Wednesday, 30 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.03.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोकण रेल्वेचं शंभर टक्के विद्युतिकरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकण रेल्वे विभागाचं अभिनंदन केलं आहे. कोकण रेल्वेनं सतत विकासाच्या दिशेनं एक टप्पा गाठला असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

****

वित्त विधेयक-२०२२ आणि विनियोजन विधेयक-२०२२ संसदेत मंजूर झालं. त्यामुळे २०२२-२३ साठीचं अर्थसंकल्पीय कामकाज संसदेनं पूर्ण केलं आहे. या विधेयकांवर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट परदेशी गुंतवणूक मिळवणाऱ्या देशांमधे भारतानं पहिल्या पाचात स्थान कायम राखलं आहे असं सांगितलं. इतर देशातल्या गुंतवणुकादारांनी या सरकारच्या आर्थिक धोरणांवर विश्वास व्यक्त केला आहे, असं त्या म्हणाल्या.

****

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत औरंगाबाद महानगरपालिकेनं सादर केलेल्या डिपीआरला आज होणाऱ्या बैठकीत केंद्राची मंजुरी मिळणार आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पूरी यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. खासदार जलील यांनी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता.

****

राज्यातल्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्यूनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरता, १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मान्यता दिली. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैसे प्रतिलिटरने वाढ करण्यात आली आहे. आठव्यांदा ही दरवाढ झाली आहे. औरंगाबाद शहरात आता पेट्रोलचा दर ११७ रुपये ५० पैसे प्रती लिटर, तर डिझेलचा १०१ रुपये ७१ पैसे प्रती लिटर झाला आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या धारुर इथं आगीतून बहिणीसह दोन लहान मुलांना वाचवताना एका युवकाचा मृत्यू झाला. रवी तिडके असं मृत युवकाचं नाव आहे. काल दुपारच्या सुमारास शेतातल्या घराला आग लागल्यानं घरातल्या सिलेंडरचा स्फोट झाला. आपल्या बहिणीसह दोन मुलांना वाचवण्यात रवी तिडके याला यश आलं, मात्र यात त्याचा होरपळून मृत्यू झाला.

****

No comments: