आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ जून २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाईदलातल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठीची
नोंदणी प्रक्रिया आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना अग्निपथ
वायु डॉट सी डी ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता
येणार आहे. यासाठीची ऑनलाईन परीक्षा देशभरातल्या २५० केंद्रांवर २४ ते ३१ जुलैदरम्यान
होणार आहे. ही प्रक्रिया या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल. तर लष्कर आणि नौदलाच्या भरतीप्रक्रिया
एक जुलैपासून सुरू होणार आहेत.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज उमेदवारी
अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी त्या काल नवी दिल्लीत दाखल झाल्या. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी यावेळी त्यांची भेट घेतली.
दरम्यान, जनता दल संयुक्त पक्षानं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. जनता
दल संयुक्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांनी ही माहिती दिली. लोक जनशक्ति
पक्षाच्या - रामविलास गटानेही मुर्मू यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे. राष्ट्रीय
जनता दलानं मात्र विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिंह यांचं समर्थन केलं आहे.
****
देशातल्या काही राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल तज्ञ आणि अधिकाऱ्यांबरोबर
बैठक घेतली. रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांकडे बारकाईनं लक्ष ठेवून चाचण्यांची
संख्या वाढवण्याची आणि लसीकरणाला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
नंदूरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ इथं राज्यातल्या पहिल्या आंतराष्ट्रीय शाळेचं उद्घाटन
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये
काल ‘ऑनलाईन’ पद्धतीनं करण्यात आलं. या शाळेसाठी ४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा
उपयोग करण्यात आला आहे. निवासी स्वरुपाची ही शाळा आहे. यामध्ये तोरणमाळ परिसरातल्या
२९ वाड्या पाड्यांसह जिल्ह्यातल्या सोळाशेहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय
दर्जाचं शिक्षण दिलं जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment