
****
राज्य
महामंडळ एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावं,
असं आवाहन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल विधीमंडळाच्या
दोन्ही सभागृहात केलं. कर्मचारी कामावर आल्यानंतर त्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा
करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
एन
एस ई एल घोटाळाप्रकरणी सक्तवसूली संचालनालय - ईडीनं, शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक
यांची, ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ठाणे आणि मीरारोड इथली संपत्ती
तसंच हिरानंदानी इथलं घर जप्त केल्याची नोटीस आणि राहत्या घराच्या जप्तीची नोटीस ईडीनं
पाठवल्याचं, सरनाईक यांनी सांगितलं. ते काल विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
येत्या तीन दिवसांत या कारवाईबद्दल ईडीला न्यायालयात आव्हान देणार असून, न्यायव्यवस्थेवर
आपला पूर्ण विश्वास असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे २४५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ७८ लाख ७३ हजार २३१ झाली आहे. या संसर्गानं काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
यामुळे दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७७९ एवढी झाली असून, मृत्यूदर
एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ३४६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख
२४ हजार ५६० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८
पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात तीन, बीड दोन, तर लातूरत
आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली. नांदेड, उस्मानाबाद,
जालना, तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
'परीक्षा
पे चर्चा' हा कार्यक्रम या वर्षी येत्या एक एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर
होणार आहे. या कार्यक्रमाचा हे पाचवं वर्ष असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी
परीक्षेतला ताणतणाव बाजूला ठेवून परीक्षेला सामोरे कसं जावं, याविषयी विद्यार्थ्यांशी
संवाद साधणार आहे. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीचे शालेय विद्यार्थी, शिक्षक
आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाते.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल.
****
लोकसभेत
काल वित्त विधेयक संमत झालं, यामुळे नवी करआकारणी लागू होऊन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीची
अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
****
प्रसिध्द
साहित्यिक डॉ प्रमोद भीमराव गारोडे यांच्या, "महात्मा फुले यांचे तृतीयरत्न नाटक
: संहिता व चिकित्सा" या ग्रंथाला, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा,
"डॉ आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार" जाहीर झाला आहे. उद्या २७ तारखेला
नागपूर इथं दीक्षाभूमीच्या सभागृहात हा पुरस्कार डॉ गारोडे यांना समारंभपूर्वक प्रदान
केला जाईल.
****
बीड
जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातल्या नागेवाडी इथं भेसळयुक्त दूध उत्पादन करणाऱ्या एका
केंद्रावर काल कारवाई करत एका व्यक्तीस अटक करण्यात आली. सहायक पोलीस अधीक्षक पंकज
कुमावत यांच्या पथकानं ही कारवाई केली. अप्पासाहेब हरिभाऊ थोरवे असं आरोपीचं नावं असून
या कारवाईत १६० लिटर भेसळयुक्त दूध, रसायन यासह इतर साहित्य जप्त करण्यात आलं.
****
अकोला
जिल्ह्यातल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल कापसाला १२ हजार रुपये प्रति
क्विंटल असा विक्रमी दर मिळाला. या बाजार समितीत विदर्भ तसंच मराठवाड्यातल्या काही
जिल्ह्यातून शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी आणत आहेत.
****
पैठण
इथल्या संत एकनाथ महाराजांच्या ४२३ व्या नाथषष्ठी सोहळ्याची काल काल्याची दहीहंडी फोडून
सांगता झाली. काल्याचा प्रसाद घेऊन लाखो वारकरी पैठण नगरीतून परतीला निघाले आहेत.
दरम्यान,
संत एकनाथांनी मराठीत विपूल लेखन केलं, मात्र त्यांच्या साहित्यावर पुरेसं संशोधन झालं
नाही, असं संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक ताहेर पठाण यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या वतीनं,
नाथषष्ठीच्या अनुषंगानं, दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या, “सद्यस्थितीत संत
साहित्याची प्रासंगिकता” या दोन दिवसीय राष्ट्रीय
परिषदेचं उद्धाटन, ताहेर पठाण यांच्या बीज भाषणानं झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय
राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं फ्रेंच क्रांतीनं जगाला दिली,
असं मानलं जातं, मात्र, फ्रेंच क्रांतीच्या कितीतरी पूर्वी भारतीय संतांनी आपल्या कृतीतून
ही मूल्यं पटवून दिली असल्याचं, पठाण यावेळी म्हणाले.
प्रसिद्ध
साहित्यिक दासू वैद्य यांनी यावेळी केलेल्या भाषणात, जग असेपर्यंत जशी प्राणवायूची
गरज असेल, तशीच संत साहित्याची आवश्यकता ही कायम लागणार असल्याचं मत व्यक्त केलं. या
भाषणाचा संपादित अंश आकाशवाणी वृत्त विभागाच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आज संध्याकाळी
सहा वाजून पस्तीस मिनिटांनी ऐकता येणार आहे.
****
इंडियन
प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ आजपासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी होत
आहेत. यंदा या स्पर्धेत 'लखनौ सुपर जायंट्स' आणि 'गुजरात टायटन्स' हे दोन नवे संघ खेळणार
आहेत. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर आज पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता
नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
****
स्वीस
ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू, किदांबी श्रीकांत, आणि एच एस प्रणॉय
यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुनं कॅनडाच्या मिशेले ली हिचा, प्रणॉयने
पारुपल्ली कश्यपचा, तर किदांबी श्रीकांतनं डेन्मार्कच्या एन्सर्स एंटोनसेनचा पराभव
केला. मलेशियाच्या किसोना सेल्व्हाडुराय कडून पराभवामुळे भारताच्या सायना नेहवालचं
या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला दुहेरीतही एन. सिक्की रेड्डी आणि अश्विनी
पोनप्पा यांच्या जोडीचा उपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाला.
****
महाराष्ट्र
लोकसेवा हक्क कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महाराष्ट्र
लोकसेवा हक्क आयोगाचे औरंगाबाद विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिल्या आहेत. ते
काल परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. या कायद्यामुळे
राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त
झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आतापर्यंत या कायद्यातंर्गत राज्यात ११ कोटी नागरिकांना
सेवा देण्यात आल्याचं ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment