Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 March 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मार्च २०२२ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केले. जल शक्ती
मंत्रालय राज्य, संघटना आणि व्यक्तिगत पातळीवरील विविध स्तरातील ११ श्रेणींमध्ये ५७
पुरस्कार यावेळी देण्यात आले. ‘उत्कृष्ट राज्य’ या श्रेणीमध्ये उत्तर प्रदेश प्रथम,
राजस्थान द्वितीय तर तामिळनाडूनं तिसरा क्रमांक पटकावला आहें. जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट
कार्यासाठी त्यांना हे पुरस्कार देण्यात आले. पाणी वाचवण्याच्या बाबतीत देशातील लोकांचे
विचार बदलून पाणी वापराबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं हा या पुरास्कारांचा
उद्देश आहे. ‘जल शक्ती अभियान- कॅच द रेन मोहीम २०२२’ चा ही राष्ट्रपतींनी यावेळी शुभारंभ
केला.
****
केंद्र
सरकारचा नवीन कामगार कायदा तसंच खासगीकरणाच्या धोरणाविरोधात बँक कर्मचारी आणि विद्युत
विभागातल्या कर्मचाऱ्यांनी, कालपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. कोळसा,
लोखंड उद्योग, दूरसंचार क्षेत्र तसंच सार्वजनिक उद्योगातल्या कर्मचारी देखील या संपात
सहभागी झाले आहेत.
दरम्यान,
राज्यसभेत आज विरोधकांनी या संपाचा मुद्दा उपस्थित केला. देशातल्या लोकांचं जीवनमान
संकटात असून सरकारने कामगार संघटनांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं, अशी मागणी मार्क्सवादी
कम्यूनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास यांनी केली. कम्यूनिस्ट पक्षाचे बिनॉय विस्वाम आणि
काँग्रेसचे शक्तिसिंह गोहिल यांनी देखील त्यांना दुजोरा दिला.
****
प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी येत्या एक एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर ‘परीक्षा पे चर्चा’
कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्याशी ते तणावमुक्त
परीक्षेबाबत चर्चा करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या कार्यक्रमात केवळ राजधानी
दिल्ली क्षेत्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणातल्या एक हजार विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं
असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. यंदा या कार्यक्रमासाठी
१५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी ऑनलाईन नोंदणी केली अशी माहिती
त्यांनी दिली.
****
राज्यात
कोविड काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचं गृहमंत्री दिलीप
वळसे पाटील यांनी सांगितलं. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून
हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल,
असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
एक कोटी ४६ लाख नऊ हजार ग्रामीण कुटुंबांपैकी एक कोटी एक लाख ८९ हजार कुटुंबांना, नळाद्वारे
पाणी पुरवठा ही सुविधा प्राप्त झाली आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे
पाणी पुरवठा व्हावा म्हणून २०१९ पासून भारत सरकार राज्यांच्या सहभागातून जल जीवन -
हर घर जल ही योजना राबवत आहे. घरगुती नळ जोडणी शंभर टक्के कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट
जळगाव जिल्ह्याने साध्य केलं आहे. तर जालना, धुळे आणि नागपूर या जिल्ह्यांनी ९० टक्क्यांहून
अधिक प्रगती केली आहे. त्यानंतर सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात ८० टक्क्यांहून
जास्त कुटुंबांना नळ जोडणी मिळाली आहे.
****
राज्यातल्या
कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या पाच नद्यांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय
नदी संवर्धन योजनेअंतर्गत प्रदूषण कमी करण्याच्या योजनांसाठी एकूण एक हजार १८२ कोटी
रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे कराड, सांगली, कोल्हापूर,
नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि प्रकाश या शहरांमध्ये आतापर्यंत प्रतिदिन एकूण २६०
दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
****
आंतरराष्ट्रीय
तृतीयपंथी ओळख दिन ३१ मार्चला साजरा केला जातो. त्यानिमित्त दोन एप्रिल पर्यंत तृतीय
पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद
इथं तृतीयपंथीयांसाठी मतदार नोंदणीचं विशेष शिबिर घेण्यात येत आहे. तृतीयपंथीयांसाठी
कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन मुख्य
निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केलं आहे.
आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात २२ तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी करण्यात आल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
औरंगाबाद
शहरातल्या जालना रोडवर एस एफ एस शाळेसमोर फुटओव्हर ब्रिज उभारणीचं काम आज करण्यात येणार
आहे. त्यामुळे जालना रोडवर आकाशवाणी चौक ते सेव्हन हिल चौकपर्यंतची वाहतूक आज रात्री
११ ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या दरम्यान ही वाहतूक सेव्हन हिल
उड्डाणपुलाखालून गजानन महाराज मंदीर, आदीनाथ चौक मार्गे वळवण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या
सहाय्यक पोलिस आयुक्तांनी यासंदर्भातलं पत्रक जारी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment