Friday, 24 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  24 June  2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जून २०२   दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, जनता दल संयुक्त पक्षानं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. जनता दल संयुक्त, द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीचं स्वागत करत असल्याचं, या पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. लोक जनशक्ति पक्षाच्या - रामविलास गटानेही मुर्मू यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे. राष्ट्रीय जनता दलानं मात्र विरोधी पक्षाचे उमेद्वार यशवंत सिंह यांचं समर्थन केलं आहे.

****

राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही, असा खुलासा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नसून, तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असं ते म्हणाले. शिवसेनेतल्या बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल, असं पाटील म्हणाले.

****

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाईदलातल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठीची नोंदणी प्रक्रिया आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना अग्निपथ वायु डॉट सी डी ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठीची ऑनलाईन परीक्षा देशभरातल्या २५० केंद्रांवर २४ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. ही प्रक्रिया या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल. तर लष्कर आणि नौदलाच्या भरतीप्रक्रिया एक जुलैपासून सुरू होणार आहेत.

****

खेळाडुंची विविध स्पर्धांमधली कामगिरी कशी उंचावेल, क्रीडा सुविधांचा विस्तार कसा करता येईल, पहिल्या दहा अग्रणी देशांमध्ये स्थान पटकावेल, जास्तीत जास्त पदके पटकावेल, यासाठी सर्व राज्यं एकत्र येऊन एक राष्ट्रीय रोडमॅप तयार करतील, असं केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या केवाडिया इथं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज अनुराग ठाकुर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, ट्रायबल गेम्स अशा स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्यास खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळेल, खेळाडूंसाठी सुविधा, प्रशिक्षकांची नियुक्ती या विषयांवर राज्यांसोबत या परिषदेत चर्चा करण्यात येणार असल्याचं ठाकुर यांनी सांगितलं.

****

ब्यूरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन या विभागाचं नाव बदलून, आता सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन असं करण्यात आलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं २१ जून रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार मुख्यालय पातळीवर आता हा विभाग सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन या नावाने ओळखला जाईल.

****

राज्यातल्या १४ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधल्या तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रमात, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी, विशेष तुकडी सुरु करण्यात येणार आहे. या तुकडीमध्ये ७० टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, प्रवेशासाठी ३० जून पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आलं आहे. हिंगोली, जालना, अंबड, लातूर, नांदेडसह आठ शहरांमधल्या शासकीय तंत्रनिकेतन आणि मुंबईतल्या शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था इथं या तुकड्या सुरु होत आहेत. या विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी एक हजार १५५ जागा उपलब्ध असून याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थी म्हणूनही वार्षिक सात हजार ७५० रुपये इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाचा मार्ग उपलब्ध आहे.

****

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणं पेरणी ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी, असं आवाहन, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केलं आहे. प्रति हेक्टरी बियाणं दर ७५ किलोवरुन ५० ते ५५ किलोवर आणावं. यासाठी सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचं बियाणं पेरणीसाठी वापरण्यात यावं, असंही मोटे यांनी सांगितलं.

****

डब्लिन इथं सुरू असलेल्या युनिफार कनिष्ठ पाच देशांच्या हॉकी मालिकेत काल भारतीय महिला संघानं अमेरिकेच्या संघावर चार - एक असा विजय मिळवला. भारताकडून अन्नूने दोन तर निकिता टप्पो आणि वैष्णवी फाळके यांनी प्रत्येकी एक गोल केला.

****

फ्रान्स इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्य फेरीत भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भाकत आणि सिमरनजीत कौर यांच्या संघानं तुर्की संघाचा पाच - तीन असा पराभव केला.

****

No comments: