Wednesday, 1 June 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक –०१ जून २०२२ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 June 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –०१ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर घातलेली बंदी आजपासून लागू झाली असून, ती यावर्षीचे सणासुदीचे दिवस संपेपर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे आणि स्वत: उत्पादन केलेल्या साखरेचा सर्वात जास्त वापर करणारा देशही आहे. देशामध्ये साखरेची पुरेशी उपलब्धता राहावी, या दृष्टीनं सरकारनं मागच्या आठवड्यात साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या हंगामात देशाची साखर निर्यात विक्रमी पातळीवर पोचल्यावर पुढे येणा-या सणाच्या दिवसांमध्ये देशात साखर पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावी, यासाठी निर्यातबंदी लागू केल्याचं अन्न सचीव सुधांशु पांडे यांनी सांगितलं. याशिवाय, जागतिक पातळीवर साखरेची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं पांडे यांनी सांगितलं.

****

डायरेक्ट-टू-मोबाइल आणि फाईव्ह जी ब्रॉडबँड यांच्यातल्या अभिसरणामुळे भारतात ब्रॉडबँडचा वापर आणि स्पेक्ट्रमचा वापर सुधारेल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटी कानपूर आणि भारतीय दूरसंचार मानके विकास सोसायटी - टी एस डी एस आय यांनी दिल्लीत आकाशवाणी केंद्रात आयोजित केलेल्या डायरेक्ट-टू-मोबाइल आणि फाईव्ह जी ब्रॉडबँड कन्व्हर्जन्स रोडमॅप फॉर इंडियाया विषयावरच्या परिषदेत ते आज बोलत होते. जगात सर्वात जास्त मोबाइल डेटा असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं ते म्हणाले. भारतात जगातला सर्वात स्वस्त डेटा प्रदान करण्यात येतो, हे देशातल्या दूरसंचार कंपन्यांचं यश असल्याचं, चंद्रा म्हणाले. या परिषदेला प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

****

भारत आणि बांग्लादेश दरम्यान धावणार असलेल्या मिताली एक्सप्रेस या रेल्वेगाडीची आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि बांगलादेशचे रेल्वेमंत्री मोहंमद नुरुल इस्लाम सुजॉन यांनी या गाडीला दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वेगाडी भारतातल्या न्यू जलपैगुडी ते बांग्लादेशातल्या ढाका दरम्यान धावणार आहे. या दोन देशांदरम्यानची ही तिसरी रेल्वेगाडी आहे.

****

अयोध्येत बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिराच्या गाभा-याच्या बांधकामाला आजपासून सुरुवात होत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहाच्या पायाभरणी सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते पहिला कोरीव दगड ठेवून गाभा-याची पायाभरणी करण्यात आली. या भूमिपूजनासह मंदिराच्या निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुतऱ्याचं बांधकाम करण्यात आलं. योगी आदित्यनाथ यांनी आधी हनुमान गढी इथं येऊन प्रथम दर्शन घेतलं आणि मग राम मंदिर गाभाऱ्याची पहिली शिळा ठेवली.

****

राष्ट्रीय शिक्षण मंत्र्यांची दोनदिवसीय परिषद आज गुजरामध्ये होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर केंद्रीय मंत्री आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत २०२० च्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करून देशातल्या शैक्षणिक परिसंस्था बळकट करण्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

****

देशात गेल्या चोवीस तासांत दोन हजार सातशे पंचेचाळीस नवे कोरोनाबाधित आढळले असून दोन हजार दोनशे छत्तीस रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात काल सहा रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली असून, चार कोटी सव्वीस लाख सतरा हजार आठशे दहा रुग्ण या विषाणू संसर्गातून बरे झाले आहेत. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत एकशे त्र्याण्णव कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त आहे. पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी काल त्यांना मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यावर शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली.

****

हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रख्यात गायक कृष्ण कुमार उर्फ केके यांच्या निधनानंतर कोलकता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचं प्रकरण दाखल करून घेतलं आहे. केके यांच्या साथीदारांनी त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा दावा केला, त्यानंतर पोलिस त्या दृष्टीनं तपास करत आहेत.

****

जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातल्या सज्जा उमरखेडा इथला तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगरुळ इथला तलाठी मंगेश लोखंडे यांना १७ हाजर रुपये लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराची वाळुची गाडी सोडण्यासाठी त्यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती, त्यापैकी १७ हजार रुपये फोन पे द्वारे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं त्यांना अटक केली.

****

 

 

 

No comments: