Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 June
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ जून २०२२ सकाळी ७.१० मि.
****
·
गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केंद्र सरकारच्या विविध
योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद,
·
चांगल्या योजनांची
अंमलबजावणी राज्यात शेवटच्या घटकांपर्यंत केली जात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
·
केंद्राकडून वस्तु आणि सेवा
कर भरपाईचे महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये प्राप्त
·
प्रसिद्ध बासरीवादक पंडित
हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पंडित शिवकुमार शर्मा यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत
जीवनगौरव तर नांदेडचे दत्ता भगत आणि सतीश
आळेकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर
·
राज्यात काल कोविड संसर्गाचे ७११ नवे रुग्ण
·
लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुनाथ-
केके यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं
निधन
**आणि**
·
देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त
****
बातमीपत्राला सुरवात करण्यापूर्वी, आजादी का अमृत महोत्सवानिमित्त, प्रादेशिक
वृत्तविभाग आणि एमजीएम विद्यापीठ आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेत काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर..
****
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राद्वारे आपल्याला २१
व्या शतकातला महान भारत घडवायचा आहे, असा संदेश पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी काल दिला. केंद्रात भाजप सरकारनं आठ वर्षं पूर्ण केल्याच्या निमित्तानं देशभरात
आयोजित केल्या गेलेल्या गरीब कल्याण संमेलन, या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शिमला इथून भाग घेतला, त्यावेळी ते बोलत होते. गरीब कल्याण आणि सुशासनासाठी केलेल्या योजनांनी
सरकारची व्याख्या बदलली असून, देशवासी
आता सरकारकडे सत्ताधीश म्हणून नाही तर एक सेवक म्हणून पाहतात, असंही ते म्हणाले. विविध क्षेत्रात होत असलेल्या विकास कामांची
माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात सुरुवातीला प्रधानमंत्री किसान
सन्मान निधीच्या अकराव्या हप्त्याचं
हस्तांतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातले केंद्रीय राज्यमंत्री विविध ठिकाणांहून
दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी सोलापूरहून, केंद्रीय
रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्याहून तर केंद्रीय अर्थ राज्य
मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबादहून या कार्यक्रमाला हजेरी लावली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं समाजातल्या सर्वच
घटकांसाठी १६२ प्रकारच्या कल्याणकारी योजना आणल्या असून या योजनांबाबत जनजागृती
करण्यासाठी औरंगाबाद इथं एक माहिती केंद्र सुरु करण्याची गरज केंद्रीय अर्थ
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी
कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं गरीब कल्याण संमेलनाचं आयोजन करण्यात
आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.
भारत झपाट्यानं प्रगतीकडे वाटचाल करत असून देश आर्थिकदृष्ट्या प्रगत पाच
देशांमध्ये सहभागी झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राज्यातल्या विविध योजनांच्या
लाभार्थ्यांशी संवाद साधला. योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षभेद विसरून
आणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्राम विकास विभागानं राज्यस्तरीय संवाद
कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी
मुख्यमंत्री बोलत होते. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही चाळीस टक्के वाटा
आहे असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
देखील यावेळी लाभार्थ्यांशी
संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसंच त्यांच्या आणखी काही अपेक्षा
आहेत का हे जाणून घेतलं.
यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर
तालुक्यातल्या रायपूरचे बाळू राऊत, सिल्लोड
तालुक्यातल्या भराडीचे कृष्णा महाजन आणि फुलंब्रीच्या सुवर्णा भुईगळ यांनी
योजनांच्या लाभांविषयी मनोगत व्यक्त केलं.
****
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. किमान आधारभूत
किंमतीमुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळत असल्याचं उस्मानाबाद
इथल्या वानेवाडी इथले शेतकरी प्रविण शेळके यांनी सांगितलं.
“या
वर्षी जी शासकीय खरेदी योजना आहे - हमीभाव खरेदी केंद्र. याठिकाणी पाच हजार २३० रुपये
हरभऱ्याचा हमी भाव असल्यामुळे नक्की शेतकऱ्यांना फायदा होतोय आणि त्याचा फायदा मलाही
झाला आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर आपले २१ क्विंटल उत्पन्न जर चालू बाजार भावानं विकायला गेलो असतो. तर त्याठिकाणी माझ्या मालाला
४४ ते ४५ रुपये सरासरी भाव मिळाला असता. तर हाच माल माझ्याभागामध्ये जी काही शासकीय
योजना निर्माण झालेली आहे या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि या योजनेमुळे माझा फायदा असा
झाला की, माझा जो काही हरभरा आहे तो हरभरा असणार पाच हजार २३० रुपये दराने चांगल्या
दराने असणारा विकला गेला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतोय.”
****
केंद्र सरकारनं ३१ मे २०२२ पर्यंतची वस्तु आणि सेवा कर- जीएसटी भरपाईची रकम सर्व राज्यांना काल जारी केली. या
भरपाईपोटी केंद्र सरकारनं एकूण ८६ हजार
९१२ कोटी रुपये जारी केले असून, महाराष्ट्राला
जीएसटी भरपाईचे १४ हजार १४५ कोटी रुपये मिळाले आहेत.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक
पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध
बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला
आहे. दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना भारतरत्न पंडित
भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लोककला क्षेत्रातल्या
प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्यासाठीचा विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार
आतांबर शिराढोणकर आणि संध्या माने यांना मिळाला आहे. २०२०-२१ या वर्षासाठीचा
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार नांदेडच्या दत्ता भगत यांना तर
२०२१-२२ साठीचा हा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. या चार पुरस्कारांसह
इतरही विविध पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.
****
वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील
विविध परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून परिचारिकांनी आपलं
आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
यांनी केलं आहे. परिचारिकांच्या १२ मागण्यांबाबत तसंच परिचारिकांचे प्रश्न
सोडवण्याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक अभ्यास करतील. येत्या एक ते दीड महिन्यात याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं मंत्री देशमुख यांनी सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ७११ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख
८७ हजार ८६ झाली आहे. राज्यात काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८६० झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश
टक्के आहे. काल ३६६
रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात
आतापर्यंत ७७ लाख ३५ हजार ७५१
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन हजार ४७५ रुग्णांवर उपचार सुरू
आहेत.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा
२०२० चा निकाल काल जाहीर केला. या परिक्षेत सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रमोद चौगुले, महिलांमधून रुपाली माने आणि मागासवर्ग उमेदवारांमधून गिरिश परेकर हे प्रथम आले
आहेत.
****
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काल राज्यभरातून अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला विविध
सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात
आलं.
भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली
वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी
अहिल्यादेवी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
लोकप्रिय गायक कृष्णकुमार
कुनाथ- केके यांचं काल हृदय विकाराच्या झटक्यानं कोलकाता इथं निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. एक
संगीत कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांना
हृदय विकाराचा झटका आला
होता, त्यातच त्यांचं
निधन झालं. त्यांचे हम दिल दे चुके है सनम या चित्रपटातील तडप तडप के इस दिल से या गाण्यानं ते प्रसिध्दीच्या झोतात आले. तु
जो मिला, दस बहाने करके ले गयी दिल, आँखो में तेरी अजबसी अदा है आदी
गाण्यांनही त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत केके यांनी हिंदी, मराठी, तामिळ, तेलूगु, कन्नड, मल्याळम, बंगाली, आसामी, गुजराती
आदी भाषेत अनेक गाणी गायली आहेत.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. नांदेडमध्ये जिल्हा
सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आणि इंडियन डेंटल असोसिएशन
यांच्या संयुक्त विद्यमाने काल फेरी काढण्यात आली. तसंच जिल्ह्यातल्या भोकर इथल्या
ग्रामीण रुग्णालयात उपस्थितांना तंबाखू विरोधी प्रतिज्ञा देण्यात आली
****
एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टीकवर येत्या १ जुलैपासून राज्यात पूर्णतः बंदी घातली जाणार आहे, या
पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात या प्लास्टिक जप्तीची
मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्याची
सूचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रशासनाला दिली आहे. केंद्र शासनाच्या अध्यादेशानुसार
ही पूर्णत: बंदी घालण्याचे आदेश असून, याबाबत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन जनजागृती करावी. सर्व नगरपरिषदांनी
त्यांच्या कार्यालयात तसंच सार्वजनिक ठिकाणी यासाठी भित्तीफलक लावावेत, असंही जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी सूचित केलं.
****
राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं उत्तरप्रदेशातले नेते इम्रान
खान उर्फ प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला
विरोध करीत प्रदेश काँग्रेसचे महासचिव आशिष देशमुख यांनी काल
पदाचा राजीनामा दिला. प्रतापगढी यांचं काँग्रेस पक्षात काहीही
योगदान नाही, असं सांगत, उत्तरप्रदेशातल्या तीन अपयशी नेत्यांना पक्षानं इतर
राज्यांवर लादल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.
****
देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान
विभागानं आपल्या सुधारीत अंदाजामध्ये वर्तवली आहे. या अंदाजात चार टक्के कमी - अधिकची
तफावत गृहीत धरण्यात आली आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसासाठी वातावरण अनुकूल बनलं असून येत्या दोन ते तीन दिवसात कोकण आणि गोव्यासह देशाच्या
किनारपट्टीच्या काही भागात मान्सून पुढे सरकेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
काल दुपारी नांदेड शहरातल्या काही भागांमध्ये अर्धा तास वादळी पाऊस झाला. यावेळी जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या आंबुलगा बुद्रुक इथल्या ४२
वर्षीय महिलेचा अंगावर वीज पडल्यामुळं मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यात, औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात तसंच सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment