Wednesday, 1 June 2022

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 01.06.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 June 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जून २०२ सायंकाळी ६.१०

****

·      एसटीच्या बस ताफ्यात 'शिवाई' या विजेवर चालणाऱ्या बसचा समावेश.

·      मंकीपॉक्सचं कुठलंही भय मनात ठेवायचं कारण नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे.

·      गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस अर्थात जीईएम वर सहकारी संस्थांकडून खरेदी करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता.

·      काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाचं समन्स. 

आणि

·      कोराडी औष्णिक वीज केंद्राचा मे महिन्यामध्ये वीज निर्मितीचा नवा विक्रम.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभीच आज एसटीच्या बस ताफ्यात विजेवर चालणाऱ्या बसचा समावेश झाला. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात शिवाईया विद्युत बससेवेचा प्रारंभ आणि विद्युत प्रभारक केंद्राचं उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं.

एसटी सेवा प्रदूषणविरहित कशी करता येईल, यावर सरकार विचार करत असून, एसटी सुधारणांसाठी नव्या संकल्पना आणल्या जात आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात राज्य परिवहन महामंडळ प्रवासी वाहतूक सेवा देत असून, कोरोना काळात एसटी कर्मचा-यांनी केलेल्या कामाच्या ऋणातून कधीच उतराई होता येणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राज्य परिवहन महामंडळानं आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून, प्रवाशांना एसटीच्या माध्यमातून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचं, उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले. नजिकच्या काळात प्रत्येक आगारात विद्युत प्रभारक केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

'शिवाई' ही वातानुकूलित बस प्रदूषण आणि आवाज विरहीत असून, या बसमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा, अँड्रॉइड टीव्ही, चालकाच्या कक्षात उद्घोषणा यंत्रणा, कॅमेरा आणि वायफाय यंत्रणा अशा सुविधा आहेत.

शिवाई बस लवकरच राज्यातल्या विविध विभागात सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी या कार्यक्रमात दिली. तर, कोरोना काळात रिक्षाचालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, याची शासनाला जाणीव असल्याचं सांगताना, रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी यावेळी केली.

दरम्यान, अहमदनगरच्या तारकपूर बसस्थानकातून पुण्याला जाणारी पहिली शिवाई बस, पहिल्या अहमदनगर-पुणे बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते, आणि जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आली.

****

इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं नेमलेला बांठिया आयोग इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम करत असून, राज्य सरकार आयोगाला सर्व ती मदत करत आहे, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. येत्या पंधरा ते वीस दिवसात हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे आम्ही ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची परवानगी मागू, असं त्यांनी सांगितलं.

****

मंकीपॉक्स संसर्गाचं एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा भारतात नाही, त्यामुळे मंकीपॉक्सचं कुठलंही भय मनात ठेवायचं कारण नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जनता दरबार उपक्रमाच्या वेळी वार्ताहरांशी बोलत होते. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग करत आहोत, असं ते म्हणाले.

राज्यातल्या ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई आणि पुणे इथं कोरोना रुग्णांचं प्रमाण जास्त आहे, असं नमूद करत, राज्यातल्या सध्याच्या एकूण साडेतीन हजार सक्रीय रुग्णांपैकी अडीच हजार रुग्ण मुंबईत असल्याचं ते म्हणाले. मात्र, रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे सध्या जंबो कोविड सेंटर्सची आवश्यकता नसल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.

****

दरम्यान, जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या मौजे पारडगावं इथं प्रथम श्रेणीचा पशु वैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यात आला असल्याचं टोपे यांनी ट्विट संदेशाद्वारे सांगितलं आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. मराठवाड्यातला सर्वात मोठा गुरांचा बाजार अशी मौजे पारडगावची ओळख आहे, त्यामुळे गावात पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करण्याची मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली होती.

****

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस अर्थात जीईएम वर सहकारी संस्थांकडून खरेदी करण्यास आज केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे सहकारी संस्थांना मुक्त आणि पारदर्शी पद्धतीनं योग्य किंमत मिळवणं शक्य होईल, असं ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयाचा आठ लाख चौपन्न हजारहून जास्त सहकारी संस्थांना आणि त्यांच्या सत्तावीस कोटींहून जास्त सदस्यांना लाभ मिळेल, असं ठाकूर यांनी सांगितलं.

****

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयानं समन्स जारी केलं असून, येत्या आठ तारखेला ईडीच्या दिल्ली कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं ही नोटीस बजावली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आयकर विभागानं आज देशभरातल्या मद्य व्यावसायिकांच्या चारशे ठिकाणांवर छापे टाकले. मुंबई, दिल्ली, हरियाणातलं गुरुग्राम या गावांसह पाच राज्यांतल्या विविध शहरांमध्ये छापे सुरू आहेत. मुंबईत वांद्रे कुर्ला काँप्लेक्स मधल्या दूतावास समूह कार्यालयातही आयकर विभागाचं पथक आज सकाळपासून तपास करत आहे. या व्यावसायिकांनी करचुकवेगिरी केल्याचा संशय आहे.

****

एक हजार नऊशे ऐंशी मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक वीज केंद्रानं या वर्षीच्या मे महिन्यामध्ये जवळपास एक हजार एकशे ब्याण्णव दशलक्ष युनिट वीज निर्मिती करून वीज उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वाणिज्यिक तत्वावर केंद्राचं संचलन सुरू झाल्यापासून प्रथमच हा विक्रम झाला आहे. कोळशाचा काही प्रमाणात तुटवडा असतानाही केंद्रानं विक्रमी वीज उत्पादन केलं असून, महानिर्मितीच्या इतिहासातली ही सर्वोच्च कामगिरी आहे. या विक्रमाबद्दल महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्याचं अभिनंदन केलं असून, त्यांना, पावसाळ्यात राज्यातल्या जनतेला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचं आवाहनही केलं आहे.

****

औरंगाबादहून गल्फ अर्थात आखाती देशांमध्ये जाण्यासाठी विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात उमरा सहल आयोजक आणि औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची आज औरंगाबाद विमानतळावर बैठक झाली. या सर्व उमरा सहल ऑपरेटरांकडून प्रवाश्यांची माहिती गोळा करण्यात येत असून, ती माहिती विमान कंपन्यांना सादर करण्यात येणार असल्याचं औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फांऊडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीचा संपूर्ण परतावा मिळाल्यानं राज्य सरकारनं आता पेट्रोल आणि डिझेलवरचा राज्याचा कर ५० टक्के कमी करावा, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. केंद्र सरकार जीएसटीचा परतावा देत नसल्यानं पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करता येत नसल्याचं सांगत राज्य सरकार आतापर्यंत जनतेची दिशाभूल करत होतं, असा आरोप त्यांनी केला.

****

औरंगाबाद महापालिकेत २०१६ पासून आतापर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी, राष्ट्रवादी काँग्रेस महानगरपालिका, नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार तत्काळ नियुक्ती द्यावी, या मागणीचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.

****

आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या दैनंदिन भत्त्यात वाढ करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज कुलगुरुंना पत्र लिहिलं आहे.

****

नांदेड रेल्वे विभागात करण्यात येणाऱ्या रेल्वे रुळाच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे औरंगाबाद - हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे २९ जूनपर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी दोन तास चाळीस मिनिटे उशिरा धावणार आहे. तसंच नांदेड मेचल विशेष पॅसेंजर रेल्वे तिच्या निर्धारित वेळेपेक्षा एक तास चाळीस मिनिटे उशिरा म्हणजे सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

No comments: