आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ जुलै २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
आज राष्ट्रीय प्रसारण दिवस आहे.
१९२७ मध्ये या दिवशी, भारतीय प्रसारण कंपनी या खासगी कंपनीच्या अंतर्गत तत्कालिन बॉम्बे
स्टेशनवरून देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं होतं. भारतीय प्रसारण सेवा आठ जून
१९३६ पासून ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि
क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य
लढ्यातल्या या सेनानींना अभिवादन केलं आहे.
****
जल जीवन मिशन अंतर्गत सर्व घरांमध्ये
नळाद्वारे पिण्याचं पाणी पोहोचवणारा देशातला पहिला जिल्हा म्हणून मध्य प्रदेशातल्या
बुर्हाणपुरचा गौरव करण्यात आला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुऱ्हाणपूरच्या
नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. लोकांची सामुहिक भावना, जल जीवन मोहिमेचा गट आणि मध्यप्रदेश
सरकारच्या प्रयत्नांशिवाय हे शक्य झालं नसतं, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं
आहे.
****
केरळमध्ये मंकीपॉक्स या आजारानं
बाधित आणखी एका रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे केरळमधल्या मंकीपॉक्स आजारानं बाधितांची
संख्या तीन झाली आहे. काल आढळलेला नवा रुग्ण याच महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतून मल्लपुरम
इथं परतला होता.
****
औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
कक्षाकडून काल जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक साहित्याचं
एक दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागरिकांसाठी खुल्या असलेल्या या प्रदर्शनाचा
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी
यांनी सांगितलं.
****
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा
पाऊस सुरू असून, पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे केंद्रीय आपत्ती
राखीव दल आणि राज्य आपत्ती राखीव दलाच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई,
पालघर, रायगड, महाड, ठाणे, रत्नागिरी, चिपळूण, कोल्हापूर, सातारा नांदेड आणि गडचिरोलीमध्ये
या तुकड्या तैनात केल्या आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही
भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज
आहे.
****
No comments:
Post a Comment