Monday, 2 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला विमुद्रीकरण अर्थात नोटबंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. यासंदर्भात दाखल विविध ५८ याचिकांच्या सुनावणीनंतर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती बी आर गवई, ए एस बोपण्णा, व्ही राम सुब्रमण्यम यांनी विमुद्रीकरणाचा निर्णय वैध ठरवला, तर न्यायमूर्ती नागरथना यांनी मात्र असहमतीचा निकाल दिला. बहुमताचा निकाल वाचताना न्यायमूर्ती गवई यांनी, काळाबाजार नष्ट करणं आणि दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा रोखणं, यामुळे हा निर्णय घेतल्याचं नमूद केलं.

विमुद्रीकरणाच्या अधिसूचनेत कोणतीही त्रुटी आढळून आली नसून, रद्द नोटा भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआय चलनात आणू शकत नाही, असं मतही न्यायालयानं व्यक्त केलं आहे. नोटाबंदीचा निर्णय घेताना अवलंबलेल्या प्रक्रियेत कोणतीही कमतरता नव्हती, त्यामुळे ती अधिसूचना रद्द करण्याची गरज नसल्याचं न्यायालयानं निकाल जाहीर करताना म्हटलं आहे.

****

शतकोत्तर आठवी भारतीय विज्ञान परिषद उद्यापासून नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडे दहा वाजता दूरस्थ पद्धतीनं या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानही या वर्षीच्या भारतीय विज्ञान परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. महिलांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयात शिक्षण आणि संशोधनाच्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीनं या परिषदेत विचारमंथन केलं जाणार आहे. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचं योगदान दर्शवणारा एक कार्यक्रमही होणार आहे.

****

महाराष्ट्र पोलिस दलाचा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मुंबईत गोरेगाव इथल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचं निरीक्षण करून शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.

****

राज्यात विविध जिल्ह्यात आज पोलिस भरती प्रक्रिया सुरु आहे.

परभणी जिल्हा पोलिस दलातल्या ७५ रिक्त जागांकरता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया होत आहे. या जागांसाठी चार हजार ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत. भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांच्या सोयीसाठी विविध ठिकाणाहून पोलिस मुख्यालयापर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

धुळे जिल्हा पोलिस दलात ४२ पदांसाठी पोलिस भरती होत आहे. पोलिस मुख्यालय मैदानावर आज सकाळपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

गोंदिया इथं पोलिस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची भरती आजपासूसुरु झाली असून, ही प्रक्रिया पाच दिवस चालणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पोलीस भरतीला आज पहाटेपासून सुरुवात झाली. ३०२ जागांसाठी २६ हजार ३८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस कवायत मैदानात पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड आणि अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही पोलीस भरती होत असून, प्रत्यक्षात मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे.

****

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतल्या घाटकोपर इथं एक कोटी २२ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, यात एका विदेशी महिलेचा देखील समावेश आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवी मुंबईत खारघर इथून देखील सव्वा कोटीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये १६ नायजेरियन व्यक्ती आहेत.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघादरम्यान सुरु असलेल्या पाच टी - ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल.  भारत या मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे. भारतानं पहिला सामना ४५ धावांनी जिंकला होता, तर नंतरचे दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले होते.

****

महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या वतीनं आयोजित राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. जवळजवळ २३ वर्षांनी होणा-या या स्पर्धेत एकू३९ क्रीडा प्रकार असतील. ही मिनि ऑलिंपिक स्पर्धा राज्यातल्या आठ विभागांमध्ये होणार आहे. यामध्ये पुणे, बारामतीमध्ये २३ स्पर्धा, नागपुर, जळगावमध्ये प्रत्येकी चार, नाशिकमध्ये दोन तर औरंगाबाद, अमरावती, मुंबई आणि सांगली या जिल्ह्यात प्रत्येकी एक स्पर्धा होणार आहे.

 

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...