Sunday, 27 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.03.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 March 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

शेतकरी, कामगार, अभियंते आणि लघू उद्योजक हे ‘मेक इन इंडिया’ची शक्ती असल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. ते आज ‘मन की बात’ या कार्यक्रम श्रृंखलेच्या ८७ व्या भागातून देशवासियांशी संवाद साधत होते. देशानं गेल्या आठवड्यात ४०० अब्ज डॉलर म्हणजेच ३० लाख कोटी रुपये मूल्याच्या निर्यातीचं लक्ष्य गाठल्याची माहिती देताना, पंतप्रधानांनी उस्मानाबादच्या हातमाग उत्पादनांचा उल्लेख केला. केंद्र सरकारनंही गेल्या वर्षभराच्या काळात ‘गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस’च्या माध्यमातून लघु उद्योजकांकडून सुमारे एक लाख कोटी रुपयांचं साहित्य खरेदी केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सात एप्रिलला साजरा होत असलेल्या जागतिक आरोग्य दिनाच्या अनुषंगानं पंतप्रधानांनी पद्म पुरस्कार प्राप्त १२६ वर्षांचे बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला. या वयातली त्यांची चपळता सर्वांना प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. नाशिक इथले चंद्रकिशोर पाटील यांच्या गोदावरी स्वच्छता चळवळीचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. महाराष्ट्रातल्या बारवांचं पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात रोहन काळे हा तरुण राबवत असलेल्या कामाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

उन्हाळ्यात पशूपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासोबतच पाणी बचत आणि पाणी पुनर्वापराचं आवाहनही त्यांनी केलं. जलबचतीच्या कार्यात मुलांनी ‘जल योद्धा’ म्हणून उत्स्फूर्ततेनं काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. २३ मार्च या हुतात्मा दिनाच्या अनुषंगानं हुतात्म्यांचं स्मरण करत, पुढच्या महिन्यात साजऱ्या होत असलेली महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ आंबेडकर यांच्याशी निगडित स्थळांना भेटी देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८३ कोटी १६ लाखांहून अधिक मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात २६ लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. १२ ते १४ वयोगटातल्या एक कोटी २० लाखांहून अधिक किशोरवयीन मुला मुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर दोन कोटी २५ लाखांहून अधिक पात्र नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातल्या युवा वर्गाला आतापर्यंत पहिल्या लसीच्या ५ कोटी ६८ लाखांपेक्षा अधिक तर दुसऱ्या लसीच्या ३ कोटी ७१ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

एकात्मिक पद्धतीनं काम करून मराठवाड्याचं मागासलेपण घालवता येईल, असा आशावाद ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. वराडे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथं, निर्भिड अक्षरांचे दादा आ. कृ. वाघमारे या ग्रंथाचं प्रकाशन आणि परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. आ. कृ. वाघमारे यांनी कठीण काळात निर्भिड पत्रकारिता केली. त्याच प्रमाणे आज मराठवाड्याच्या नेमक्या समस्या काय आहेत, मराठवाडा मागास का आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे या प्रश्नांवर काम करावं लागेल असं ते म्हणाले. ‘प्रादेशिक मागासलेपण आणि विकास पत्रकारिता’ या विषयावर यावेळी परिसंवादही घेण्यात आला. आज नेत्यांच्या भांडणाचीच पत्रकारिता असल्यानं विकासाविषयी कुणी बोलताना दिसत नाही. त्यामुळं विकास पत्रकारिता मागं राहिली तसंच जातीवाद वाढला असं मत मुक्त पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील सावखेडा गंगा इथं आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका बिबट्यानं दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. हे शेतकरी एका दुचाकीवरुन शेतात पाणी देण्यासाठी जात असताना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केलं. शुभम अशोक खटाने हे तीस वर्षीय तसंच अरुण होसाळे हे २८ वर्षीय शेतकरी या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

****

एमजीएम विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या वतीनं २४ ते २६ मार्चदरम्यान औरंगाबाद इथं आयोजित ‘पोस्ट पँडेमिक वर्ल्ड ऑर्डर-अपोर्च्युनिटी अँड चॅलेंजेस’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेची काल सांगता झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.विजया देशमुख होत्या. डॉ.दिलीप कुमार, डॉ.सुनील कुमार यांनी आभासी पदधतीने झालेल्या या परिषदेत मार्गदर्शन केलं.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालय अंतर्गत अकोला-पूर्णा मार्गावरील लोहगड-वाशिम दरम्यान साडे ४५ किलोमीटर अंतर लांबीच्या मार्गाचं विद्युतीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.

****

No comments: