Monday, 28 March 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      शेतकरी, कामगार, अभियंते आणि लघू उद्योजक हे `मेक इन इंडिया`ची शक्ती- मन की बातमध्ये पंतप्रधानांचे गौरवोद्‌गार; उस्मानाबादची हातमाग उत्पादनं आणि महाराष्ट्रातल्या जलस्रोत संवर्धनाचं कौतुक

·      बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार

·      बँक तसंव वीज कर्मचाऱ्यांसह विविध संघटनांचा आज आणि उद्या संप

·      काँग्रेसचं ३१ मार्चपासून ‘महागाईमुक्त भारत आंदोलन तर इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची निदर्शनं

·      पंडित नाथराव नेरळकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त स्वरनाथ संगीत समारोहाचं आयोजन

·      स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पी. वी. सिंधूला अजिंक्यपद

आणि

·      राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा

****

शेतकरी, कामगार, अभियंते आणि लघू उद्योजक हे `मेक इन इंडिया`ची शक्ती असल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. ते काल `मन की बात` या कार्यक्रम श्रृंखलेच्या ८७ व्या भागातून देशवासियांशी संवाद साधत होते. देशानं गेल्या आठवड्यात ४०० अब्ज डॉलर, म्हणजेच ३० लाख कोटी रुपये मूल्याच्या निर्यातीचं लक्ष्य गाठल्याची माहिती देताना, पंतप्रधानांनी, उस्मानाबादच्या हातमाग उत्पादनांचा उल्लेख केला. केंद्र सरकारनंही गेल्या वर्षभराच्या काळात `गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस`च्या माध्यमातून, लघु उद्योजकांकडून सुमारे एक लाख कोटी रुपयांचं साहित्य खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली. सात एप्रिलला साजरा होत असलेल्या जागतिक आरोग्य दिनाच्या अनुषंगानं पंतप्रधानांनी, पद्म पुरस्कार प्राप्त १२६ वर्षांचे बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला. या वयातली त्यांची चपळता सर्वांना प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या बारवांचं पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात रोहन काळे हा तरुण राबवत असलेल्या कामाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

ते म्हणाले...

 

 

Byte PM

महाराष्ट्र के एक साथी है रोहन काले, रोहन पेशे से एक HR Professional है. वह महाराष्ट्र के सैकडों स्टेप वेल्स यानी सिडीवाले पुराने कुओं के संरक्षण कि मोहीम चला रहे हैं. इन मे से कई कुऐं तो सैकडों साल पुराने होते हैं और हमारी विरासत का हिस्सा होते है.

 

आपल्या कामाची पंतप्रधानांनी दखल घेतल्याबद्दल रोहन काळे यांनी आनंद व्यक्त केला. हे सर्वांचं यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, ते म्हणाले..

 

Byte Rohan Kale …

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आमच्या महाराष्ट्र बारव मोहिमेचा उल्लेख केला. ते ऐकून प्रचंड आनंद झाला. आणि राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेची प्रशंसा होत आहे. त्यासाठी मी संपूर्ण टिमच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपल्या कौतुकास्पद उच्चाराने महाराष्ट्रातील लोकं अजून मेहनतीने काम करतील आणि एक दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवतील ही आशा आहे.

 

 

नाशिक इथले चंद्रकिशोर पाटील यांच्या गोदावरी स्वच्छता चळवळीचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. याबाबत पाटील यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या..

 

Byte Chandrashekhar Patil …

या आधीपण पंतप्रधानांनी ट्वीटरवरुन माझं कौतुक केलं आणि प्रत्यक्ष आता ‘मन की बात’ मधून माझ्याविषयी मोदी साहेबांनी जो गौरव माझा केला. खूप बर वाटलं आणि खूप आनंद झाला की, आपण एवढ्या दिवसा पासून जे काम करत आहोत, या कामाला कुठेतरी आज खरी ऊर्जा मिळाली. माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना मोदीजींनी माझा जो गौरव केला याच्यापासून स्फुर्ती मिळेल उर्जा मिळेल. आणि नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी आज हे खूप जरुरी आहे.

 

उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासोबतच पाणी बचत आणि पाणी पुनर्वापराचं आवाहनही पंतप्रधानांनी काल मन की बातच्या माध्यमातून केलं. जलबचतीच्या कार्यात मुलांनी `जल योद्धा` म्हणून उत्स्फूर्ततेनं काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. २३ मार्च या हुतात्मा दिनाच्या अनुषंगानं हुतात्म्यांचं स्मरण करत, पुढच्या महिन्यात साजऱ्या होत असलेली महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ आंबेडकर यांच्याशी निगडित स्थळांना भेटी देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केलं.

****

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काल नागपूर इथं समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातलं काम आता जवळपास पूर्ण झालं असून, या टप्प्याचं उद्घाटन मे महिन्यात करण्याचं प्रस्तावित आहे. रस्त्याच्या दुतर्फा करायच्या सोयी सुविधा तसचं टोलनाके उभारण्याचं कार्य सध्या प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर आठ ओव्हरपास आणि ७६ अंडरपास तयार करण्यात आल्याची माहिती शिंदे दिली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १४० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७३ हजार ५०९ झाली आहे. या संसर्गानं काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७८० एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १०६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २४ हजार ८०३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा, तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली तसंच लातूर जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

नवीन कामगार कायदा, खासगीकरणाला विरोध आदी मागण्यांसाठी देशभरातले कामगार आजपासून दोन दिवसांचा संप करणार आहेत. वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत असल्याचं राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कामगार संघर्ष समितीनं कळवलं आहे. राज्यातल्या सहा जलविद्युत केंद्रांचं खासगीकरण, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याच्या निर्णयाविरुद्ध हा संप पुकारल्याचं समितीनं म्हटलं आहे.

सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी, अधिकारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती बँक एम्पलॉईज फेडरेशनचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली आहे.

औरंगाबाद बिल्डिंग कॉन्ट्रक्टर्स संघटना येत्या एक एप्रिल ते चार एप्रिलपर्यंत लाक्षणिक काम बंद आंदोलन करणार आहे. आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन पुकारल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, वीजनिर्मिती, पारेषण, वितरण या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने मध्यरात्रीपासून मेस्मा कायदा लागू केला आहे.

****

काँग्रेस पक्षाने ३१ मार्चपासून ‘महागाईमुक्त भारत आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाचं सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलं आहे. निवडणुका संपताच दररोज इंधन दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाईविरोधात हे आंदोलन करत असल्याचं, पटोले यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या विरोधात कामगार संघटनांनी आज आणि उद्या पुकारलेल्या देशव्यापी संपाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.

****

शिवसेना कार्यकर्त्यांनी इंधन आणि जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या दरांवरुन केंद्र सरकारच्या विरोधात काल औरंगाबादमध्ये निदर्शनं केली. क्रांती चौक इथं खांद्यावर गॅस सिलेंडर घेऊन, निषेधाचे फलक झळकवत, थाळीनाद करुन आंदोलन केलं. पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, यांनी आंदोलनाचं नेतृत्त्व केलं. याबाबत बोलताना आमदार दानवे म्हणाले..

 

Byte Ambadas Danve

महंगाईची मार आधीच्या पेक्षा अतिशय गतीने चालू आहे. जो गॅस चारशे रुपयाला होता २०१४ ला तो आता एक हजार पन्नास रुपयाला झाला आहे. पेट्रोल डिझलने तर कधीच शंभर पार केलेलं आहे. आणि म्हणून परिणामी औषधींची दरवाढ होत आहे. अन्नधान्याची दरवाढ होते. केंद्राची एक्साईज ड्यूटी २०१४ ला अकरा बारा रुपये होती. जी आज एकोणचाळीस रुपयांच्यावर एक्साईज ड्यूटी गेलेली आहे. केंद्रसकारनं एक्साईज ड्यूटी वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गॅसची दरवाढ ही माता भगिनींच्या दृष्टीनं आणि सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे.

पक्षातर्फे आजपासून शहरात विविध चौक, वार्ड तसंच ग्रामीण भागात गाव निहाय आंदोलन करण्यात येणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी `ऑनलाइन` प्रवेश अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची मुदत दोन एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा ११ ते १३ जून या कालावधीत राज्यातील १७ केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

****

प्रसिद्ध शास्त्रीय गायक दिवंगत पंडित नाथराव नेरळकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त औरंगाबाद इथं आज आणि उद्या दोन दिवसीय नाथस्वर संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या तापडिया नाट्यमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात आज पहिल्या दिवशी शास्त्रीय गायक भुवनेश कोमकली तर उद्या प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर आणि शशांक मक्तेदार यांच्यासह पंडित नेरळकर यांचे शिष्यगण त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

****

औरंगाबाद इथं सुरू असलेल्या महागामी गुरुकुलच्या शार्ङ्गदेव महोत्सवात ड्रेपुंग गोमांग मठातल्या बौद्ध मंडळाच्या मंत्रोच्चारानं सादरीकरणाला प्रारंभ झाला. त्यानंतर पंडित निर्माल्य डे यांचं ध्रुपद गायन तर महागामीच्या शिष्य गणांनी ओडिसी नृत्य सादर केलं. त्यापूर्वी काल सकाळच्या सत्रात महागामीच्या संचालक गुरु पार्वती दत्ता यांनी आचार्य पार्श्वदेव लिखित संगीत समय सारमधील ओडिसी पद-स्थितीबाबत मार्गदर्शन केलं.

****

सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा 'गोविंद सन्मान', काल कदमराई गोंधळ परंपरेतील कलावंत गुलाबराव कदम गोंधळी यांना प्रदान करण्यात आला. औरंगाबाद इथं झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतज्ञ विश्वनाथ ओक यांच्या हस्ते कदम यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. गोंधळी कलाकारांनी यावेळी राधाविलास हा अप्रतिम प्रवेश सादर केला. या पुरस्काराचं हे १५ वं वर्ष आहे.

****

स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. वी. सिंधूनं महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकवलं तर एच. एस. प्रणॉयला पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. सिंधूनं बासेल इथं काल झालेल्या अंतिम लढतीत, थायलंडच्या ओ बुसाननविरुद्ध २१-१६, २१-आठ असा सहज विजय मिळवला. प्रणॉयला अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्तीनं १२-२१,१८-२१ असं पराभूत केलं.

****

न्यूझीलंडमध्ये सुरू आयसीसी महिला विश्र्व चषक क्रिकेट स्पर्धेत गटातल्या अंतिम साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला तीन खेळाडू राखून पराभूत केलं. या पराभवामुळं भारतीय संघाचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. 

****

लातूर जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या विकासामुळे दळणवळण तसंच उद्योग वाढीस मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचं सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात खरोळा इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विकासात्मक कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद इथल्या उमरगा-लोहारा तालुक्यातल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक दोन, रामदरा ते एकुरगाला प्राधान्य देण्यात यावं, अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. या प्रकल्पातला टप्पा क्रमांक सहा प्राधान्य क्रमामध्ये नसल्यामुळे या टप्प्यातील कामाचं सर्वेक्षणही सुरू झालेलं नाही, असं चौगुले यांनी याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे. .

****

राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २९ ते ३१ मार्च दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या ग्रामीण कृषी हवामान विभागानं केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात एकात्मिक शेतीला प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी म्हटलं आहे. ते काल यासंदर्भातल्या कार्यशाळेत बोलत होते. जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेल्या प्रेरणादायी शेतकऱ्यांचा आणि कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार तसंच गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रमाणपत्राचं वाटप यावेळी करण्यात आलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...