Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३
जुलै २०२२ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ आज संध्याकाळी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार
आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम
बिर्ला, यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. खासदारांच्या
स्वाक्षरी असलेली एक पुस्तिका यावेळी राष्ट्रपतींना भेट देण्यात येणार आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद उद्या रविवारी देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं थेट
प्रसारण आकाशवाणीवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे. नवनिवार्चित राष्ट्रपती
दौपद्री मुर्मू यांचा शपथविधी समारंभ येत्या सोन्यमवारी होणार आहे.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभ
आयोजित केला होता.
****
आज राष्ट्रीय
प्रसारण दिवस आहे. १९२७ मध्ये या दिवशी, भारतीय प्रसारण कंपनी या खासगी कंपनीच्या अंतर्गत
तत्कालिन बॉम्बे स्टेशनवरून देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं होतं. भारतीय प्रसारण
सेवा आठ जून १९३६ पासून ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली.
****
देशात कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३४ लाख
९३ हजार २०९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ६८ लाख १४
हजार ७७१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या २१ हजार ४११ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ६७ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २० हजार ७२६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ५०
हजार १०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
केंद्रीय
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री
पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच
गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली होती, त्या पार्शवभूमीवर आयोगानं या दोन्ही
गटाला पुरावे सादर करण्यासाठी आठ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं
ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे.
****
सत्ताप्राप्तीनंतर
भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पनवेल इथं होणार आहे. राज्यभरातून
पक्षाच्या खासदार, आमदारांसह ८०० प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
****
न्याय व्यवस्था
आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर औरंगाबाद इथं आयोजित एक दिवसीय विधीज्ञ परिषदेचं
उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या
हस्ते झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, राजस्थान उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती एस एस शिंदे या परषदेत उपस्थित आहेत. न्यायाधीश शिंदे यांचा यावेळी न्यायमूर्ती
भुषण गवई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांचा
लाभ देण्यासाठी उस्मानाबाद इथं, काल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त,
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या
प्रमुख उपस्थितीत, प्रस्ताव नोंदणी शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. २५ ते २९ जुलै दरम्यान
जिल्हयातल्या प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये या शिबीराचं आयोजन करण्यात येणार आहे.
प्रस्ताव नोंदणी केलेल्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून कर्ज मंजुरी पर्यंत आवश्यक
ते सर्व सहकार्य करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात येत्या एक ऑगस्टपासून मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्याची मोहीम सुरू
करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार ओळखपत्रासोबत
नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे .
****
तायपेई इथं
सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी. कश्यपचं आव्हान संपुष्टात
आलं आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या आज झालेल्या सामन्यात कश्यपला मलेशियाच्या सूंग जू
वेन याच्याकडून १२-२१, २१-२२, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात
सध्या १२ हजार ४४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. धरणाच्या जलविद्युत
केंद्रातून एक हजार ५८९, तर उजव्या कालव्यातून ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी
पात्रात सोडलं जात आहे.
कोकण, मध्य
महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात
मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment