आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ जुलै २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त
धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीनं धान्यावर प्रति क्विंटल ४४०
रुपये कमीशन देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. परवा ४ जुलै रोजी
राज्यातल्या सर्व तहसिल कार्यालयांवर,११ जुलै रोजी राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर,
१८ जुलै रोजी मुंबईत तर २ ऑगस्ट रोजी दिल्ली इथं रामलिला मैदानावर धरणं आंदोलन करण्यात
येणार आहे.
****
राज्यात यावर्षी जून अखेरीस
सरासरीच्या एक्काहत्तर टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेर सरासरीच्या १३६ टक्के
पाऊस झाला होता. राज्यात आतापर्यंत फक्त चाळीस टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी
जूनअखेर १०४ टक्के पेरण्या झाल्या होत्या. राज्यात सर्वाधिक पेरण्या अमरावती विभागात
पन्नास टक्के तर सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात आठ टक्के इतक्याच झाल्या आहेत.
****
औरंगाबाद मध्ये ९२ हजार रुपये
किंमतीच्या गांजासह दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली. विजय जाधव, अशोक भालेराव
अशी आरोपींची नावे असून त्यांच्यासोबत एका महिलेविरोधातही गांजा विक्री प्रकरणी गुन्हा
दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागानं दिली आहे.
****
विविध शासकीय तसंच निमशासकीय
योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य झालेले असल्यामुळे, ‘‘पहिले पाऊल, आधार
कार्ड घेऊन’’ या घोषवाक्यासह परभणी जिल्ह्यातल्या
शून्य ते पाच वर्षं वयोगटातल्या बालकांच्या विशेष आधार नोंदणी शिबीरांचं आयोजन करण्यात
आलं आहे. या नि:शुल्क आधार कार्ड नोंदणीसाठीची विशेष मोहीम जिल्ह्यात येत्या पंधरा
तारखेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा परभणीच्या उपजिल्हाधिकारी
स्वाती दाभाडे यांनी दिली आहे. या योजनेसाठी अंगणवाडी स्तरावर शिबिरांचं नियोजन करण्यात
आल्याचं त्यांनी सांगितलं.
//********//
No comments:
Post a Comment