Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 25 June 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०२२ सकाळी ७.१० मि.
****
· मातोश्रीवर आरोप करणाऱ्या भाजपसोबत सत्तेत बसणार नाही-शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती;शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्ष उभारणीचं आवाहन
· शिवसेनेच्या बंडखोर गटाला कायदेशीरदृष्ट्या मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळणं अशक्य-डॉ
नीलम गोऱ्हे यांचा दावा
· राज्यात काल कोविडचे नवे चार हजार २०५ रुग्ण; मराठवाड्यात नव्या ४२ रुग्णांची
नोंद
· चालु शैक्षणिक वर्षात पहिली ते १२ वी साठी १०० टक्के पाठ्यक्रम लागू
· शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई
· औरंगाबाद इथल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबित
आणि
· जालना तसंच औरंगाबाद जिल्ह्यात काल पावसाशी निगडित घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू
सविस्तर बातम्या
मातोश्रीवर आरोप करणाऱ्या भाजपसोबत पुन्हा सत्तेत बसणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख
तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. काल शिवसेना पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुखांची
मुंबईत बैठक झाली, या बैठकीला दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलताना, पक्षप्रमुख
ठाकरे यांनी, भाजपने कायमच फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले..
मी एकदा त्यांना थेट विचारलं
की असं असं कानावर येतंय, नाही नाही नाही मी असा कसा वागेन, नाही म्हटलं खोटं असेन
खोटं असावं असं माझं म्हणन आहे. ते असेल तर स्पष्ट सांगा. आपण भाजपसोबत जायला पाहिजे
असा काही आमदारांचा माझ्यावरती एक दबाव आहे. म्हंटल ठिक आहे. मी जनतेबरोबर जाईन पण
भाजपासोबत जाणार नाही. ज्या भाजपाने माझ्यावरती, मातोश्रीवरती वेडेवाकडे काही बोलल्यानंतर
तुमच रक्त गरम होतं नाही का? कसले शिवसैनीक तुम्ही? एक साध्या आजी त्यांना नाव पडलय
फायर आजी, ती त्या तळपत्या उन्हामध्ये तापलेल्या रस्त्यावरी बसते, मातोश्रीवरती कोन
येतोय बघते. आणि बाकी सगळे मोठी झालेली षंढ भाजपसोबत जा म्हणून सांगताय. म्हंटल माझ्याकडुन
होणार नाही, ज्यांना जायचं त्यांना जावू द्या. पण एक लक्षात घ्या म्हंटल, वापरा आणि
फेका ही त्यांची नीती आहे. तुम्हाला सुद्धा ते वापरतील आणि फेकून देतील, त्यांच्यामध्ये
आपल्याशी लढण्याची हिंमत नाही, धमक नाही. म्हणून आपलीच माणसं फोडायची आणि आपल्या अंगावर
सोडायची. त्यांचं नुकसान काहीच होत नाहीये. होणार नाहीये.
Byte…
बाळासाहेबांची शिवसेना आता
संपली. बर संपली शिवसेना. त्याच्यानंतर शिवसेना एकदा नाही तर दोनदा सत्तेत आली. आणि
दोन्ही वेळेला यांना आपण मंत्रीपद दिलं. आणि मंत्रीपद कुठल, जे खातं नेहमी सीएम नेहमी
स्वत:कडे ठेवतात, ते खातं मी त्यांना दिलं. २०१२ नंतरची जी काही तिकिट वाटप केली होती,
बाळासाहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली होती. आणि तसं शेवटच्या मनोगतात बाळासाहेबांनी
तुम्हाला सर्वांना आवाहन केलं आहे की, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. मग त्या
जबाबदारी मध्ये मी तुम्हाला ही उमेदवारी दिली होती. त्या उमेदवारीनंतर तुम्ही निवडून
आलात. आणि तुम्ही सांगताय की ती शिवसेना बाळासाहेबांची नाही. अहो ठाकरे आणि शिवसेना
ही दोन नावं, दोन शब्द वेगळे करुन तुम्ही शिवसेना चालवून दाखवाचं. माझं आज सुद्धा आव्हान
आहे.
Byte…
महत्त्वकांक्षा जरुर असावी पण ती राक्षसी महत्त्वकांक्षा
असता कामा नये. की ज्यानी दिलं, त्यालाच खायचं. ही महत्त्वकांक्षा नाही. ही महत्त्वकांक्षा
असूच शकत नाही. आणि जास्तीत जास्त काय केलंत हो तुम्ही, आमदार नेलेत, घेऊन गेलात, घेऊन
जा. आणखी कुणाला घेऊन जायचं घेऊन जा. तुम्ही झाडाची फुलं तोडू शकता. झाडाची फळं तोडू
शकता. पण झाडाची मुळं ही उपटून काढू शकलेला नाही. ती काढू शकत नाही. निसर्गाचा नियम
आहे. सुकलेली पानं गळलीच पाहिजे. गळलीच पाहिजे. ही सुकलेली पानं जोपर्यंत गळत नाही,
तोपर्यंत नवीन पालवी त्याला फुटत नाही. आणि नवीन पालवी त्याला फुटत नाही, तोपर्यंत
झाड पुन्हा डवरत नाही. जी पानं सडलेली असतील, कीड लागलेली असतील, ही तोडून टाकावीच
लागतील. कारण त्या पानाला लागलेली कीड ही माझं अख्खं झाड सडवून टाकेल.
दरम्यान, काल रात्री शिवसैनिकांशीही उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधत हीच
भूमिका मांडली.बाळासाहेबांचा मुलगा म्हणून माझ्यावर प्रेम करू नका, ज्यांना माझ्या
नेतृत्वावर विश्वास नसेल, ते सुद्धा सोडून जाऊ शकतात, असं ते म्हणाले.
****
राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे, असं मुळीच
होता कामा नये, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. काल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,
महापालिका आयुक्त तसंच मंत्रालयातल्या विविध विभाग सचिवांच्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत
होते. कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता, आपत्ती व्यवस्थापन तयारी, तसंच आषाढी वारीतील
वारकऱ्यांच्या सुविधा, याविषयी महत्त्वाच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी आमदार अजय चौधरी यांच्या नियुक्तीला, विधानसभा
उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिली आहे. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ
शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना पक्षाच्या गटनेते पदावरून हटवत, त्यांच्या जागी अजय
चौधरी यांना गटनेता करण्याची विनंती शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांना करण्यात आली.
तर, संख्याबळ आपल्याकडे असून, गटनेतेपदही आपल्याकडेच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटानं
केला होता. त्यासाठी ३४ आमदारांच्या सहीचं पत्रही विधानभवनाला पाठवण्यात आलं होतं.
मात्र, विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी अजय चौधरी यांच्या गटनेते पदाला मान्यता दिली
आहे.
****
शिवसेनेचे ४० आणि १२ अपक्ष अशा ५२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे
यांनी केला आहे. या आमदारांसह आपला पक्ष शिवसेना असून आपल्या गटाला मूळ पक्ष म्हणून
मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात शिंदे आहेत. मात्र, विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना
नेत्या निलम गोऱ्हे यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. राज्य घटनेच्या १० व्या सूचीनुसार
बंडखोर आमदारांना आपलं सदस्यत्व रद्द करायचं नसेल तर त्यांना अन्य नोंदणीकृत पक्षात
विलीन व्हावं लागेल. अन्यथा हा गट मूळ पक्षापासून विलग झाला नाही, असं ग्राह्य धरलं
जाईल. आणि तो अपात्र ठरेल, अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली.
या बंडखोर गटाला मूळच्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळणार नाही, असंही
त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचा विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा आहे. निवडणूक आयोगाच्या
नियमानुसार शिवसेनेची घटना तयार करण्यात आली आहे. त्यात कार्यकारिणीची नावं देखील नमूद
आहेत आणि कार्यकरिणीवर आमचं बहुमत आहे, असं गोऱ्हे म्हणाल्या. या गटाने आगामी निवडणुकांमध्ये
४ ते ६ टक्के मतं मिळवली, तरंच त्यांना शिवसेनेचं चिन्ह आणि नाव मिळेल, असंही त्यांनी
सांगितलं.
****
शिवसेनेनं परवा बारा आणि काल चार अशा एकूण १६ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई
करण्याची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. या आमदारांना
आज किंवा उद्या याबाबतची नोटीस बजावली जाण्याची शक्यता शिवसेना नेते खासदार अरविंद
सावंत यांनी वर्तवली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे मुंबईहून काल
हिंगोलीत परतले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी बंडखोर
आमदारांना परतीचं आवाहन करताना बांगर यांना भावना अनावर झाल्या.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे चार हजार २०५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ५४ हजार ४४५ झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४७ हजार ८९६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक
८६ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ७५२ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ८१
हजार २३२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८३ शतांश
टक्के झाला आहे. राज्यात सध्या २५ हजार ३१७
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
२२, उस्मानाबाद १३, जालना चार, तर नांदेड जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
****
अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय वायूदलातल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठीची
नोंदणी प्रक्रिया कालपासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना अग्निपथ वायु डॉट सी डी ए
सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठीची
ऑनलाईन परीक्षा देशभरातल्या २५० केंद्रांवर २४ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. ही प्रक्रिया
या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल. तर लष्कर आणि नौदलाच्या भरतीप्रक्रिया एक जुलैपासून
सुरू होणार आहेत.
****
साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार काल जाहीर झाले. लक्ष्मीबाई टिळक यांच्या
स्मृतिचित्रे च्या इंग्रजी अनुवादाबद्दल शांता गोखले यांना, तर अमिताव घोष यांच्या
सी ऑफ पॉपीज या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी कुमार नवाथे यांना हा पुरस्कार जाहीर
झाला आहे. ५० हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
चालु शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन २०२२-२३
पासून इयत्ता पहिली ते १२ वी साठी १०० टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनानं मान्यता
दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान, शाळाबाह्य
बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणणं तसंच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी,
येत्या ५ जुलै ते २० जुलै या कालावधीत, शासनातर्फे
‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ ही मोहिम व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर आणि
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा येत्या मंगळवार म्हणजेच २८ जून पासून सुरू
होणार आहेत. या परीक्षा प्रचलित पेन अँड पेपर पद्धतीनं दीर्घोत्तरी प्रश्नाद्वारे घेण्यात
येणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे. दरम्यान, विद्यापीठाने दीर्घ उत्तरपरीक्षेऐवजी
लघु उत्तरपरीक्षा घ्याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात काल आंदोलन
केलं.
****
जालना जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या मालकीच्या
साखर कारखान्यावर, सक्तवसुली संचालनालय- ईडीनं काल मोठी कारवाई करत, कारखान्याची २००
एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली. ईडीच्या
अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती.
याशिवाय खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आल्याची माहिती
समोर आली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातल्या रामनगर साखर कारखाना खरेदी
प्रकरणी खोतकर यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता.
****
राज्य लोकसेवा आयोगानं आपल्या परीक्षा पद्धतीत बदल केला आहे. यानुसार राज्यसेवा
मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे. परीक्षेचं हे स्वरुप राज्यसेवा मुख्य
परीक्षा २०२३ पासून लागू होईल, असं आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे हस्ते काल म्हाडाच्या
औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे, ९८४ निवासी सदनिका आणि २२० भूखंडांच्या
वितरणाकरिता संगणकीय सोडत काढण्यात आली. यामध्ये औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर,
परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांचा समावेश आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून निघालेल्या संत मुक्ताईंच्या पालखीचं काल
बीड नगरीत आगमन झालं. बीड मधले आजोबा गोविंदपंत यांचं दर्शन घेऊन ही पालखी दोन दिवसांच्या
मुक्कामानंतर पंढरपूरला रवाना होणार आहे.
****
शेगाव इथल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज बीड जिल्ह्यात अंबाजोगाई
इथं आगमन होत आहे. दत्त मंदिर परिसरात आज मुक्कामी राहिल्यानंतर पालखी उद्या लोखंडी
सावरगाव मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.
****
आळंदीहून
निघालेली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल दीवे घाट पार करत सासवडमध्ये
दाखल झाली. तर संत तुकाराम महाराजांची पालखी काल लोणी काळभोर मुक्कामी पोहोचली.
****
औरंगाबाद इथल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना निलंबित करण्यात
आलं आहे. शासनाचे उपसचिव सुनील हंजे यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. नावंदे यांनी
महापालिका शाळांच्या क्रीडा साहित्याच्या प्रस्तावामध्ये फेरफार करत, अस्तित्वातच नसलेल्या
सात शाळांना क्रीडा साहित्य मंजूर केलं असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यामुळे ही
कारवाई करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा ते नांदेड या मार्गावर नऱ्हापूर शिवारात काल सायंकाळी
कार आणि दुचाकी अपघातात, चुडावा पोलिस ठाण्यातले पोलिस उपनिरीक्षक छगन सोनवणे या पोलिस
अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शनींनी सोनवणे यांना पूर्णा ग्रामीण रुग्णालयात
हलवलं, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
****
औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतल्या लोकप्रिय संस्कृत शिक्षिका
स्मिता शशिकांत गानु यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. शांत
स्वभावाच्या, हसतमुख गानू मॅडम विद्यार्थिनीं मध्ये लोकप्रिय होत्या.
****
औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यात काल पावसाशी निगडित घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू
झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या आडगाव जेऊर इथं झालेल्या ढगफुटीसदृश्य
पावसात, बैलगाडीतून जाणारे आठ जण वाहून गेले. यात पाच जणांना वाचवण्यात स्थानिकांना
यश आलं. मात्र, एक महिला आणि दोन मुलींचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्या.
सोयगाव तालुक्यात अंगावर वीज पडून एक जण ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
जालना जिल्ह्यात काल तिघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला
आणि एका पुरुषाचा समावेश आहे. टेंभुर्णी, धनगर पिंप्री, आणि श्रीकृष्णनगर या तीन वेगवेगळ्या
ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये काही जनावरंही दगावली. सिंदखेड, रांजणगाव इथंही वीज
पडून काही जनावरं दगावल्याचं वृत्त आहे.
****
No comments:
Post a Comment