Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 June
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ जून २०२२ सकाळी ७.१० मि.
****
· देशातील सहकारी संस्थांना गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलवरुन आवश्यकतेनुसार खरेदी करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
· लेखी आश्वासनानंतर राज्यातील परिचारिकांचं बेमुदत आंदोलन मागे
· राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात विजेवर चालणाऱ्या शिवाई बसचा समावेश
· ऱिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करण्याची परीवहन मंत्र्यांची घोषणा
· सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश
· राज्यात कोविड संसर्गाचे एक हजार ८१ नवे रुग्ण
· केंद्र सरकारच्या कोविड प्रतिबंधक लस देण्याच्या हर घर दस्तक
मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
आणि
· बीड नगरपालिकेतील मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांच्यासह चार कर्मचारी गैरकारभार आणि गैरव्यवहाराच्या आरोपांवरुन निलंबित
****
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस अर्थात जीईएम या केंद्र सरकारच्या पोर्टलवरुन देशातील सहकारी
संस्थांना आवश्यकतेनुसार खरेदी करण्यास काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर
वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयामुळे सहकारी संस्थांना खुल्या आणि
पारदर्शक प्रक्रियेद्वारे स्पर्धात्मक किंमतीत वस्तू खरेदी करायला मदत मिळेल. याचा
८ लाख ५४ हजार नोंदणीकृत सहकारी संस्था आणि त्यांच्या २७ कोटी
सदस्यांना लाभ होईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
जेम पोर्टलमुळे ७० टक्के सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योजकांना मोठा फायदा झाला आहे. यात
१२ टक्के महिला उद्योजकांचा समावेश आहे. विविध सार्वजनिक उपक्रम, मंत्रालये, विभाग, स्वायत्त
संस्था किंवा सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी जीईएम पोर्टलवरून
खरेदी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य
सरकारनं नेमलेला बांठिया आयोग इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम करत असून, राज्य सरकार आयोगाला सर्व ती मदत करत आहे,
असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. येत्या पंधरा ते वीस दिवसात हे काम पूर्ण होईल आणि
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे आम्ही ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची परवानगी
मागू, असं त्यांनी सांगितलं.
****
विविध प्रलंबित मागण्यांसाठी आठवडाभर बेमुदत आंदोलन
करणाऱ्या राज्यातील परिचारिकांच्या मागण्यांबाबत १५ जुलैपर्यंत अभ्यास करून
अंमलबजावणी केली जाईल असं
लेखी आश्वासन दिल्यानंतर परिचारिकांनी काल बेमुदत आंदोलन मागे घेतलं आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका
संघटनेने दिली. कंत्राटी पद्धतीवर पदे न भरता कायमस्वरुपी पदभरती करावी, केंद्र सरकारप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, आदी प्रलंबित मागण्यांसाठी २३ मे पासून परिचारिकांनी
राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं होतं.
सरकारच्या संबंधित विभागाकडे या मागण्यांबाबत
सातत्यानं निवेदनं, भेट घेऊनही लक्ष वेधण्यात आलं, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे २८ मे पासून राज्यभरातील परिचारिकांनी बेमुदत
कामबंद आंदोलन सुरु केलं होतं.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभी काल महामंडळाच्या बस ताफ्यात विजेवर चालणाऱ्या बसचा
समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाइन
उपस्थितीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकातून ‘शिवाई’
या विजेवर चालणाऱ्या बससेवेचा शुभारंभ झाला
तसंच याचवेळी विद्युत प्रभारक केंद्राचंही
उद्घाटन करण्यात आलं.
बस सेवा प्रदूषणविरहित कशी करता येईल,
यावर सरकार विचार करत असून, महामंडळात सुधारणांसाठी
नव्या संकल्पना आणल्या जात आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं. 'शिवाई' ही
वातानुकूलित बस प्रदूषण आणि आवाज विरहीत असून, या बसमध्ये
मोबाईल चार्जिंगची सुविधा, अँड्रॉइड टीव्ही, चालकाच्या कक्षात उद्घोषणा यंत्रणा, कॅमेरा आणि
वायफाय यंत्रणा अशा सुविधा आहेत.
कोविड काळात रिक्षाचालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, याची शासनाला जाणीव असल्याचं सांगताना, रिक्षाचालकांसाठी
महामंडळ स्थापण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी यावेळी केली.
****
मंकीपॉक्स संसर्गाचं एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा
भारतात नाही, त्यामुळे
मंकीपॉक्सचं कुठलंही भय मनात ठेवायचं कारण नाही, असं आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत जनता
दरबार उपक्रमाच्या वेळी वार्ताहरांशी बोलत होते. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर
बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करत आहोत,
असं ते म्हणाले.
राज्यातल्या ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई आणि पुणे इथं कोविड रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. मात्र, रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे सध्या जंबो कोविड
सेंटर्सची आवश्यकता नसल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी पावसाळ्यात महापुरांचं नियोजन करतांना महसूल, पोलीस,
जलसंपदा यांसह सर्वच विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या
संभाव्य पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पाटील यांनी
राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा
विभागाचे अधिकारी यांच्याशी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद
साधला, त्यावेळी ते बोलत होते. नदीनाल्यांमधील गाळ काढण्याचं
काम पूर्ण करावं, शेजारच्या राज्यांशी संपर्कात राहून
तिथल्या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर लक्ष ठेवावं अशा
सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे
पाटील यांनी दिले आहेत. यासंदर्भात मुंबईत आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी
राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री देण्यात आली असून याचा परिपूर्ण वापर करावा
तसंच या विभागातील रिक्त पदं तातडीनं भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही
त्यांनी यावेळी दिले. सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन
क्रमांकाची प्रभावी प्रसिद्धी तसंच यासंदर्भात शासनामार्फत सुरु असलेल्या
उपाययोजना, अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि व्यवस्थेसंदर्भात
जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत सायबर विभाग
सक्षमीकरण, सद्यस्थितीत सुरु असलेलं प्रकल्प याबाबत चर्चा
करण्यात आली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले एक हजार ८१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ७८ लाख ८८
हजार १६७ झाली आहे. राज्यात काल या
संसर्गानं एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७
हजार ८६० झाली आहे, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे.
काल ५२४ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३६ हजार २७५
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या चार
हजार ३२
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
केंद्र सरकारनं कालपासून घरोघरी जाऊन कोविड प्रतिबंधक लस देण्याच्या हर
घर दस्तक मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. याअंतर्गत पात्र
लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची मात्रा दिली जाणार आहे.
ही मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. संपूर्ण लसीकरण
सुनिश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी
नोव्हेंबरमध्ये हर घर दस्तक मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती.
****
विशेष सीबीआय न्यायालयानं काल मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे
यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही परवानगी मिळाली आहे. विशेष न्यायाधीश
डी.पी. शिंगाडे यांनी याचिका स्वीकारताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत दिलेली सर्व वस्तुस्थिती
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उघड करावी, खटल्यादरम्यान संपूर्ण
प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सरकारी वकिलानं विचारलेल्या प्रश्नांची त्याने सत्यपणे
उत्तरे द्यावीत, असं नमूद करण्यात आलं आहे.
****
एक हजार नऊशे ऐंशी मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक
वीज केंद्रानं या वर्षीच्या मे महिन्यामध्ये जवळपास एक हजार एकशे ब्याण्णव दशलक्ष
युनिट वीज निर्मिती करून वीज उत्पादनाचा नवा विक्रम स्थापित केला आहे. वाणिज्यिक
तत्वावर केंद्राचं संचलन सुरू झाल्यापासून प्रथमच हा विक्रम झाला आहे. कोळशाचा
काही प्रमाणात तुटवडा असतानाही केंद्रानं विक्रमी वीज उत्पादन केलं असून, महानिर्मितीच्या इतिहासातली ही सर्वोच्च
कामगिरी आहे. या विक्रमाबद्दल महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय
खंदारे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं असून,
त्यांना, पावसाळ्यात राज्यातल्या जनतेला
अखंडित वीज पुरवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचं आवाहनही केलं आहे.
****
बीड नगरपरिषदेतील गैरकारभार तसंच विकास कामातील
गैरव्यवहार यावरून बीड नगरपालिकेतील मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांच्यासह
इतर दोन अभियंता आणि दोन कर्मचाऱ्यांवर काल एका आदेशान्वये निलंबनाची कारवाई
करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमदार
विनायक मेटे यांच्या या संदर्भातल्या लक्षवेधीवर या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचं
आश्वासन दिलं होतं. मुख्याधिकारी गुट्टे आणि या चार कर्मचाऱ्यांनी सभागृहात लक्षवेधी असताना या लक्षवेधीच्या
अनुषंगानं कुठलीही पुरक माहीती दिली नाही, शिवाय
वरिष्ठांच्या आदेशाचं उल्लंघन केलं, यावरून या सर्वांवर
शिस्तभंगाची कारवाई म्हणून पुढील आदेशा पर्यंत निलंबनाची ही कारवाई करण्यात आली
आहे.
****
औरंगाबादहून गल्फ अर्थात आखाती देशांमध्ये जाण्यासाठी
विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात उमरा सहल आयोजक आणि औरंगाबाद विमानतळ
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची काल औरंगाबाद विमानतळावर बैठक झाली. या सर्व उमरा टूर ऑपरेटरांकडून
प्रवाश्यांची माहिती गोळा करण्यात येत असून, ती माहिती विमान
कंपन्यांना सादर करण्यात येणार असल्याचं औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फांऊडेशनचे
अध्यक्ष जसवंत सिंग यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या पारडगावं
इथं प्रथम श्रेणीचा पशु वैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यात आला असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट
संदेशाद्वारे सांगितलं आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
मराठवाड्यातला सर्वात मोठा गुरांचा बाजार अशी पारडगावची ओळख आहे, त्यामुळे गावात पशुवैद्यकीय दवाखाना सुरु
करण्याची मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली होती.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचा चोविसावा दीक्षान्त समारंभ काल राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन
उपस्थितीत पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी विविध शाखेतून यशस्वी ठरलेल्या एकूण ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान
करण्यात आलं. याप्रसंगी बोलतांना राज्यपाल कोश्यारी यांनी, चांगला
माणूस बनण्याचं तरुणांनी ध्येय बाळगावं असं आवाहन केलं.
****
आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या दैनंदिन भत्त्यात वाढ
करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.
प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची, तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment