Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.
****
· एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र
फडणवीस उपमुख्यमंत्री
· शिंदे मुख्यमंत्री होतील याची कुणालाच कल्पना नव्हती- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची प्रतिक्रिया
· राज्य विधानसभेचं उद्यापासून दोन दिवसाचं विशेष अधिवेशन, पहिल्या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक तर दुसऱ्या दिवशी बहुमत
चाचणी
· एकदाच वापरुन फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर आजपासून राज्यभरात
पूर्णपणे बंदी
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे तीन हजार ६४० रुग्ण तर मराठवाड्यात ९७ बाधित
· नांदेडचं गुरुद्वारा सचखंड मंडळ बरखास्त, डॉक्टर पी एस पसरिचा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती
आणि
· भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पाचवा क्रिकेट कसोटी सामना तर मलेशिया
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत
****
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी तर
उपमुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल
संध्याकाळी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची
शपथ दिली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं स्मरण करत शपथ
घेतली.
****
राज्याच्या राजकीय पटलावर काल अभूतपूर्व वेगवान नाटकीय घडामोडी पहायला
मिळाल्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास फडणवीस यांनी शिंदे यांच्यासह पत्रकार
परिषद घेऊन शिंदे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष मंत्रिमंडळात सहभागी होईल
आणि ते स्वतः मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती दिली होती. मात्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असं आपल्याला वाटतं, असं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संध्याकाळी
साडे सहा वाजेच्या सुमारास जाहीर केलं. त्यानंतर काही वेळामध्ये या संदर्भात
पक्षादेश असल्याचं जाहीर झालं. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या
संदर्भातला संदेश प्रसारित केला. त्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री
पदाची शपथ घेतली.
****
तत्पूर्वी एकनाथ शिंदे दुपारच्या सुमारास गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यांनी
प्रथम फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे
यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी भारतीय जनता
पक्षाचे नेते प्रवीण दरेकर, प्रदेश
अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय
सचिव पंकजा मुंडे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.
****
देवेंद्र फडणवीस स्वतःही मुख्यमंत्रीपद घेऊ शकले असते मात्र त्यांनी बाळासाहेब
ठाकरे यांच्या शिवसैनिकासाठी मनाचा मोठेपणा दाखवला, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी शपथविधीपूर्वी फडणवीस यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत
व्यक्त केली. फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्ष आणि इतर मिळून सुमारे १२०
आमदारांचं संख्याबळ असल्याचं ते म्हणाले. शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं
जात असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.
****
राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली हाच मुळात जनमताचा अपमान होता, अशी टीका फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत केली. महाविकास
आघाडी सरकारच्या कार्य काळात राज्यामध्ये गेल्या अडीच वर्षांत चालू कामांना
स्थगिती, विकास काम नाही आणि प्रचंड
भ्रष्टाचार बघायला मिळाला, असा
आरोपही त्यांनी केला. नवं सरकार इतर मागास वर्गाचं तसंच मराठा आरक्षण आणि अन्य
सगळे असे विषय एका टप्प्यापर्यंत नेईल. सर्वांना न्याय देण्याचा हे सरकार प्रयत्न
करेल, असंही त्यांनी सांगितलं.
मावळत्या मंत्रिमंडळानं शेवटच्या दिवशी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशीव केलं, नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा.पाटील यांचं नाव दिलं, याला आपलं समर्थन असेल, असंही फडणवीस म्हणाले.
****
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची कुणालाच कल्पना नव्हती, असं नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद
पवार यांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घडामोडींसदर्भात आश्चर्य
व्यक्त केलं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याचंही
त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली, सत्तेची कोणतीही खुर्ची मिळाली तरी ती स्वीकारायची असते
याचं उदाहरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामुळं फडणवीस यांनी घालून
दिल्याचं ते म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आनंदानं स्वीकारली
नसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरुन जाणवल्याचं त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे सत्तेला
चिकटून राहिले नाहीत. या सत्तांतरात संजय राऊत यांना दोष देणं चुकीचं आहे, असं मत त्यांनी यावेळी नोंदवलं. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यामुळं हे सत्तांतर घडलं असल्याचा केला जात
असलेला आरोप खोटा असल्याचं ते म्हणाले.
****
शपथविधिनंतर झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
उद्या शनिवारी आणि रविवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच
दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
होणार आहे तर दुसऱ्या दिवशी बहुमत सिद्ध केलं जाईल. या बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक, पाणी, पीक विमा परिस्थितीचं सादरीकरण करण्यात
आलं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद
साधला. राज्यातील विकास कामं, विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी प्रशासनाचे
सहकार्य मिळेलच असा विश्वास मुख्यमंत्र्यांना यावेळी व्यक्त केला.
****
तळागाळातला एक नेता समृद्ध राजकीय, संसदीय आणि प्रशासकीय अनुभव गाठीशी घेऊन मुख्यमंत्री झाला आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी
ते कार्य करत राहतील, असा
विश्वासही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. प्रत्येक
भाजपा कार्यकर्त्यासाठी फडणावीस हे प्रेरणास्रोत राहिले आहेत. त्यांचा अनुभव आणि
ज्ञान या सरकारसाठी मोलाचं ठरेल असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी, नारायण
राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
प्रमुख राज ठाकरे, माजी
उपमुख्यमंत्री अजीत पवार, एकनाथ खडसे यांच्यासह सर्वच
नेत्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
नवं सरकार सत्तारुढ झाल्यानंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
ठिकठिकाणी आनंद व्यक्त केला.
****
एकदाच वापरुन फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर आजपासून राज्यभरात
पूर्णपणे बंदी लागू असेल. अश्या एकल वापराच्या प्लास्टिक वस्तुंचा साठा
करणाऱ्यांना ५ ते २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल तर तिसऱ्यांदा असा साठा
संबंधिताकडे आढळून आला तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासंदर्भात
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं काल राज्य सरकारांचे अधिकारी आणि ८२ शहरांच्या पालिका
आयुक्तांची बैठक घेतली. अशा प्लास्टिक वस्तूंवरची बंदी अंमलात आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी
त्यांच्या कार्यक्षेत्रात पुढाकार घ्यावा, हे काम करणाऱ्या पथकांचं नेतृत्व करावं, व्यापारी, वितरक, किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनीही या प्लास्टिक ऐवजी
पर्यायी वस्तूंचा वापर करण्याकडे वळावं यासाठी त्यांनी मदत करावी, असं या बैठकीत सांगण्यात आलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ६४० रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ७६ हजार ११४ झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९२५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल चार हजार ४३२ रुग्ण बरे झाले.
राज्यात आतापर्यंत, ७८
लाख तीन हजार २४९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४
हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ९७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ४२, नांदेड ९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २३, जालना ५ आणि लातूर जिल्ह्यात काल १८ नव्या रुग्णांची नोंद
झाली.
****
नांदेडचं श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा सचखंड मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय
राज्य सरकारनं घेतला असून, माजी
पोलीस महासंचालक, डॉक्टर
पी एस पसरिचा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. पसरीचा यांनी काल प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी २००५ ते २०१० या काळातही त्यांनी या मंडळावर प्रशासक म्हणून काम पाहिलं
होतं. माजी अध्यक्ष भूपिंदरसिंग
मन्हास यांचा अध्यक्ष पदाचा विहित कालावधी संपल्यानं हे मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यातला गेल्यावर्षी राहिलेला पाचवा क्रिकेट कसोटी सामना
आजपासून बर्मिंगहॅम इथे खेळला जाणार आहे. ४ कसोटी सामने झाल्यानंतर कोरोना विषाणु
संसर्ग वाढल्यामुळे पाचवा सामना स्थगित करण्यात आला होता. १० महिन्यांतर हा पाचवा
सामना आज होणार असून या मालिकेत, भारत
२-१ अश्या फरकानं आघाडीवर आहे.
दरम्यान, या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर कर्णधारपदाची तर ऋषभ पंतवर उपकर्णधारपदाची जबाबदारी
सोपवण्यात आली आहे. कर्णधार
रोहित शर्माला कोरोनाची बाधा झाल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
****
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू आणि जागतिक क्रमवारीत एकवीसाव्या
क्रमांकावर असलेल्या एच एस प्रणॉय यांनी मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं काल थायलंडच्या फिट्टायापोर्न
वेईवानचा पराभव केला. आता सिंधूचा उपांत्य पूर्व फेरीतला सामना चिनी तैपेईच्या ताय
त्झू यिंगशी होणार आहे. एच एस प्रणॉय यानंही पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
केला आहे. त्यानं चीनच्या चु टियन चेनचा पराभव केला. प्रणॉयचा पुढल्या फेरीतला
सामना इंडोनेशियाच्या सातव्या मानांकित जोनाथन क्रिस्टीशी होणार आहे.
****
६७ कोटी रुपयांच्या खरेदीची बोगस बिलं वापरुन त्याद्वारे १२
कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन
व्यक्तींना वस्तू आणि सेवाकर विभागाच्या औरंगाबाद अन्वेषण विभागानं अटक केली आहे.
फसवणूक आणि कर चोरीच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागानं आक्रमक
मोहिम राबवली आहे. यात औरंगाबाद इथल्या ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या दोन व्यावसायिकांकडे धाडी टाकण्यात आल्या. या व्यवसायिकांना १४
दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
सर्व धर्माचे संस्थापक, महापुरुष, वारकरी संत, यांच्या
जीवनातील आणि विचारातील मानवतावादी कल्याणाचे संदर्भ आणि विचार एकत्र करुन नवी
भारतीय आणि विश्वात्मक संस्कृती आपल्याला जन्माला घालावी लागणार असल्याचं मत
साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादच्या बोधिसत्व
प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित डॉ. गंगाधर पानतावणे स्मृती व्याख्यानमालेत काल बोलत
होते.
****
No comments:
Post a Comment