Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
· नागरिकांचं
आयुष्य सुकर करणं हे सरकारचं ध्येय - ई-गव्हर्नन्स परिषदेत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र
सिंग यांचं प्रतिपादन.
· तेलंगणाचे
मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचं संघटनात्मक बांधणीसाठी नांदेड इथं अधिवेशन.
· शेतकऱ्यांना
दर्जेदार बियाणं आणि खतं पुरवण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा - सहकारमंत्री
अतुल सावे यांचं आवाहन.
आणि
· तिसऱ्या
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं न्यूझीलंडसमोर तीनशे शहाऐंशी धावांचं आव्हान.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी कमाल प्रशासन आणि किमान शासन हा मंत्र दिला असून त्याचं ध्येय नागरिकांचं
आयुष्य सुकर करणं हे आहे, असं मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र
सिंग यांनी म्हटलं आहे. मुंबईत ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेत
ते आज बोलत होते. हे माहितीचं युग आहे आणि डिजिटायझेशनमुळे कामकाजात सुलभता येते, खर्च
कमी होतो, वेळ वाचतो आणि माहितीची बॅंक तयार होते, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेला संबोधित केलं. राज्य सरकार उत्तम प्रशासन जिल्हा
पातळीपर्यंत पोचवेल आणि प्रत्येकाच्या हितासाठी प्रशासनाचा निर्देशांक तयार करेल, असं
त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मुलांशी आज संवाद
साधत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल विज्ञान भवनात या मुलांना पुरस्कारानं
सन्मानित केलं होतं. कला, संस्कृती, शौर्य, शोध, समाज सेवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या
असामान्य योगदानाबद्दल ११ मुलांना हे पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये
बीड जिल्ह्यातल्या राजुरी नवगण इथल्या रोहन बहीर याचा समावेश आहे. रोहनने गावातल्या
डोंगरी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता
मोठ्या साहसाने वाचवलं, त्याच्या या शौर्यासाठी त्याला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं.
****
तेलंगणाचे
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव - केसीआर यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी केसीआर
यांनी नांदेड इथं पक्षाचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भारत राष्ट्र समिती’
बीआरएस हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची शक्यता असून, त्यासाठी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी हा पक्ष युती करणार असल्याची चर्चा आहे. नांदेड इथल्या
सभेनंतर केसीआर हे पुण्यात आणि त्यानंतर औरंगाबादेत जाहीर सभा घेणार आहेत. सध्या सीमा
भागातील किनवट, बिलोली, देगलूर, धर्माबाद आणि माहूर या तालुक्यांमध्ये पक्षवाढीसाठी
त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात लोकसभेच्या आठ आणि विधानसभेच्या २२ जागांवर तेलगू
भाषिकांचा प्रभाव असल्यामुळे केसीआर यांच्या पक्षाला फायदा होण्याची शक्यता वर्तवली
जात आहे. दरम्यान, या युती संदर्भात अद्याप ‘बीआरएस’ शिवसेनेचा ठाकरे गट किंवा प्रकाश
आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पैकी कुणीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
****
शिवसेना
आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन
ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर
पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. नवे मित्र जोडण्याला कुणाचा विरोध
नाही परंतु मित्र जोडताना ते शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची
काळजी घेणं आवश्यक असल्याचं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
****
आयुर्वेद
आणि इतर पारंपरिक चिकित्सा प्रणालींमध्ये उपचार घेण्यासाठी वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन
देण्याच्या अनुषंगानं आयुष मंत्रालयानं भारतीय पर्यटन विकास महामंडळासमवेत एक सामंजस्य
करार केला आहे. या करारानुसार, आयुष मंत्रालयाकडून, आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सा
प्रणालींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
देईल. आयुर्वेद आणि इतर चिकित्सा प्रणालींमध्ये वैद्यकीय पर्यटनाला वाव देण्यासाठी
या कराराचा त्याला लाभ होऊ शकेल.
****
भारतीय
प्रजासत्ताकाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज
मैदानावर येत्या सव्वीस जानेवारीला मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला असून, या
कार्यक्रमाची रंगीत तालीम आज करण्यात झाली. मागच्या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या समारंभात
उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना आज पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
सामान्य
शेतकरी कर्जमाफीच्या विळख्यात अडकलेला असताना मोदी सरकारनं देशातल्या फक्त एकवीस उद्योजकांचं
सुमारे साडेदहा लाख कोटींचं कर्ज माफ केलं असून, संसदेत दिलेल्या माहितीत या उद्योजकांची
नावं दडवण्यात आली आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला
आहे. नाशिक इथे आज काँग्रेस पक्षाच्या ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानाचा शुभारंभ नाना
पटोले यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद
इथे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावून या अभियानाची सुरवात करण्यात
आली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची उद्दिष्टं आणि संदेश देशातल्या
जनतेपर्यंत पोचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राबवण्यात येत आहे.
****
शेतकऱ्यांना
दर्जेदार बियाणं आणि खतं पुरवण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन
सहकारमंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. पणन महासंघ अधिमंडळाची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण
सभा आज मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन राबवत
असलेल्या योजनांची माहिती देत, शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळावा, यासाठी पणन
महासंघानं पुढाकार घ्यावा, असंही सावे यांनी म्हटलं. वर्ष २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट कामकाज
करणाऱ्या सहकारी संस्था आणि पणन महासंघातले उत्कृष्ट काम करणारे अधिकारी-कर्मचारी यांचा
सत्कार यावेळी करण्यात आला.
****
न्यूझीलंडविरुद्धच्या
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं आज कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन
गिल या दोघांच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर तीनशे पंचाऐंशी धावा केल्या. इंदूर
इथं सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण
केलं. रोहितनं ८५ चेंडूत एकशे एक धावा तर शुभमननं ७८ चेंडूत ११२ धावा केल्या. सहाव्या
क्रमांकावर आलेल्या हार्दिक पंड्याने ३८ चेंडूत ५४ धावा केल्या. विराट कोहली ३६ आणि
शार्दुल ठाकूरच्या २५ धावा वगळता, अन्य फलंदाज चमक दाखवू शकले नाहीत. भारतानं दिलेल्या
लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंड संघाची सुरवात अडखळत झाली. पाहुण्या संघाचा सलामीचा
फलंदाज हार्दिक पंड्याच्या चेंडूवर शून्यावरच बाद झाला.
****
मेलबर्न
इथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी श्रेणीत भारताच्या
सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या जोडीनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज लाटवियाच्या
येलेना ओस्तापेंको आणि स्पेनच्या डेविड वेगा हर्नांडिज या जोडीनं उपान्त्यपूर्व फेरीत
भारतीय जोडीला पुढे चाल दिल्यानं मिर्झा-बोपन्ना जोडीचा उपान्त्य फेरीत प्रवेश झाला.
****
इंडियन
ऑईल कॉर्पोरेशननं, २०२३ हे वर्ष “हरित संकल्प बळकट करण्यासाठी” समर्पित केलं असल्याची
माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अनिर्बन घोष यांनी दिली आहे. औरंगाबाद
इथल्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर एक्स्ट्राग्रीन डिझेल विक्रीचं औपचारिक उद्घाटन
आज झालं, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडियन ऑईलकडून राज्यात विविध सुविधांच्या
विकासासाठी दोन हजार ३२६ कोटी रुपये खर्च होणार असून पुढील ३-४ वर्षांत राज्यात सुमारे
दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही अनिर्बन घोष यांनी यावेळी
केली.
****
लातूर
इथे शासकीय निवासी शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच
पार पडल्या. यामध्ये लातूर, अहमदपूर तालुक्यातल्या मरशिवणी आणि उदगीर तालुक्यातल्या
तोंडारपाटी इथल्या, मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि रेणापूर तालुक्यातल्या बावची
तसंच निलंगा तालुक्यातल्या जाऊ इथल्या, मुलींच्या शासकीय निवासी शाळा या स्पर्धेत सहभागी
झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment