Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जुलै २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
मुख्यमंत्री आणि इतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेच्या याचिकेवर
तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
·
शेतकरी अधिक समृद्ध होईल आणि आत्महत्या करण्यासाठी कधीही अगतिक
होणार नाही, यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.
·
राज्य विधानसभेचं विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलैला, तर १८ जुलैपासून
संसदेचं पावसाळी अधिवेशन.
आणि
·
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून
सर्वत्र साजरी.
****
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर
तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी
या आमदारांना कारवाईची नोटीस बजावली आहे, त्यावर निर्णय होईपर्यंत या सर्वांना निलंबित
करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयानं यापूर्वी अशाच याचिकेवर घेतलेल्या
सुनावणीत सर्व आमदारांना नोटीसचं उत्तर देण्यास ११ जुलैपर्यंत मुदत देत, १२ जुलैपर्यंत
कारवाईपासून संरक्षण दिलं आहे.
****
शेतकरी
अधिक समृद्ध होईल आणि आत्महत्या करण्यासाठी कधीही अगतिक होणार नाही, यासाठी सरकार शक्य
ते सगळे प्रयत्न करणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आजच्या
कृषी दिनाच्या संदर्भात बोलताना, शेतीला पाणी कमी पडू नये यासाठी सरकार जलसिंचन विभागाच्या
प्रलंबित योजना लवकरात लवकर पूर्ण करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. करदात्यांचा
पैसा वाया जाऊ नये, यासाठी विविध योजना ठरलेल्या वेळात पूर्ण करण्याला आपल्या सरकारचं
प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद
तसंच उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने ठराव करावा लागणार
असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते.
बहुमत चाचणीची सूचना असताना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन असा ठराव करणं चुकीचं आहे, त्यामुळे
हा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा मंजूर करावा लागणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट
केलं.
दरम्यान,
नामांतराचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च
न्यायालयात जाण्याची भूमिका औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराविरोधी कृती समितीचे अध्यक्ष
मुश्ताक अहमद यांनी घेतली आहे. आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषद घेत नामांतराच्या निर्णयाला
त्यांनी विरोध दर्शवला.
****
निवडणूक
आयोगानं राईट टू रिकॉल म्हणजे मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याची
व्यवस्था लागू करण्याची वेळ आलेली आहे, असं मत शिवसेना पक्षाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकारांशी ते बोलत होते.
आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींबाबत मतदार समाधानी नसतील तर त्यांना परत बोलावण्याची
संधी मतदारांकडे असली पाहिजे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री
पदाची शपथ घेण्यासंदर्भात बोलताना, भाजपानं काल जे केलं तेच आम्ही अडीच वर्षांपूर्वी
बोलत होतो. त्यावेळी ते मान्य केलं असतं, तर काल जे झालं ते सन्मानानं झालं असतं. या
पूर्ण प्रकरणातून भाजपला काय मिळालं, प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी केला. मेट्रो कारशेड
आरेच्या जंगलात उभारण्याचा निर्णय नव्या सरकारनं रेटू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी
केलं आहे. नव्या सरकारचं अभिनंदन करताना, नव्या सरकारकडून जनतेचं भलं व्हावं, अशी अपेक्षा
माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
राज्य
विधानसभेच्या अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून २ आणि ३ ऐवजी आता ३ आणि
४ जुलै रोजी हे दोन दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अध्यक्षांची निवड
करण्यात येणार आहे. यासाठी सदस्यांना उद्या शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल
करता येईल. रविवारी पहिल्या दिवशी सभागृहात अध्यक्षांची निवड केली जाईल.
दरम्यान,
विधानसभाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांचा अर्ज आज दाखल करण्यात
आला.
****
संसदेचं
पावसाळी अधिवेशन या महिन्याच्या अठरा तारखेला सुरू होऊन ऑगस्ट महिन्याच्या बारा तारखेपर्यंत
चालणार आहे. या सत्रात एकूण अठरा बैठकी होणार असल्याची माहिती लोकसभा सचिवालयानं दिली
आहे. यात अठरा जुलैला राष्ट्रपती निवडणूक तर सहा ऑगस्टला उपराष्ट्रपती निवडणूक होईल.
नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा शपथविधी पंचवीस जुलैला तर नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा शपथविधी
अकरा ऑगस्टला होईल.
****
करपद्धती
आणि शेअर बाजार व्यवस्थेत सरकारनं केलेले बदल आजपासून लागू झाले आहेत. या वर्षीच्या
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारनं क्रिप्टोकरन्सीवर एक टक्का उत्पन्न स्त्रोत कर कपात
अर्थात टीडीएस लावण्याची तरतूद केली आहे. याशिवाय या वर्षीच्या एप्रिलपासून क्रिप्टोकरन्सीवर
तीस टक्के आयकरही लावण्यात आला आहे. पॅन कार्ड आधारपत्राशी जोडण्याचं शुल्कही आता दुप्पट,
म्हणजे एक हजार रुपये करण्यात आलं आहे. डॉक्टर, तसंच सामाजिक माध्यमांवरून विक्रीला
प्रोत्साहन देणाऱ्यांना एका आर्थिक वर्षात वीस हजार रुपयांहून जास्त नफा झाल्यास त्यावरही
दहा टक्के टीडीएस लागेल. सगळ्या डीमॅट खात्यांना टॅग करणं आवश्यक असल्याची घोषणा गेल्या
महिन्यात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीनं केली होती, त्यानुसार आजपासून
कोणत्याही विना टॅग डीमॅट खात्यात प्रतिभूती जमा करण्याला परवानगी नसेल.
****
वस्तू
आणि सेवा कराच्या उत्पन्नात स्थिरपणे वाढ होत असून, यावर्षीच्या जून महिन्यात या करातून
मिळणाऱ्या उत्पन्नात छप्पन्न टक्के वाढ होऊन ते एक पूर्णांक चव्वेचाळीस लाख कोटी रुपयांपर्यंत
पोहचलं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वस्तू आणि
सेवा कर दिवसाच्या पाचव्या वर्षाच्या समारंभात त्या आज नवी दिल्ली इथे बोलत होत्या.
या करातून मिळणारं मासिक उत्पन्न एक पूर्णांक चाळीस लाख कोटी रुपयांच्या खाली जात नसल्याचंही
त्यांनी सांगितलं.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत
या लसीच्या १९७ कोटी ६१ लाख ७४ हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. सध्या राज्य
तसंच केंद्रशासित प्रदेशांकडे ११ कोटी ३६ लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध आहेत. केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
****
ओडिशातल्या
जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध रथयात्रेला आजपासून प्रारंभ झाला. भगवान जगन्नाथ, बलभद्र
आणि सुभद्रा या भावंडांनी आज आपापल्या रथातून परंपरेनुसार पुरी जवळच्या मावशीच्या गावाकडे
प्रस्थान केलं. अकरा दिवसानंतर ते पुन्हा स्वगृही परततील. देशविदेशातून भाविक मोठ्या
संख्येनं या रथयात्रेत सहभागी झाले आहेत. औरंगाबाद इथंही सिडको परिसरात मोठ्या भक्तीभावाने
जगन्नाथाचा रथोत्सव साजरा केला जातो.
****
आषाढी
यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन मिळावं, यासाठी
आजपासून येत्या आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत, म्हणजेच येत्या पंधरा तारखेपर्यंत श्री
विठ्ठल रखुमाईचं दर्शन चोवीस तास सुरू राहणार आहे. दररोज एक लाखांहून अधिक भाविकांना
सुलभतेनं दर्शन व्हावं, यासाठी मंदिर समितीनं दर्शन रांगेची तसंच पावसापासून बचावासाठी
शेड्सची उभारणी केली आहे.
****
हरित
क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिनाच्या स्वरूपात आज राज्यात विविध
ठिकाणी साजरी करण्यात आली. हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वसंतराव नाईक
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
उस्मानाबाद
इथं प्रयोगशील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या
हस्ते प्रमाणपत्र आणि आंब्याचं रोप देऊन सत्कार करण्यात आला.
नवीन
तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी शेती उत्पादनात वाढ करावी, असं आवाहन नांदेड
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी कृषी दिनाच्या निमित्तानं
आयोजित कार्यक्रमात बोलताना केलं.
शेतकऱ्यांनी
बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान वापरून शेती आणि जोड व्यवसायात विविध प्रयोग करावेत.
यामुळे शेतकरी कर्जबाजारी न होता, आर्थिक संपन्न होईल असं मत औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं कृषीसंजीवनी मोहीमेच्या समारोप सत्रात
ते बोलत होते. औरंगाबाद जिल्हा सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगात देशात प्रथम क्रमांकावर
असून जवळपास १९० शेतकरी उत्पादन कंपन्या जिल्ह्यात स्थापन झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी
दिली.
****
No comments:
Post a Comment